अरबी समुद्राची राणी

 

कोची

      कोची आणि एर्नाकुलम ही शहरे केरळला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीच्या ठिकाणांपैकीच दोन ठिकाणं आहेत. ही शहरे पाहण्याची माझीही बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती, ती अखेर पूर्ण झाली.

      कोची-एर्नाकुलम ही केरळमधील महत्वाची शहरे असून अलीकडील काळात त्यांच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढला आहे. कोची-एर्नाकुलमच्या आसपास अनेक विशेष आर्थिक क्षेत्र स्थित आहेत. त्याचबरोबर कोची हे दक्षिण भारतातील एक मोठे नैसर्गिक बंदर असून नौदलासाठी आणि व्यापारी कंपन्यांसाठी युद्धनौका आणि अन्य जहाजे बांधणारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडची मोठी गोदी इथे आहे. इतकेच नव्हे तर भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय, तेलशुद्धिकरण प्रकल्प, केरळ उच्च न्यायालय अशा अनेक महत्वाच्या संस्थाही इथे आहेत. कोची आणि केरळला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांचीही ये-जा वाढत गेल्यामुळे कोचीच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळवण्यात फार वेळ लागला नाही. या दोन्ही शहरांमध्ये सतत वर्दळ असली तरी गोंगाट, सार्वजनिक अस्वच्छता जाणवली नाही. सुंदर, प्रशस्त, स्वच्छ आणि खड्डेविरहित रस्ते, टुमदार बंगले, नारळ-केळीच्या बागा, सुंदर समुद्रकिनारा अशा अनेक वैशिष्ट्यांनी कोचीला Queen of the Arabian Sea हा खिताब मिळवून दिला आहे. आज कोचीतील अनेक जण व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये गेलेले आहेत.

कोची बंदरात बोटीतून फेरफटका मारताना दिसलेली 
कोची-लक्षदिप क्रूझ.

      स्वातंत्र्यापूर्वी कोची हे एक संस्थान होते. ब्रिटिशांनी या शहराचे नाव कोचीन असे केले होते, मात्र 1996 मध्ये या शहराला त्याचे जुने नाव – कोची असे दिले गेले. आज कोची शहर एर्नाकुलम जिल्ह्याचा भाग आहे. कोची बंदराच्या किनाऱ्यावरील भाग मुंबईतील चौपाटीप्रमाणे विकसित करण्यात आलेला आहे. त्याला नावही Marine Drive असेच दिले गेले आहे. या ठिकाणी बसून बंदर आणि तिथे उभी असलेली वेगवेगळी जहाजे न्याहाळता येतात. या ठिकाणी बोटीत बसून बंदरात फेरफटका मारण्याचा मोह न आवरल्याने आम्हीही एका बोटीवर स्वार झालो. एखाद्या मोठ्या बंदरात फेरी मारण्याची ती आमची पहिलीच वेळ होती. त्यामुळे आम्ही खूपच उत्साहित झालो होतो. या एक तासाच्या फेरफटक्यात बंदरात नांगरलेली विविध प्रकारची प्रचंड आकाराची जहाजे जवळून पाहता आली. त्यावेळी बोटीत असलेला गाईड त्या जहाजांविषयीची माहिती देत होता. एका आलिशान जहाजाच्या जवळ पोहचल्यावर गाईडने सांगितले की, ती लक्षदिपसाठीची cruise ship आहे. कोचीहून लक्षदिपच्या राजधानीकडे, कवराट्टीकडे ये-जा करत असते. त्यावेळी दूर सागरातून निघालेले एक महाकाय जहाज नजरेस पडले. संथपणे आपल्या प्रवासाला निघालेले ते जहाज बराच वेळ एकाच जागी थांबल्याचा भास होत होता. आपण फेरफटका मारतो, ते बंदर कोचीचे मूळचे बंदर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा जसजसा विकास होत राहिला, तसतशी कोची बंदरातून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूकही वाढत गेली. एकीकडे हे होत असतानाच भारताच्या सुरक्षेला आणि हिंदी महासागरातील राष्ट्रहितांना धोके वाढू लागल्यामुळे त्यांच्याशी सामना करणे शक्य व्हावे, या हेतूने कोचीतील भारतीय नौदलाच्या तळाचाही विकास करण्यात येऊ लागला आहे.

      बोटीवरून मारलेला फेरफटका संपल्यावर किनाऱ्यावर असलेल्या बाजारातून फेरफटका मारला. वेगवेगळ्या वस्तू, विशेष करून लाकडावर अतिशय बारीक आणि मनमोहक कोरीवकाम केलेल्या वस्तू लक्ष वेधून घेत होत्या. त्या वस्तू महागड्या असल्या तरीही खरेदी करण्याचा मोह होत होताच आणि बघताबघता लाकडी हत्ती, किचेन, संगमरवराच्या छोट्याशा तुकड्यावर कोरीवकाम केलेल्या वस्तूंपैकी काहींची खरेदी केलीसुद्धा.

      चौदाव्या शतकात कोची हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र बनले होते. मसाल्याच्या पदार्थ्यांचा येथून होणाऱ्या निर्यातीतील महत्वाचा वाटा होता. कोची बंदरातून आफ्रिका आणि पश्चिम आशियाला प्रामुख्याने ती निर्यात होत असे. सोळाव्या शतकात कोचीवर पोर्तुगीज, डच, ब्रिटिश अशा वेगवेगळ्या युरोपियन सत्तांनी राज्य केले. सन 1500 मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी पेद्रो अल्वारेस काब्राल याने कोचीत वसाहत स्थापन केली. ती भारतातील पहिली युरोपियन वसाहत होती. कोचीत 1663 पर्यंत पोर्तुगीजांची सत्ता राहिली. त्यानंतर ब्रिटिशांनी कोचीवर नियंत्रण मिळवलं. कालांतरानं ब्रिटिशांनी कोचीच्या पूर्वीच्या हिंदू राजघराण्याला पुन:स्थापित केलं आणि कोचीला भारतातील ब्रिटिश सत्तेतील एका संस्थानाचा दर्जा दिला.

 कोचीतील परदेसी सिनेगॉगमध्ये बसवण्यात आलेल्या 
चिनी मातीच्या फरशा.

      कोचीमध्ये पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत; पण आमची कोचीला ती धावती भेट असल्यामुळे सर्वच ठिकाणं नाही पाहता आली. मात्र कोचीमधील ज्यू धर्मियांचे सिनेगॉग पाहता आले. खूप पूर्वीपासून कोचीमध्ये ज्यू धर्मीयाचे वास्तव्य आहे. त्यांना तिथे Cochin Jews म्हणून ओळखले जाते. कोचीमध्ये स्थायिक झाल्यावर त्यांनी आपली प्रार्थनास्थळे – Synagogue इथे उभारण्यास सुरुवात केली. 12व्या शतकात त्यांनी कोचीमध्ये काही Synagogue बांधली होती. त्यातील काही Synagogue अजून अस्तित्वात आहेत. त्यांच्यापैकी एक Synagogue परदेसी सिनेगॉग म्हणून ओळखले जाते. 16व्या शतकात युरोपमधून कोचीत स्थलांतरित झालेल्या ज्यूंनी ते सिनेगॉग बांधले होते. त्यावरूनच त्याला परदेसी सिनेगॉग असे नाव पडले. कोचीच्या तत्कालीन राजांकडून जमीन मिळाल्यावर 1568 मध्ये हे सिनेगॉग बांधले गेले. त्यावेळी कोचीचे नाव कोगीन असल्याचे या सिनेगॉगच्या भिंतीवरील उल्लेखावरून स्पष्ट होते. परदेसी सिनेगॉगमध्ये अनेक ऐतिहासिक वस्तू प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच एक आहे सिनेगॉगला भेट मिळालेला सुवर्ण मुकुट. त्याचबरोबर 10व्या शतकात तयार करण्यात आलेले आणि तमीळ भाषेत लिहिलेले दोन ताम्रपटही इथे ठेवलेले आहेत. त्यावेळी मलबार किनाऱ्यावर तमीळ राजघराण्याचे राज्य असल्याचे त्यावरील उल्लेखावरून समजते. या सिनेगॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात 18व्या शतकात बसवलेल्या चिनी मातीच्या फरशा. या फरशांवर खास चिनी शैलीत चित्रे रंगवण्यात आलेली आहेत. एक घड्याळाचा टॉवरही 18व्या शतकातच इथे उभारला गेला. आज कोचीमध्ये वापरात असलेले हे एकमेव सिनेगॉग आहे.

कोचीमध्ये मासेमारीसाठी वापरली जाणारी चिनी जाळी  

      कोची म्हटले की पटकन आठवतात ती तेथील वैशिष्ट्यपूर्ण मासेमारीची चिनी जाळी म्हणजेच Cochin nets. ही जाळी नेहमीप्रमाणे समुद्रात फेकून मासेमारी केली जात नाही, तर किनाऱ्यावर बसवलेल्या बांबूपासून तयार केलेल्या संरचनेला जाळे बांधले जाते. भरतीच्यावेळी बांबू खाली करून जाळे पाण्यात सोडले जाते आणि भरती कमी होत जाताना जाळे तिथल्या तिथेच वर उचलले जाते. मात्र अशा प्रकारचे जाळे ठराविक मर्यादेपर्यंतच खोल जात असल्यामुळे त्याद्वारे मासे पकडले जाण्याचे प्रमाण मर्यादितच असते. तरीही या जाळ्यांनी कोचीला एक वेगळी ओळख करून दिली आहे, हे नक्की.

      कोचीमधील जेमतेम एक दिवसाच्या वास्तव्यात तेथील अस्सल इडली, डोसा या पदार्थांचा आस्वाद घेता आला. रोज पोळी-भाजी, आमटी-भात असे जेवण्याची सवय असलेल्या आम्हाला सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत इडली-डोसेच खावे लागले. मर्यादित वेळेत कोची पाहण्याचा जो अनुभव मिळाला, तो नक्कीच आनंददायक होता. तिथं अजून राहावं आणि कोची शहराला अजून पाहता यावं असं वाटत होतं. म्हणूनच परतीच्या प्रवासातच एक संकल्प सोडला – या सुंदर अरबी समुद्राच्या राणीला पुन्हा एकदा शांतपणे भेट देण्याचा.

कोची बंदराजवळ वसलेले पंचतारांकीत हॉटेल.

टिप्पण्या

  1. कोचीच्या धावत्या सहलीचा हा वेगवान आढावा छान आहे. तपशिलात डोकावून पाहण्याची तुझी सवय वाचकांना भरपूर माहिती देऊन जाते, पराग!

    उत्तर द्याहटवा
  2. पुन्हा कोची ला जावेसे वाटले , लेख वाचून स्मृती जाग्या झाल्या

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर लेख आहे. आता कोचीला जावेसे वाटते आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा