50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

 

मुंबई सेट्रलहून निघालेली 12951 राजधानी एक्सप्रेस

(मुंबई राजधानीच्या सुवर्ण महोत्सवी समारंभावरचा माझा व्हिडिओ खालील लिंकवर आहे.)

https://www.youtube.com/watch?v=i4PjW7-GaBk 

                मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत.

      विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली. परिणामी विविध राज्यांच्या राजधान्यांपासून दिल्लीसाठी एकापाठोपाठ एक राजधानी एक्सप्रेस सुरू होत गेल्या. आज देशात 26 राजधानी एक्सप्रेस धावत आहेत. मुंबई आणि नवी दिल्लीदरम्यान धावणारी 12951/52 राजधानी त्यापैकीच एक.

      मुंबई आणि नवी दिल्ली या देशातील सर्वांत मोठ्या शहरांना कमीतकमी वेळेत जोडणारी राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेची एक प्रतिष्ठीत गाडी आहे. 17 मे 1972 ला ही गाडी सुरू झाली. त्यावेळी ही आठवड्यातून दोनदा धावत असे. कालांतराने वाढत्या मागणीमुळे ही गाडी आठवड्यातून 3 दिवस, 4 दिवस, सहा दिवस असं करत करत रोजच धावू लागली. सुरुवातीला 151 डाऊन आणि 152 अप असा गाडी क्रमांक असलेल्या मुंबई राजधानीचा क्रमांक जानेवारी 1989 पासून 2951/2952 आणि 10 डिसेंबर 2010 पासून 12951/12952 असा झाला आहे.

      काळानुरुप मुंबई राजधानी बदलत गेली आणि नवनव्या तंत्रज्ञानांचा स्वीकार करत गेली. त्यामुळे या गाडीकडे भारतीय रेल्वेच्या तांत्रिक प्रगतीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाऊ लागले. या गाडीचे गार्ड आणि चालक यांच्यादरम्यान दूरध्वनी संपर्क यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यानंतर या यंत्रणेत सुधारणा करून त्याद्वारे प्रवाशांना STD/ISD दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली. भारतीय रेल्वेवर चालत्या रेल्वेगाडीत अशा प्रकारची सेवा पहिल्यांदाच उपलब्ध झाली होती.

      लोकप्रियता वाढल्यामुळे सुरुवातीची 8 डब्यांची मुंबई राजधानी 1984 पासून 18 डब्यांची झाली. त्यावेळी या गाडीला भारतातच विशेष तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले डबे जोडले जात असत. प्रवाशांना आरामदायक प्रवास अनुभवता यावा यासाठी डब्याच्या अंतर्गत रचनेकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. वाढलेल्या डब्यांमुळे संपूर्ण गाडीतील वातानुकुलन यंत्रणा, दिवे, रसोई यानातील संयंत्रे आदी बाबींना विजपुरवठा करण्यासाठी डिझेल जनरेटरचे 3 डबे जोडणे आवश्यक झाले होते – दोन डबे गाडीच्या दोन्ही टोकांना आणि एक गाडीच्या मध्यभागी जोडला जात असे. मधला जनरेटरचा डबा ओलांडून दुसऱ्या डब्यात जाता येत नसल्यामुळे मुंबई राजधानीला एकाऐवजी दोन रसोई यान डबे (Pantry Car) जोडले जाऊ लागले. पुढे मुंबई राजधानीला वातानुकुलित 3-टियर शयनयान डबाही जोडला जाऊ लागला. तोपर्यंत या गाडीत वातानुकुलित प्रथम श्रेणी, वातानुकुलित 2-टियर शयनयान आणि वातानुकुलित खुर्ची यान श्रेणी उपलब्ध होती.

      नव्या शतकात मुंबई राजधानी अधिक आकर्षक स्वरुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. तेव्हापासून जर्मनीच्या Linke Hofmann Busch (LHB) कंपनीच्या (पुढे Alstom कंपनी) सहकार्याने बनवण्यात आलेले अधिक वेगवान, अधिक आरामदायी आणि अधिक प्रवासी क्षमतेचे अत्याधुनिक, आकर्षक डबे मुंबई राजधानीला जोडले जाऊ लागले आहेत. या डब्यांबरोबर धावण्याचा पहिला मान मुंबई राजधानीलाच मिळाला होता. यावेळी राजधानी एक्सप्रेसच्या पारंपारिक रंगसंगतीमध्येही बदल झाला. LHB डब्यांमुळे या गाडीला तीनएवजी दोनच जनरेटर यान जोडण्याची गरज राहिली. आज मुंबई राजधानी 1 वातानुकुलित प्रथम श्रेणी, 1 हॉट बुफे कार, 5 वातानुकुलित 2-टियर शयनयान, 11 वातानुकुलित 3-टियर शयनयान, 2 सामान ब्रेक आणि जनरेटर यान आणि 1 पार्सल यान अशा 21 डब्यांसह धावत आहे.

नव्या डब्यांमुळे मुंबई राजधानीचा वेग वाढण्यासही मदत झाली. आधीचा 19 तासांचा प्रवास आता 15 तास 40 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. आता या गाडीचा वेग वाढवण्याच्या हेतूने 1380 कि.मी. अंतराच्या मुंबई-दिल्ली लोहमार्गाचे आधुनिकीकरण सुरू आहे. येत्या काही वर्षांमध्ये ते काम पूर्ण झाल्यावर ही गाडी ताशी 160 कि.मी. वेगाने धावू शकेल. परिणामी तिचा प्रवासाचा कालावधी 12 तासांपर्यंत खाली येऊ शकेल. त्याचबरोबर भविष्यात ही गाडी ताशी 200 कि.मी. वेगाने चालवण्याचा विचार आहे. तसे झाल्यास हे अंतर मुंबई राजधानी 8 तासांमध्ये कापू शकेल. या प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल म्हणून मुंबई राजधानीच्या ताशी 145 कि.मी. वेगाच्या चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या गाडीचे संचालन अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी ही गाडी ढकल-ओढ तंत्राद्वारे (Push-Pull) चालवण्यात आली होती.

      प्रवाशांच्या मागणीमुळे मुंबई राजधानीला 2006 पासून सुरतमध्येही थांबा देण्यात आला. तोपर्यंत ती संपूर्ण प्रवासात तीनच थांबे घेत होती. सध्या ती बोरिवली, सुरत, बडोदा, रतलाम, नागदा, कोटा हे थांबे घेते. 19 जुलै 2021 पासून मुंबई राजधानीला अत्याधुनिक तेजस डबे जोडले जाऊ लागले आहेत. त्यामुळे ती आता मुंबई तेजस राजधानी बनली आहे. यावेळी राजधानीची रंगसंगती पुन्हा एकदा बदलली गेली आहे. या डब्यांमध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत.

      मुंबई राजधानीमध्ये सुरुवातीची बरीच वर्षे Public Announcement System वरून गाडी धावत असताना आसपासच्या परिसराची माहिती देण्यात येत असे. आज या यंत्रणेद्वारे प्रवाशांना soft music, बातम्या ऐकवल्या जात असून प्रवाशांसाठी उद्घोषणाही केल्या जातात. मध्यंतरी काही वर्षे मुंबई राजधानीच्या प्रवाशांना गाडीत वाचण्यासाठी रेलबंधू हे मासिक पुरवले जात असे.

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि विरारदरम्यानची 1500 व्होल्ट्स डी.सी. विद्य़ुत कर्षणप्रणाली (Traction system) 25 के.व्ही. ए.सी.मध्ये रुपांतरित करण्यात आली. त्यामुळे मुंबई राजधानीचा वेग अधिक वाढला. तसेच संपूर्ण मार्गावर एकच कर्षणप्रणाली अस्तित्वात आल्यामुळे या गाडीचा कार्यअश्व (Locomotive) बडोद्यात बदलण्याची आवश्यकता राहिली नाही. तोवर या गाडीचे सारथ्य मुंबई-बडोद्यादरम्यान वलसाडचा WCAM-2P हा कार्यअश्व, तर बडोदा-दिल्लीदरम्यान गाझियाबादचा WAP-1  आणि काही वर्षांनंतर WAP-7 हा कार्यअश्व करत होता. त्याआधी नव्वदच्या दशकापर्यंत या गाडीला WDM-2 इंजिनच जोडले जात असे. आता बडोद्याचा WAP-7 हा अत्याधुनिक कार्यअश्व मुंबई राजधानीला जोडला जात असून त्याच्यातूनच HOG तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण गाडीला विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आता मुंबई राजधानी पर्यावरणपूरकही झाली आहे. अपघात रोखण्यासाठी या गाडीच्या इंजिनांमध्ये Train Protection and Warning System ही बसवण्यात आली आहे.

अशा या मुंबई राजधानीची लोकप्रियता भविष्यातही टिकून राहणार आहे.

मुंबई राजधानीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने खालील लिंकवर प्रकाशित व्हिडिओ पाहायला विसरू नका.

https://youtu.be/I3pyay5-C_8 

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर लेख

    उत्तर द्याहटवा
  2. मुंबई राजधानीच्या सुवर्ण महोत्सवी समारंभावरचा माझा व्हिडिओ खालील लिंकवर आहे.

    https://youtu.be/i4PjW7-GaBk

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा