फ्रेंच राष्ट्रपतींचा प्रासाद

  

एलिसे राजवाडा (फोटो-Palais de l'Elysée - Journées du Patrimoine 2014 001
 - Élysée Palace - Wikipedia
)

     येत्या 10 एप्रिलला फ्रांसमध्ये राष्ट्रपतिपदासाठी निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये विद्यमान राष्ट्रपती एमानुएल मॅक्राँ, मारिने लि-पेन आणि जीन ल्युक-मेलिंचोन या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. त्या निवडणुकांनंतर फ्रेंच राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या पॅरिसमधील ऐतिहासिक एलिझे पॅलेसमध्ये (Elysee Palace) कोण प्रवेश करणार आहे हे स्पष्ट होईल. याच वर्षी फ्रेंच राष्ट्रपतींच्या या अधिकृत निवासस्थानाच्या बांधणीला 300 वर्षे पूर्ण होत आहेत.

      पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर दआउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते.

      अठराव्या शतकात त्या टाऊन हॉलच्या जागी 1718 ते 1722 दरम्यान Louis Henri de La Tour d’Auvergne या फ्रेंच भूदलातील अधिकाऱ्यासाठी आलिशान निवासस्थान बांधले गेले. 18व्या शतकाच्या मध्यावर पंधराव्या लुईने मादाम दी पोम्पादौर हिच्यासाठी हा राजवाडा विकत घेतला. त्यानंतर तिने यातील स्टेट चेंबर आणि पहिल्या मजल्याचे नुतनीकरण करवून घेतले होते. त्यावेळी पौम्पादौरने खास स्वत:साठी उभारलेला दिवाणखाना आजही तिच्याच नावाने ओळखला जात आहे. तसेच तिने उद्यानामध्ये धबधबे, प्रवेशद्वार इत्यादी सुधारणा करवून घेतल्या होत्या. तिने आपल्या मृत्युपत्रात असे लिहून ठेवले होते की, आपल्या मृत्यूनंतर हा राजवाडा पंधरावा लुई याला दिला जावा. लुईनंतर 1773 मध्ये हे निवासस्थान निकोलस ब्युजॉन याने विकत घेतल्यावर त्याने येथे सुंदर भित्तिचित्रांचे एक कलादालन साकारले.

      पुढे सोळाव्या लुईकडे या निवासस्थानाची मालकी आल्यावर येथे विशेष राजदुतांच्या निवासाची सोय करण्यात आली होती. 1787 मध्ये त्याने आपली चुलत बहीण डचेस ऑफ बोउर्बोन हिला हे निवासस्थान विकले. पण 1789 च्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर 1793 मध्ये डचेसला अटक झाली आणि नव्या राजवटीने या इमारतीमध्ये आपले वेगवेगळे विभाग सुरू केले. त्यानंतर या इमारतीतील काही भाग समाजातील प्रतिष्ठीत लोकांसाठी खुला करण्यात आला आणि या वास्तूचे नामकरण एलिसे (Elysee) असे झाले. एलिसे याचा अर्थ नंदनवन किंवा स्वर्ग असा होतो. रशियातील कोसॅक्स (Cossacks) लोकांनी 1814 मध्ये पॅरिसवर ताबा मिळवला होता, तेव्हा त्यांनी एलिसे राजवाड्यात काही काळ आपला तळ केला होता. त्यानंतर या वास्तूची मालकी त्यांनी पुन्हा तिच्या मूळ मालकिणीकडे डचेस दे बोउर्बोन हिच्याकडे सोपवली. तिने ही वास्तू 1816 मध्ये लुई (अठरावा) याला विकली.

राजघराण्याकडे या वास्तूची पूर्णपणे मालकी आल्यावर तिला राजवाड्याचे महत्व आले. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत या राजवाड्यात पॅरिसमध्ये आलेल्या परदेशी राजकीय पाहुण्यांची राहण्याची सोय केली जात असे.

अगदी सुरुवातीच्या काळातच राजवाड्याच्या उद्यानाच्या भोवतीने पिवळसर दगडातील नक्षीदार संरक्षक भिंत आणि कमानदार प्रवेशद्वार उभारले गेले. राजवाड्याच्या समोरच्या दर्शनी बाजूला एक पटांगण असून त्याच्या भोवतीने एक मजली इमारत तटबंदीसारखी उभारलेली आहे. त्याच्या मध्यभागी एक प्रवेशद्वार आहे. या पटांगणातच फ्रांसचे राष्ट्रपती परदेशी नेत्यांचे अधिकृतपणे स्वागत करत असतात. त्यानंतर त्यांची फ्रेंच राष्ट्रपतींशी भेट Hall of Honour मध्ये पार पडते.

      एलिसे राजवाड्याच्या वास्तुसंकुलात तीन मजली मुख्य मध्यवर्ती इमारत आणि तिच्या पटांगणाच्या भोवतीने असलेल्या एक-एक मजली इमारतींचा समावेश होतो. या संकुलातील सर्व कक्षांना मोठमोठ्या खिडक्या केलेल्या आहेत. मध्यवर्ती इमारतीतील Ceremonial Lounge हा एक महत्वाचा कक्ष आहे. 1889 मध्ये उभारलेल्या या कक्षात नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी, फ्रांसच्या राजकीय भेटीवर आलेल्या परदेशी राष्ट्रप्रमुखाला फ्रेंच राष्ट्रपतींनी दिलेली मेजवानी, राष्ट्रपतींनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली ख्रिसमस पार्टी असे बरेच समारंभ पार पडत असतात. या संपूर्ण कक्षात लाल रंगाचा नक्षीदार गालिचा अंथरेलला असून सर्व बाजूंच्या भिंती आणि छतावरही अनेक अप्रतिम चित्रे रेखाटलेली आहेत. येथे अनेक झुंबरेही लावलेली आहेत. एकूणच हा कक्ष आलिशान असाच आहे. या कक्षाला माजी राष्ट्रपती मितराँ यांनी आणखी खिडक्या करून अधिक हवेशीर बनवले होते.

Lounge of Ambassadors
 (Photo-Salon des Ambassadeurs 2
 - Élysée Palace - Wikipedia
)

      एलिसे राजवाड्यातील आणखी एक आकर्षक कक्ष आहे Lounge of the Ambassadors. या कक्षातच राष्ट्रपती फ्रांसमध्ये नियुक्तीवर आलेल्या विविध देशांच्या नव्या राजदुतांकडून परिचयपत्र स्वीकारत असतात. या कक्षाच्या सफेद भिंतींवर सोनेरी कलाकुसर केलेली असून मोठमोठे आरसेही लावलेले आहेत. खाली नक्षीदार गालिचा, त्यावर ठेवलेल्या सोनेरी मुलाम्यातील लाकडी खुर्च्या आणि मेज तसेच छतावरची चित्रं आणि झुंबरं, यामुळे हा कक्षही आलिशान बनला आहे. राष्ट्रपतींचे कार्यालय आणि खासगी कक्ष, Lounge of Portraits, Salon Murat, नेपोलियन (तिसरा) हे ग्रंथालय असे अनेक महत्वाचे आकर्षक कक्ष या राजवाड्यात आहेत.

      आज फ्रांसला पाचवे प्रजासत्ताक म्हणून ओळखले जाते. 1789मधील राज्यक्रांतीनंतर फ्रांसमध्ये प्रजासत्ताक राज्यपद्धती स्थापन झाली असली तरी पुढील काळात विविध कारणांमुळे फ्रेंच राज्यघटना पाचवेळा नव्याने लिहिली गेली. त्या प्रत्येकवेळी नव्या प्रजासत्ताकाचीही स्थापना होत राहिली. यापैकी दुसऱ्या प्रजासत्ताकाच्यावेळी एलिसे राजवाड्याचे नाव एलिसे नात्सिओनाल (Elysee National) असे करण्यात आले आणि राजवाड्याचे उद्यान सामान्य जनतेसाठीही खुले करण्यात आले. त्यानंतर लगेचच फ्रांसच्या नॅशनल सेंब्लीच्या 12 डिसेंबर 1848 च्या अध्यादेशाने हा राजवाडा फ्रांसच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान बनला. त्यानंतर राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या चार्लेस लुईस नेपोलियन बोनापार्ट (नेपालियन-तिसरा) याने या नव्या प्रासादात प्रवेश केला आणि पुढे त्याने एलिसे राजवाड्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्याचा आदेश दिला. नुतनीकरणाचे ते काम पुढे 14 वर्षे चालले होते. त्यावेळी योसेफ लाक्रॉईक्स याने एलिसे राजवाड्याचे जे आरेखन केले होते ते आजवर बहुतांश प्रमाणात कायम आहे.

      फ्रेंच राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान बनल्यावर एलिसे राजवाड्यात परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या आणि पाहुण्यांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे 1889 मध्ये येथे एक मोठा स्वागतकक्ष उभारावा लागला. तसेच वीज, दूरध्वनी, सेंट्रल हिटींग यांसारख्या आधुनिक सुविधाही येथे पुरवल्या गेल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या सध्याच्या पाचव्या प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींच्या नव्या गरजा लक्षात घेऊन

एलिसे राजवाड्यातील आकर्षक जिने
(फोटो-Escalier murat 2 - Élysée Palace - Wikipedia)
एलिसे राजवाड्याची पुनर्रचना केली गेली. तसेच बऱ्याच कक्षांची अदलाबदलीही केली गेली. मध्यवर्ती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील Salon Murat मध्ये दर बुधवारी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत असतात. या राजवाड्यात हॉल ऑफ ऑनर, सिल्व्हर रुम, पाऊलिन भोजनकक्ष, व्यक्तिचित्र कक्ष, हॉल ऑफ फेस्टिव्हिटीज, क्लेओपात्रा कक्ष, नील कक्ष इत्यादी अनेक आकर्षक कक्ष आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवर जाण्यासाठी बांधलेले जिनेही या राजवाड्याच्या आलिशानतेला शोभेसे आहेत.

राजवाड्याच्या मागील प्रवेशद्वारातून आत जाताच एक भव्य उद्यान लागते. त्याच्यामधूनच मध्यवर्ती इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विविध प्रकारची फुलझाडे आणि चेस्टनट वृक्ष लावलेले आहेत. फ्रेंच पद्धतीच्या या उद्यानाचे 18व्या शतकाच्या अखेरीस इंग्लिश पद्धतीने नुतनीकरण करण्यात आले. लहानलहान तळ्यांमध्ये वाहत येणारे छोटे जलप्रवाह, व्हरांडे, विविध प्रकारचे वृक्ष अशी त्यावेळी तेथे निर्माण केलेली अनेक नवी वैशिष्ट्ये आजही येथे पाहावयास मिळतात. अशा या पॅरिसमधील एका ऐतिहासिक पण तितक्याच प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या वास्तूच्या उभारणीला 2022 मध्ये 300 वर्षे पूर्ण झाली आहेत.

एलिसे राजवाड्यातील उद्यान (फोटो-Jardin Élysée depuis le Salon Dorée
 - Élysée Palace - Wikipedia

टिप्पण्या

  1. मस्त लेख आणि छायाचित्रे. तरी पण समाधान होण्यासाठी अजुन काही फोटो हवे होतें

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. होय, अगदी सहमत. अजून फोटोज् हवेत व माहितीही detail हवी चांगले लेखन हे नेहमी असेच अपूर्ण वाटत असते.अजून माहिती लिहा किंवा मराठी यथायोग्य लिंकस् द्या.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा