राष्ट्रपतींचे डबे


    राष्ट्रपतिपदासाठी 18 जुलैला झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. त्यानंतर भारताचे पंधरावे राष्ट्रपती म्हणून कोण पदभार स्वीकारणार हे समजेल. पूर्वी निवडणुकीनंतर कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपतिपदावरून दूर झालेले राष्ट्रपती दिल्लीहून आपल्या गावी त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या खास आलिशान रेल्वे डब्यांमधून प्रवास करत असत. कालांतराने ही प्रथा बंद पडली असली तरी यंदाच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने या डब्यांविषयी.

    भारताचे प्रथम नागरिक म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतींसाठी रेल्वेचे स्वतंत्र आलिशान डबे तयार करण्यात आलेले होते. राष्ट्रपती आपल्या अधिकृत दौऱ्यासाठी त्या डब्यांमधून प्रवास करत असत. 1977पर्यंत त्या डब्यांचा नियमित वापर राष्ट्रपती करत असत. स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्राचा फारसा विकास झालेला नव्हता. त्याउलट देशाचा बहुतांश भाग लोहमार्ग सेवेने जोडलेला असल्यामुळे राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी या विशेष डब्यांचा वापर केला जात असे. मात्र कालांतराने सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपती दौऱ्यासाठी भारतीय हवाईदलाच्या विमानातून जाऊ लागले आणि ते डबे वापराविना पडून होते.

भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवास करण्याचा सल्ला त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी तयार केल्या गेलेल्या खास डब्यांचा वापर डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या दौऱ्यासाठी केला जाऊ लागला. ब्रिटिश राजवटीच्या काळात तो डबा भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी एकोणिसाव्या शतकात तयार करण्यात आला होता. गव्हर्नर-जनरल जेव्हाजेव्हा भारताच्या कोणत्याही भागाचा दौरा करत असे, त्यावेळी तो त्या खास डब्याच्या विशेष गाडीतून जात असे. 1911पर्यंत दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अखंड भारताची राजधानी कोलकत्याहून सिमल्याला स्थानांतरित केली जात असे. त्यामुळे गव्हर्नर-जनरलबरोबरच अन्य महत्वाचे ब्रिटिश उच्चाधिकारी आणि सर्व सरकारी दफ्तरही हावडा-कालका मेलने (सध्याची नेताजी एक्सप्रेस) कोलकत्याहून सिमल्याला जात असे. त्याच गाडीला गव्हर्नर-जनरलसाठीचा खास डबा त्यावेळी जोडला जात असे.

स्वातंत्र्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींकडून दौऱ्यासाठी रेल्वेगाडीचा वापर वाढू लागल्यावर त्यांच्यासाठी मुंबईतील माटुंग्याच्या कार्यशाळेत 1956 मध्ये खास दोन डब्याचा सेट (Presidential Saloon) तयार केला गेला. हे दोन डबे आणि अन्य डबे मिळून तयार करण्यात आलेली राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडी दौऱ्यासाठी निघत असे. त्या खास दोन डब्यांमध्ये भोजनकक्ष, भेटीगाठींसाठीचा कक्ष, एक संमेलन कक्ष आणि राष्ट्रपतींचा शयनकक्ष असे राष्ट्रपतींसाठीचे खास कक्ष होते, जे अतिशय आरामदायी आणि वातानुकुलित होते. त्या डब्यात त्यांचे छोटेखानी कार्यालयही (स्टडी) होते.

दुसऱ्या डब्यात स्वयंपाकघर होते. प्रवासाच्यावेळी राष्ट्रपतींबरोबर असणारे त्यांचे सचिव आणि कर्मचारी यांच्यासाठीही वेगवेगळे कक्ष त्या डब्यात होते. मजबूत, टिकाऊ लाकडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या डब्यांच्या अंतर्गत सजावटीसाठी उंची लाकूड आणि रेशमी कापड वापरण्यात आले होते. त्यात आकर्षक दिवे लावलेले होते. त्यामुळे ते विशेष डबे चालते-फिरते राष्ट्रपती भवनच बनले होते.

राष्ट्रपतींसाठीच्या त्या खास डब्यांना 9000 आणि 9001 असे खास क्रमांक देण्यात आले होते. सत्तरच्या दशकापर्यंत प्रत्येक राष्ट्रपती नियमितपणे करत असत. प्रत्येक राष्ट्रपती आपला कार्यकाळ संपल्यावर या डब्यांमधून नवी दिल्लीहून आपल्या गावी जात असे. अशा प्रकारे या खास डब्यांचा शेवटचा वापर 1977 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. फकरुद्दीन अली अहमद यांनी केला होता. त्याच वर्षी अधिकृत दौऱ्यासाठी त्या खास डब्यांचा वापर डॉ. नीलम संजीव रेड्डी यांनी केल्यानंतर अनेक वर्षे ते डबे नवी दिल्ली स्टेशनवर वापराविना तसेच उभे होते. हा वापर बंद होण्यासाठी राष्ट्रपतींची सुरक्षा आणि संचालनविषयक अन्य बाबी कारणीभूत ठरल्या होत्या. मात्र त्या काळातही त्या डब्यांची नियमित देखभाल होतच राहिली.

1977 नंतर थेट 2003 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतींसाठीच्या खास डब्यांमधून प्रवास केला. त्या वर्षी 30 मे रोजी त्यांनी बिहारमधील हरनौत येथे रेल्वेच्या एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी पाटणा ते हरनौत असा 60 किलोमीटरचा आणि त्यानंतर काही दिवसांनी चंदिगड ते नवी दिल्ली असासुद्धा प्रवास केला होता. त्यावेळी या डब्यांचे आधुनिकीकरण करून त्यात उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवेसारख्या आधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. तरी ते डबे 1956 मध्ये तयार करण्यात आलेले असल्यामुळे त्यांचे आयुर्मान संपले होतेच; शिवाय त्यांचे आणखी आधुनिकीकरण करणेही शक्य नव्हते. तसेच आजच्या काळात ते अधिक गतीने धावू शकणार नव्हते. या सगळ्या तांत्रिक बाबी विचारात घेऊन 2008 मध्ये ते डबे सेवेतून काढून टाकण्यात आले.

      राष्ट्रपतींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विशेष रेल्वे डबे बांधण्याचा प्रस्ताव 2017 मध्ये विद्यमान राष्ट्रपतींच्या समोर ठेवण्यात आला होता. पण राष्ट्रपतींकडून त्याला मंजुरी मिळू शकली नाही. त्या दोन डब्यांसाठी सुमारे 8 कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र पुढे हा विचार मागे पडला. राष्ट्रपतींसाठी 1956 मध्ये खास बांधण्यात आलेल्या डब्यांची जोडी आता दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत.



टिप्पण्या

  1. छान माहिती मिळाली रेल्वेच्या विशेष डब्यांची.
    - सतीश khidaki.blogspot.com

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा