परिचित, तरीही अपरिचित 'दख्खन'

 

      दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी. अगदी आपल्या प्रवासाच्या दिवसापुरतंच प्रवाशाच्या तोंडात नाव येणारी अशी ही गाडी. दख्खनच्या राणीच्या नावाशी साधर्म्य असणारी दख्खन अर्थात डेक्कन एक्सप्रेस. या परिस्थितीमुळंच ही गाडीही आता 60 वर्षांची झालेली आहे, तरी तिच्या वाढदिवसाचा, 6 दशकांच्या वाटचालीचा साधा उल्लेख कुठंही, साधी आठवणही कोणाला झालेली नाही.

दख्खन एक्सप्रेस नक्की कधी सुरू झाली याचा स्पष्ट उल्लेख सापडत नसला तरी उपलब्ध काही नोंदीच्या आधारे ती 1962 मध्ये सुरू झाली असावी असं दिसून येतं. दख्खन एक्सप्रेस सुरू होईपर्यंत मुंबई-पुणे दरम्यान ऐतिहासिक पुना मेल आणि दख्खनची राणी या दोनच थेट रेल्वेगाड्या धावत होत्या. त्यापैकी एकही गाडी मुंबईहून सकाळी उपलब्ध नव्हती. त्यामुळं सकाळच्यावेळी पुण्यासाठी एक गाडी सुरू करावी अशी मागणी होत राहिली होती. ती मागणी दख्खन एक्सप्रेसच्या रुपानं पूर्ण झाली होती. पुढची बरीच वर्ष दख्खन एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (तेव्हाचं व्हिक्टोरिया टर्मिनस) सकाळी 6.35 ला निघत राहिली. त्यावेळी पुण्याला पोहचायला तिला 4 तास 40 मिनिटांचा अवधी लागत होता. परतीच्या प्रवासात ती पुण्याहून दुपारी सव्वातीनला निघून संध्याकाळी पावणेआठला मुंबईत पोहचत असे. पुढं 21 व्या शतकात दख्खन एक्सप्रेसचा वेग वाढवण्यात आला. परिणामी तिचा प्रवासाचा कालावधी 20 मिनिटांनी कमी झाला. काही वर्षांनी तिचा वेग आणखी वाढवून प्रवासाचा कालावधी आणखी 15 मिनिटांनी कमी करण्यात आला. त्यामुळं दख्खन एक्सप्रेस आता आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 4 तास घेत आहे. या गाडीचा वेग वाढवत असताना तिच्या थांब्यांचा कालावधी प्रामुख्यानं कमी केला गेला आहे.

मुंबईहून आलेली आणि पावसाळी वातावरणात
 लोणावळ्यात दाखल होत असलेली दख्खन एक्सप्रेस  

      आज दख्खन एक्सप्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रोज सकाळी 7 वाजता निघते आणि सकाळी 11.05 ला पुण्यात पोहचते. या प्रवासादरम्यान ती दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (हा थांबा फक्त डाऊन प्रवासात), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजीनगरला थांबे घेते. अप दिशेच्या प्रवासात ती पुण्याहून दुपारी सव्वातीनला निघते आणि शिवाजीनगर, खडकी, तळेगाव, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादरला थांबे घेत संध्याकाळी 7.05 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहचते. 2019 पर्यंत दख्खन एक्सप्रेस जाता-येता कर्जत आणि खंडाळ्याचे थांबेही घेत होती. 2020 मध्ये आलेल्या COVID-19 च्या साथीनंतर ही गाडी विशेष गाडी म्हणून सोडली जाऊ लागली होती. पण तेव्हापासून हिचे कर्जत आणि खंडाळ्याचे व्यावसायिक थांबे रद्द करण्यात आले. हे थांबे रद्द केल्यामुळं दख्खनचा अप दिशेचा प्रवास आणखी वेगवान होऊन तो 3 तास 50 मिनिटांचा झाला आहे. पण डाऊन दख्खनच्या प्रवासाच्या कालावधीत काही फरक पडलेला नाही आहे. त्याला कारणही आहे. कर्जतचा व्यावसायिक थांबा रद्द झाला करण्यात आला असला तरी तिथला तांत्रिक थांबा चालूच ठेवावा लागला आहे. कर्जतला या गाडीला मागे बँकर इंजिनं जोडावी लागत असल्यामुळं हा थांबा दख्खन घेतच राहणार आहे. बँकर जोडण्यासाठी किमान 6 मिनिटांचा वेळ कर्जतमध्ये लागत आहे.

पूर्वी ICF डब्यांबरोबर धावत असताना
  मुंबईहून शिवाजीनगरला आलेली दख्खन एक्सप्रेस (डावीकडे)

      गेल्या 60 वर्षांमध्ये दख्खन एक्सप्रेसनं स्वत:मध्ये वेळापत्रकाबरोबरच अन्य अनेक बदल पाहिले आहेत. 1989 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी 4 अंकी क्रमांकांची पद्धत लागू करण्यात आली. त्यामुळं दख्खन एक्सप्रेसचा क्रमांकही आधीच्या तीन अंकांऐवजी 1007 डाऊन आणि 1008 अप असा झाला. पुढे 2010 मध्ये भारतीय रेल्वेवरील प्रवासी रेल्वेगाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे नवीन क्रमांक पद्धती लागू करण्यात आली. तेव्हापासून रेल्वेगाड्यांसाठी 5 अंकी क्रमांक दिले जाऊ लागले आहेत. त्यावेळी दख्खन एक्सप्रेसच्या क्रमांकात 11007 डाऊन आणि 11008 अप असा बदल झाला.

 संगम पुलावरून पुण्यात प्रवेश करत असलेली दख्खन  

      मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर 1928 पासून 1500 व्होल्टस् डीसी विद्युत कर्षणप्रणाली (traction system) अस्तित्वात होती. त्यामुळे या मार्गावर डीसी विद्युत इंजिनंच रेल्वेगाड्यांना जोडली जात होती. पण डीसी कर्षण प्रणालीमुळं रेल्वेगाड्यांच्या वेगवाढीवर मर्यादा येत होत्या. बदलत्या काळाच्या गरजांनुरुप मुंबई-पुणे दरम्यानचा रेल्वेप्रवास अधिक वेगवान होण्यासाठी जे प्रयत्न रेल्वेकडून केले जात होते, त्यापैकीच एक प्रयत्न म्हणजे जुन्या डीसीचं एसीमध्ये रुपांतर करणं. तसं केल्यामुळं अत्याधुनिक, अधिक शक्तिशाली कार्यअश्वांसह (इंजिनं) या मार्गावर रेल्वेगाड्या चालवता येणं शक्य होणार होतं. त्यामुळं भारतीय रेल्वेवर इतरत्र अस्तित्वात असलेली 25 केव्ही एसी कर्षणप्रणाली या मार्गावरही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि डीसी ते एसी हे परावर्तन 2015 मध्ये पूर्ण करण्यात आलं. बदलत्या काळानुसार दख्खन एक्सप्रेसला गती देणाऱ्या कार्यअश्वांमध्येही बदल होत गेले. साधारण 2000 पर्यंत या गाडीला WCM श्रेणीतील इंजिन जोडलं जात होतं. त्याचवेळी घाटात WCG-2 श्रेणीतील बँकर इंजिनं जोडली जात होती. त्यानंतर WCM इंजिनं भारतीय रेल्वेवरून काढून टाकल्यावर त्यांची जागा WCAM-3 या AC आणि DC अशा दोन्ही कर्षणप्रणालींवर चालणाऱ्या इंजिनांनी घेतली. घाटात मात्र WCG-2 ही बँकर इजिनंच कायम राहिली. डीसी-एसी परावर्तन पूर्ण झाल्यावर घाटात WCG-2 बँकर इंजिनांची जागा अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम WAG-7 इंजिनांनी घेतली. LHB डबे जोडले जाऊ लागल्यावर काही काळ अत्याधुनिक WAP-7 या कार्यअश्वाकडं दख्खनच्या सारथ्याची जबाबदारी आली होती. पण आता पुन्हा WCAM-2 इंजिन या गाडीला जोडलं जात आहे. पण त्यामुळं पर्यावरणानुकूल HOG (Head-on-Generation) तंत्रज्ञानावर ही गाडी चालवणं आता बंद झालं आहे.

      व्हिस्टा डोम डब्यासह दख्खन एक्सप्रेस       

      दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची या गाडीत संख्या जास्त असल्यामुळं त्यांच्या सोयीसाठी दख्खनला भोजनयान (Pantry Car) जोडलं जात होतं. मात्र 200 किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या गाड्यांची भोजनयानाची सुविधा काढून टाकण्याचा नियम आल्यावर 2007 पासून या गाडीला हा डबा जोडणं बंद झालं आहे. भोजनयानाच्याजागी एक अनारक्षित डबा वाढवला गेला होता. 2020 पर्यंत दख्खन एक्सप्रेस 17 ICF डब्यांची होती. त्या डब्यांची रंगसंगतीही पुणे-मुंबई मार्गावरच्या अन्य इंटरसिटी गाड्यांप्रमाणंच निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. ऑक्टोबर 2019 मध्ये त्या रंगसंगतीत बदल करून उत्कृष्ट डबे या गाडीला जोडले जाऊ लागले, पण 2021 पासून अत्याधुनिक LHB डब्यांसह ही गाडी धावू लागली आहे. त्याचवेळी खंडाळ्याच्या घाटामधली दृश्य प्रवाशांना उत्तमरित्या अनुभवता यावीत या हेतूनं या गाडीला एक Vista Dome डबाही जोडला जाऊ लागला आहे. आता या गाडीचा रेक मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसबरोबर शेअर केला जात आहे. आज दख्खन एक्सप्रेसला 1 जनरेटर, गार्ड आणि ब्रेक सामान यान, 1 गार्ड, अनारक्षित आणि ब्रेक सामान यान, 3 वातानुकुलित खुर्ची यान, 1 व्हिस्टा डोम, 5 द्वितीय श्रेणीचे खुर्ची यान आणि 6 अनारक्षित डबे जोडले जात आहेत.

      पुणे-मुंबई दरम्यान धावणारी दख्खनची राणी आणि दख्खन एक्सप्रेस कर्जत आणि पळसधरीदरम्यान एकमेकींना ओलांडतात. त्याचप्रमाणं दोघी आपापल्या परतीच्या प्रवासात कल्याणच्या जवळ एकमेकींना ओलांडतात.

कल्याणबाहेर दख्खनच्या राणीला ओलांडणारी दख्खन


टिप्पण्या

  1. उत्तम
    100 ही लेख अतिश्य वाचनीय , माहिती प्रधान , ज्ञानवर्धक होते.

    उत्तर द्याहटवा
  2. मला उद्या ठाणे लोणावळा प्रवास करायचाय डेक्कन एक्सप्रेस ने. तिला जनरल डबा आहे का सध्या?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा