शेवटच्या प्रवासाच्या आठवणीत रममाण! (भाग-1)

 


      पुणे आणि सिकंदराबाददरम्यान धावणारी शताब्दी एक्सप्रेस 20 मार्च 2020 पासून बंद आहे. COVID-19 च्या साथीच्या सुरुवातीच्या काळात प्रवाशांनी लांबच्या प्रवासाकडे पाठ फिरवल्यामुळे आधी ही गाडी 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात आली होती. पण त्यानंतर लॉकडाऊनमुळे ही गाडी बंद झाली ती आजतागायत बंदच आहे. 2022 मध्ये सर्व सुरळीत सुरू झाल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ही शताब्दी पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत होती; पण 2022 चा सुट्ट्यांचा हंगाम संपल्यानंतरही ही शताब्दी सुरू झालेली नाही. जुलैमध्ये देशात पुन्हा धावायला लागणाऱ्या गाड्यांच्या यादीत या शताब्दीचं नाव नाही. ही शताब्दी सुरू होण्याची वाट पाहून मीसुद्धा कंटाळलो आणि या शताब्दीनं मी केलेल्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो.

      पुण्याहून सिकंदराबादपर्यंत शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करण्याचा बेत आखला आणि दिवस निश्चित केला. मधला दिवस असल्याने आणि परीक्षांचे दिवस असल्याने आरक्षणही भरपूर शिल्लक होतं. शताब्दीतून फेरफटका मारायचा असल्याने पहाटे पुण्याहून निघून लगेच त्याच गाडीने परत पुण्यात यायचं होतं. असं मागं दोनवेळा केलेलं होतंच. अशा प्रवासानंतर खरंच प्रचंड उत्साही आणि समाधानी वाटतं. या दोन्ही बाबी इतर कशातूनही मिळतील असं मला वाटत नाही.

      शताब्दी पहाटे 5.50 ला पुणे जंक्शन सोडते. ही मध्य रेल्वेची एकुलती एक शताब्दी असल्यामुळं ही गाडी स्वच्छ, सुंदर ठेवण्याकडे आणि तिची सेवा कशी चांगली ठेवता येईल याकडे मध्य रेल्वेही जरा जास्तच लक्ष देत असते. नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी सुटायच्या आधी तासभर मी पुणे जंक्शनवर पोहचलो. बाहेरून एक गाडी दोन नंबरवर उभी दिसली. ती होती पुणे निझामुद्दिन होळी विशेष एसी एकस्प्रेस. सव्वापाचची तिची वेळ होती. त्यामुळे गाडी सुटण्याआधीची प्रवाशांची आणि रेल्वेचीही लगभग दिसत होती. ही गाडी सुटेपर्यंत मी त्याच फलाटावर रेंगाळून मग पाच नंबरवर शताब्दीच्या फलाटावर गेलो. गाडी लागली होतीच, आयआरसीटीसीच्या खानपान सेवेच्या कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होतीच गाडीत सकाळचा पहिला चहा आणि नाश्ता, पाण्याच्या बाटल्या चढवण्याची. आमचा कार्यअश्वही (इंजिन) गाडीजवळ येत होता. आज नेहमीच्या गुत्ती शेडच्याऐवजी पुण्याचा WDP-4D हा कार्यअश्व आमच्या शताब्दीचं सिकंदराबादपर्यंत सारथ्य करणार होता. त्याला शताब्दीशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मग लोको पायलट-मेल डॉक्युमेंटेशन करत होता. कॉशन ऑर्डरवर वगैरे नजर फिरवत होता, तोवर असिस्टंट लोको पायलट या कार्यअश्वाची तब्येत पुन्हा एकदा तपासून पाहत होता आणि सगळं ठीक असल्याची खात्री करून घेत होता. इकडे हे सगळ होत असताना इंजिनाला लागून असलेल्या पहिल्या ब्रेक लगेज एवं जनरेटर यानात पार्सल चढवणं सुरू होतं. त्यातली काही पार्सल सिकंदराबादला, तर काही सिकंदराबाद मार्गे पुढेही जाणार होती. पार्सल चढवून झाल्यावर त्या डब्याचा दरवाजा बंद करून लॉक केला गेला आणि बारीकशा तारेने बांधून रेल्वेच्या विशिष्ट पद्धतीनुसार त्याला सील केलं गेलं. इकडे घड्याळात 5.40 होऊन गेले होते. आता रेल्वेचा कर्मचारी BPCवर गार्डची सही घेऊन आला आणि ते पुस्तक त्याने आमच्या लोको पायलट-मेलकडे दिले. त्यावर लोको पायलटने इंजिनातील ब्रेक पॉवरचं रिडिंग लिहिलं आणि नंतर तो कागद त्या कर्मचाऱ्याने लोको पायलटकडे दिला. अशा रितीने शताब्दी सुटण्याआधीची फलाटावरची सर्व प्राथमिक काही वेळातच ती जोडणी पूर्ण झाल्यावर मी माझ्या जागेवर बसायला गेलो. डबा पुढेच होता. दोनच महिन्यात तो पुन्हा पूर्ण overhaul करण्यासाठी जाणार होता. रेल्वेच्या 2016 मधल्या ऑपरेशन सुवर्णमधून या शताब्दीच्या डब्यांच्या अंतर्गत रचनेत सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक सीटच्या प्रवाशाच्या डोके टेकण्याच्या बाजूला बदलता येणारी पोपटी रंगाची कव्हर्स लावली होती. ती काढून आता हिरव्या रंगाची सीटच्या वरच्या बाजूला पूर्ण कव्हर्स घातली गेली आहेत.

      गाडी मोकळी असल्यामुळे तिघांच्या सीटवर शेवटपर्यंत मी एकटाच होतो. बरोबर 5.50 ला शताब्दी निघाली. त्याआधी काहीच मिनिटं कर्जतकडून WAG-9 कार्यअश्वासह आलेली BTPN (पेट्रोल) वाघिण्यांची मालगाडी मेन डाऊन लाईनवर उभी राहिली होती. शताब्दीला पुण्याबाहेर पडण्यासाठीचा रुट सेट करून सिग्नल ऑफ केल्यामुळे (पिवळा) त्या मालगाडीला थांबावं लागलं होतं. तसं शताब्दीला त्या मालगाडीपेक्षा जास्त प्राधान्य मिळणार होतंच. लगेचच पोलिसांची गस्तही सुरू झाली होती.

      पाचच मिनिटांत आमच्या डब्यातील खानपान सेवेचे कर्मचारी सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या देऊन गेले. माझ्या पुढच्या रांगेतील आसनावर बसलेल्या एकाने त्याला सांगितले मी माझी बाटली आणली आहे, ही नको मला आणि मग तो तोंडाला मास्क लावून आणि हातमोजे घालून बसला. कोरोनाची भिती! एव्हाना गाडी लोणीच्या पुढे आली होती आणि शताब्दीनं चांगला वेगही घेतला होता. डब्याच्या आतील घडामोडी पाहता पाहता बाहेरच्या रेल्वेच्या हालचालींकडेही माझे स्वभावतःच लक्ष होते. बाहेर अजून उजाडलेलं नव्हतं, पण रेल्वेच्या हालचाली दिसत होत्या. वाटेत हडपसरला बीसीएन वाघिण्यांची मालगाडी विजेवरच्या इंजिनासह पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी सिग्नलची वाट बघत उभी होती. पुण्यातील नियंत्रकानेच ही गाडी तेथे थांबवून ठेवून प्रवासी गाड्यांना पुढे सोडण्याची सूचना हडपसरच्या स्टेशन मास्तरला केली होती. पुढे तीनच मिनिटांनी 12150 दानापूर-पुणे एक्सप्रेस आम्हाला क्रॉस झाली. त्यावेळी ती गाडी आणि शताब्दी यांच्या लोको पायलट आणि गार्ड यांच्यात नियमानुसार सिग्नलची देवाणघेवाण झाली. त्यापाठोपाठ पाचच मिनिटांनी 71416 सोलापूर-पुणे डेमू क्रॉस झाली. पुढे उरुळीमध्ये शताब्दी जरा हळू धावू लागली. शताब्दीच्या पलीकडच्या लाईनवर तपकिरी रंगाच्या दोन WAG-5 अश्वांसह बीसीएन वाघिण्यांची एक मालगाडी पुण्याकडे जाण्यासाठी सिग्नलची वाट बघत उभी होती. विभाग नियंत्रकाने (Section Controller) ही गाडी बाजूला उभी करून प्रवासी गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्याची सूचना केली होती. सकाळच्यावेळी पुण्याकडे येणाऱ्या प्रवासीगाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे मालगाड्यांना बाजूला ठेवावे लागत होते.

उरुळीनंतर शताब्दीने पुन्हा वेग घेतला. आता खानपानवाल्यांनी सर्वांना इंग्रजी वृत्तपत्र दिले. माझ्या समोरच्या रांगेतील बाईंना मराठी वृत्तपत्र हवे होते. त्यांनी त्याला सांगितल्यावर त्यानं दुसरीकडून आणून दिलं. हातमोजे घालून बसलेल्यानं तेही नको म्हणून सांगितले. पुढच्याच यवत स्थानकात आमच्या वाटेत येणारी दौंडच्या दिशेने जाणारी WAG-9 इंजिनासह धावत असलेली बीसीएन वाघिण्यांची मालगाडी नियंत्रकाच्या सांगण्यावरून रोखून धरण्यात आली होती. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने जाणारी बीसीएन वाघिण्यांची एक मालगाडीही अप मेन लाईनवर थांबवून ठेवण्यात आली होती. तोपर्यंत डब्यात तपासनीसही आला होता हातात टॅब घेऊन.

Morning Tea Kit
आमची सर्वांची तिकिटे तपासून होत असतानाच सकाळच्या चहाचं किट दिलं गेलं, बिस्किटे, चहा-साखर-दूध पावडरचे सॅशे आणि थर्मासमध्ये गरम पाणी. त्या मास्क घालून बसलेल्यानं चहा नको म्हणून सांगितलं. आता बाहेर हळूच उजाडायला लागलं. त्यावेळी बाहेर गच्च धुकं असल्याचं दिसलं. या धुक्यातून वाट काढत जाणाऱ्या शताब्दीत बसून गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच! सहा बत्तीसला केडगाव ओलांडताना शताब्दीचा वेग कमी होता. कारण डाऊन मेन लाईनवर दौंडकडे जात असलेली कंटेनरची मालगाडी रोखून धरली होती आमच्यासाठी. त्यामुळे शताब्दीला लूप लाईनवरून पुढे जाण्यावाचून पर्याय नव्हता. त्या मालगाडीला भेल कंपनीने तयार केलेल्या तीन रंगांच्या आणि WAP-4 इंजिनाप्रमाणे ठेवण असलेले WAG-7 इंजिन जोडलेले होते. स्थानकातील या परिस्थितीची जाणीव लोको पायलटला केडगावच्या डिस्टंट सिग्नलपासूनच येत होती. कारण तो सिग्नल डबल यलो होता. त्यामुळे त्याने गाडीचा वेग कमी केला होताच. पुढे केडगावच्या होम सिग्नल पिवळा होता आणि त्यावरील रुट सिग्नलही लूपवरून जायचे असल्याचे दर्शवत होता. मात्र पुढेही गच्च धुक्यामुळे शताब्दी अपेक्षित वेग घेऊ शकली नाही. पावणेसात झाले होते. पाटस आले होते. तेथे डेमूचा रिकामा रेक लूप लाईनवर WAG-9 इंजिनासह शताब्दी पुढे जाण्याची वाट बघत उभा होता. आता सगळ्यांचा चहा घेऊन झाला होता आणि डब्यातल्या आणखी काही प्रवाशांनीही मास्क लावला होता.

आता काकीनाडा पोर्ट-लोकमान्य टिळक (ट) एक्सप्रेस WDP-4D इंजिनासह पुण्याच्या दिशेने निघून गेली. धुकं कमी झालं असलं तरी दौंडचा होम सिग्नल ऑन असल्यामुळं आधी हळुहळू जात असलेली शताब्दी पुढे 3 मिनिटं थांबली. तो सिग्नल हिरवा झाल्यावर दौंडमध्ये शताब्दी शिरली. दौंडच्या होम सिग्नलच्या थोडं पुढेच नवीन बायपास लाईन आणि फलाट उभारण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर थोड्याच अंतरावर WAP-4 इंजिनाबरोबर धावत असलेली 22132 ज्ञानगंगा एक्सप्रेस फलाटाच्या पुढे थांबलेली होती. शताब्दीच्या मार्गाला ओलांडून तिला पलीकडे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जायचे होते. तोवर पाच नंबरच्या फलाटाच्या पलीकडे कंटेनरची मालगाडी (बीएलसी वाघिण्यांची) पुण्याकडे जाण्यासाठी सिग्नलची वाट बघत उभी होती. त्याचवेळी 4 नंबरवर दौंड-पुणे सवारी (पॅसेंजर) उभी होती. एक नंबरच्या पलीकडच्या जागेत वेगवेगळे अश्व आपली ड्युटी येऊपर्यंत विश्रांती घेत होते. अखेर 7-04 ला दौंड जंक्शन ओलांडले. दौंडनंतर शताब्दीने परत वेग घेतला.


(क्रमश:)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा