मुंबई-पेशावर पंजाब मेल


मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल (2018)


                मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज (ट) आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी पंजाब मेल येत्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी 1 जून 1912 रोजी सुरू करण्यात आली, असं मानलं जातं. त्यावेळी ती गाडी व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती. तत्कालीन ग्रेट इंडियन पेनिनसुलार रेल्वे कंपनीने (जी. आय. पी. आर.) ही रेल्वेगाडी सुरू केली होती. स्वातंत्र्यानंतर फाळणीमुळे वायव्य सीमांत प्रांत पाकिस्तानात गेल्यावर पंजाब मेल मुंबई आणि भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या पंजाबमधील फिरोजपूर कँटदरम्यान धावत आहे.

      मुंबईहून पंजाब मेल सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. त्यामुळे 1911 मधील भारत सरकारचा आर्थिक लेखाजोखा आणि दिल्लीला ही गाडी उशिरा पोहचल्यामुळे संतापलेल्या एका प्रवाशाने ऑक्टोबर 1912 मध्ये लिहिलेल्या तक्रारवजा पत्राच्या आधारावर पंजाब मेल सुरू होण्याची तारीख 1 जून 1912 अशी असावी, असे भारतीय रेल्वेनेही गृहीत धरलेले आहे. पण उपलब्ध असलेल्या अन्य काही पुराव्यांच्या आधारे ही गाडी 1889 मध्ये सुरू झाल्याचे लक्षात येते.

ब्रिटनहून भारतात नियुक्तीवर आलेल्या आणि पुढे दिल्ली, पंजाब आणि वायव्य भारतातील प्रांतांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी जाणाऱ्या आणि आपल्या भारतातील नियुक्तीचा काळ संपवून ब्रिटनला परतत असलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे लंडन आणि मुंबईदरम्यान ये-जा करणाऱ्या पी. अँड ओ स्टीमर कंपनीच्या जहाजाच्या वेळापत्रकानुसार पंजाब मेलचे वेळापत्रक ठरवण्यात आले होते. हे जहाज दर पंधरवड्याला मुंबईला येत असे. त्यातून आलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना, युरोपियनांना आणि रॉयल मेल घेण्यासाठी पंजाब मेल मोल स्थानकातून पेशावरकडे निघत असे. 1930 पर्यंत व्हिक्टोरिया टर्मिनसच्या पुढे मुंबई बंदरात बॅलार्ड पिअरजवळ मोल स्थानक होते. 1930 नंतर पंजाब मेल व्हिक्टोरिया टर्मिनसमधूनच आपला प्रवास सुरू करू लागली.

      ब्रिटनचा तत्कालीन राजा जॉर्ज (पंचम) याने 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीत भरलेल्या विशेष दिल्ली दरबारात अखंड भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित झाल्याचे घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईहून वायव्य भारतासाठी सुरू करण्यात आलेल्या या आलिशान रेल्वेगाडीमुळे मुंबई आणि भारताच्या नव्या राजधानीदरम्यान वेगवान सेवा देता येऊ शकेल, असाही विचार करण्यात आला होता. सुरुवातीची काही वर्षे पंजाब मेल Bombay Punjab Service या नावाने ओळखली जात होती. साहेबाची गाडी असल्याने या गाडीत अनेक सुविधा पुरवल्या गेल्या होत्या. प्रवास लांबचा असल्यामुळे यात साहेबांसाठी स्नानगृह, भोजनकक्षही उपलब्ध होते. त्यावेळी पंजाब मेल अवघी सात डब्यांची होती. त्यात ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी प्रथम श्रेणीचे तीन, त्यांच्या नोकरांसाठी तृतीय श्रेणीचा एक आणि रॉयल मेलसाठी तीन डब्यांचा समावेश होता.

      देशातील अनेक स्थित्यंतराची साक्षीदार ठरलेल्या पंजाब मेलने गेल्या 110 वर्षांच्या वाटचालीत स्वत:तही बरेच बदल पाहिले आहेत. स्वातंत्र्यानंतर ही रेल्वेगाडी सामान्य जनतेच्या सेवेत रुजू झाली; पण त्याचवेळी या रेल्वेगाडीत मिळणाऱ्या खास सोयी आणि गाडीचा विशेष दर्जाही काढून घेतला गेला. परिणामी पंजाब मेल अन्य मेल/एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच बनली. तरीही पंजाब मेलची गर्दी वाढतच राहिल्याने तिची सेवा दररोज उपलब्ध करून देण्यात आली. तसेच या गाडीला 19 डबे जोडले जाऊ लागले. तरीही प्रतीक्षा यादीची लांबी फारशी कमी न झाल्याने 2008 पासून पंजाब मेल 24 डब्यांची झाली. 2020 पासून पंजाब मेल 22 अत्याधुनिक एलएचबी डब्यांसह धावत असून मुंबई आणि भटिंडादरम्यान ती HOG तंत्रज्ञानावर चालवली जात आहे.

      1929 पर्यंत पंजाब मेलला पूर्ण प्रवासात वाफेचे इंजिन जोडले जात असे. पण कसारा आणि इगतपुरीदरम्यानच्या थळ घाटातील बोगद्यांमधून जात असताना या गाडीतील प्रवाशांना इंजिनाच्या धुराचा त्रास होत असे. त्याबाबत त्यांनी जी. आय. पी.कडे सतत तक्रारीही केल्या होत्या. या सर्व बाबींची दखल घेऊन जी. आय. पी.ने मुंबईहून इगतपुरी आणि पुण्यादरम्यानच्या लोहमार्गांचे 1929-30 मध्ये विद्युतीकरण केले आणि 1930 पासून पंजाब मेलचा मुंबई ते इगतपुरीदरम्यानचा प्रवास ई/ए-1 विद्युत इंजिनाच्या मदतीने होऊ लागला. पुढे नव्वदच्या दशकाच्या अखेरीपर्यंत डब्ल्यूसीएमश्रेणीतील विद्युत इंजिन पंजाब मेलला जोडले जात होते. इगतपुरीला आल्यावर तिचे विद्युत इंजिन बदलून वाफेचे इंजिन जोडले जाऊ लागले. मुंबई-दिल्लीदरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले तरीही पंजाब मेलचे इंजिन 2012 पर्यंत इगतपुरीला बदलावे लागत होते. कारण तोपर्यंत मुंबई-इगतपुरी लोहमार्गावर 1500 व्होल्ट्स डी.सी. कर्षण (traction) प्रणाली वापरली जात होती. तिचे 25,000 व्होल्ट्स ए.सी. प्रणालीत रुपांतर पूर्ण झाल्यावर पंजाब मेलचे इंजिन इगतपुरीत बदलण्याची आवश्यकता राहिली नाही. आज मुंबई-भटिंडादरम्यान तिचे सारथ्य विद्युत इंजिनाकडे आणि भटिंडा-फिरोजपूर कँटदरम्यान डिझेल इंजिनाकडे असते.

      स्वातंत्र्यापर्यंत पंजाब मेल भारतातील प्रतिष्ठीत रेल्वेगाड्यांपैकी एक होती. त्यामुळे तिच्या मार्गात येणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांना बाजूला उभे करून या गाडीला प्राधान्य दिले जात असे. नव्वदच्या दशकात पंजाब मेलला अतिजलद रेल्वेगाडीचा दर्जा दिला गेला. आज 110 वर्षांनंतरही पंजाब मेल भारतातील लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा