अपरिचित पोलो

 

(PIB Photo)

      भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत.

      पोलो आशिया खंडात जवळजवळ सर्वच देशांमध्ये फार पूर्वीपासून खेळला जात आहे. इ.स. पूर्व 6 व्या ते इ.स. पहिल्या शतकादरम्यान पर्शियामध्ये हा खेळ खेळला जात असल्याचे उल्लेख आढळतात. त्यावेळी घोडदळातील जवानांना प्रशिक्षण दिले जात असताना या खेळाची संकल्पना उदयाला आली, असे सांगितले जाते. त्या काळात राजा आणि राजघराण्यातील अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या शरीररक्षकांना खास प्रशिक्षण देण्यासाठी हा खेळ खेळला जात असे. कालांतराने पोलो हा इराणचा राष्ट्रीय खेळ बनला. इ.स. सहाव्या शतकात हा खेळ पर्शियन राजघराण्यात अतिशय प्रसिद्ध झाला होता.

      दुसरीकडे, भारतात मणिपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या सगोल कांग्जेई या क्रीडाप्रकाराला पोलोचे उगमस्थान मानले जाते. सगोल कांग्जेई हा क्रीडाप्रकार म्हणजे मणिपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या तीन प्रकारच्या हॉकी खेळांपैकीच एक क्रीडाप्रकार होता. मणिपूरमध्ये मार्जिंग (पंख असलेला घोडा) या पोलो देवतेची उपासना करणाऱ्या स्थानिक समुदायात हा खेळ खेळला जात असे. तसेच स्थानिक लाई हाराओबा उत्सवात पोलो खेळणाऱ्या खोरी फाबा या खेळाच्या देवाची पूजा केली जाते. यावरूनच पोलो हा प्राचीन मणिपुरी खेळ असून इ. स. पहिल्या शतकात त्याचा उदय झाल्याचे संकेत मिळतात. पोलोला मणिपुरी भाषेत सगोल कांग्जेई, कांजाई-बाझी किंवा पुलु म्हटले जात असे.

      मणिपूरमधील पारंपारिक पोलो खेळात दोन्ही संघांमध्ये सात-सात खेळाडू असतात. तेथे आढळणाऱ्या विशिष्ट शारीरिक ठेवणीच्या घोड्यांवर बसून हा खेळ खेळला जातो. आधुनिक पोलोप्रमाणे गोल करण्याची पद्धत या पारंपारिक पोलोमध्ये नाही, तर त्यामध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी घोड्यावर बसून लांब स्टिकच्या मदतीने चेंडू विरुद्ध संघाच्या बाजूकडील अंतिम रेषेपार नेणे आवश्यक असते. सामन्याच्यावेळी चेंडू उचलून नेण्याची आणि तसे करताना विरुद्ध संघाच्या खेळाडूंना त्याला थेट अडवण्याची परवानगी पारंपारिक पोलोमध्ये असे.

      पोलो खेळणे हे मणिपूरमध्ये श्रीमंतीचे प्रतीक मानले जात होते, तरी घोडे पाळलेले सामान्य लोकही हा खेळ खेळत असत. कांग्ला किल्ला येथील राजप्रासादात मणिपूरच्या राजांसाठीचे खास पोलो मैदान होते. याच किल्ल्याच्या बाहेर असलेल्या मैदानात पोलोचे सार्वजनिक सामने आजही भरवले जात आहेत.

      पोलो या खेळाला खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकार म्हणून मान्यता मिळाली ती भारतात ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर. ब्रिटिशांनी पोलोला आधुनिक, आंतरराष्ट्रीय स्वरुप दिले. त्यानंतर 1834 मध्ये आसाममधील सिल्चर येथे पहिला पोलो क्लब स्थापन झाला. 1860 च्या आसपास ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्यांनी हा खेळ ब्रिटनमध्ये नेल्यावर तेथे अनेक पोलो क्लब सुरू झाले. पुढे ब्रिटिशांनी या खेळात काही बदल करून त्याचा आपल्या अन्य वसाहतींमध्ये प्रसार सुरू केला. पण पोलोचा पाश्चात्य जगतात विस्तार जरा धीम्यागतीने होत राहिला. पुढील थोड्याच काळात या खेळाची नियमावली तयार होऊन हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाऊ लागला. सध्याच्या पोलोचे नियम पहिल्यांदाच ब्रिटनमधील हर्लिंगहॅम पोलो असोसिएशनने 1874 मध्ये तयार केले होते, पण त्यानंतर मणिपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या पोलोपेक्षा हा आधुनिक पोलो संथ बनला. परिणामी चपळता आणि घोडेस्वारीतील कौशल्यांचा अभाव या आधुनिक पोलोमध्ये दिसू लागला. संपूर्ण 19व्या शतकात या खेळावर भारतातील संस्थानिकांचे संघ आघाडीवर होते.

(PIB Photo)

      आज जगातील सर्वात जुने पोलोचे मैदान मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आहे. त्याची उभारणी ब्रिटिशांनी केल्याचे म्हटले जात असले तरी त्या आधीपासून म्हणजे इ.स. 33 पासून हे पोलोचे मैदान अस्तित्वात असल्याचा उल्लेख मणिपूरच्या राजेशाहीच्या बखरीमध्ये आढळतो. 19व्या शतकाच्या मध्यास ब्रिटीश लष्करातील अधिकारी असलेल्या लेफ्टनंट शेरर याने याच मैदानावर पोलो खेळून आधुनिक पोलोची सुरुवात केली होती. त्यामुळेच त्याला आधुनिक पोलोचा पिता म्हटले जाते. कोलकाता पोलो क्लब हा जगातील सर्वात जुना आणि आजही कार्यरत असलेला पोलो क्लब आहे. त्याची स्थापना 1862 मध्ये झाली होती.

      घोडदळातील जवानांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरलेला पोलो मध्ययुगात काँस्टँटिनोपलपासून जपानपर्यंत सर्वत्र खेळला जात असला तरी तो आधुनिक रुपात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला तो भारतातूनच. असे असूनही आजही भारतात पोलो या खेळाविषयी फारशी माहिती आणि आकर्षण दिसत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश भारत आणि ज्या संस्थानांमध्ये पोलो क्लब स्थापन झाले, तिथेच स्थानिक पातळीवर हा खेळ मर्यादित राहिलेला दिसतो.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा