सुखोईवर ब्रह्मोस

 

सुखोई-30 एमकेआय आणि ब्रह्मोस (फोटो-पीआयबी)

      भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानावरून ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात 19 एप्रिल 2022 ला यशस्वी चाचणी घेतली गेली. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) आणि लक्ष्यावर अचूक मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

      ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय भूदलात आणि नौदलात आधीच सामील करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलातील युद्धनौकांवर ते तैनात करण्यात आलेले असून सध्या या क्षेपणास्त्राच्या पाणबुडी आवृत्तीचाही विकास केला जात आहे. त्याचबरोबर लढाऊ विमानांवरून डागता येऊ शकणाऱ्या आवृत्तीचा विकास आता पूर्ण होत आला आहे.

      ब्रह्मोसच्या अन्य आवृत्त्यांच्या तुलनेत हवाईदलासाठीच्या आणि पाणबुडीवरील आवृत्यांच्या विकासासाठी जास्त कालावधी लागला. त्याला कारणही तसेच आहे. अन्य आवृत्त्यांमध्ये हे क्षेपणास्त्र हवाईदल आवृत्तीपेक्षा आकाराने मोठे आहे. त्यामुळे त्याला लढाऊ विमानावरून वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे या क्षेपणास्त्राचा आकार आणि वजन कमी करण्याची आवश्यकता होती. हे करताना क्षेपणास्त्राची लांबी कमी करण्यासाठी त्याच्यावर बसवण्यात आलेले पहिल्या टप्प्यातील बुस्टर काढून टाकण्यात आला. कारण हवाई आवृत्तीच्या ब्रह्मोसला लढाऊ विमानावरून डागायचे असल्यामुळे त्याला तशीही पहिल्या टप्प्यातील बुस्टरची आवश्यकता नव्हती. लढाऊ विमानाच्या गतीमुळे आपोआपच त्याला सुरुवातीच्या टप्प्यातील गती प्राप्त होत असते. तसेच ब्रह्मोसच्या हवाई आवृत्तीचे वजन मूळच्या ब्रह्मोसपेक्षा अर्ध्या टनाने कमी करण्यात आले; पण हे करत असताना या क्षेपणास्त्राच्या अंगभूत वैशिष्ट्यांवर कोणताही परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतली जात होती.

      प्रक्षेपित करतेवेळी सुखोईपासून ब्रह्मोस विलग झाल्यानंतर 100 ते 150 मीटरपर्यंत ते जमिनीच्या दिशेने जाऊ लागते. त्यानंतर काही सेकंदातच क्षेपणास्त्राचे मुख्य इंजिन प्रज्वलित होऊन त्याला अपेक्षित गती देते आणि क्षेपणास्त्र काही सेकंदातच आवाजाच्या वेगापेक्षा 2.8 पट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने जाते.

      ब्रह्मोस एकीकृत करण्यासाठी सुखोईमध्येही काही सुधारणा कराव्या लागल्या आहेत. विमानातील शस्त्र नियंत्रण करणाऱ्या आज्ञावलीचे (सॉफ्टवेअर) आधुनिकीकरण करतानाच विमानाच्या सांगाड्याला अधिक मजबूत करावे लागले आहे. हे बदल करण्यासाठी भारताने दोन सुखोई-30 एमकेआय विमाने रशियाकडे पाठवली होती. त्याचबरोबर ब्रह्मोससारखे वजनदार क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी सुखोईवर नवा लाँचर बसवावा लागला आहे. हा लाँचर मात्र स्वदेशी बनावटीचा आहे.

      ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे विमानापासून ते विलग झाल्यावर त्याला त्या विमानातूनच लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. हवेतून डागताना उपयुक्त ठरणाऱ्या Free Fall Systemचीही चाचणी यावेळी घण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने सुखोई जमिनीपासून 1,000 ते तब्बल 46,000 फुटांवरून उडत असतानाही ब्रह्मोसला सहजतेने प्रक्षेपित करता येते.

      ब्रह्मोस अगदी अचूक (पिनपॉईंट) लक्ष्यभेद करू शकत असल्याने त्याच्या सामिलीकरणामुळे भारतीय हवाईदलाची सामरिक पोच आणि समुद्रावर प्रभुत्व गाजवण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. सुखोई-30 एमकेआय विमानावर जोडणी केल्यामुळे ब्रह्मोसचा पल्ला आपोआपच सुमारे 10 पटींनी वाढणार आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी कमीतकमी वेळेत पोहचून अतिशय अचूक मारा करताना सुखोईला मात्र आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत आणि शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणांच्या टप्प्याच्या बाहेर राहून आपले उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. भारतीय हवाईदलातील 40 विमानांवर ब्रह्मोस संलग्न केली जाणार आहेत.

2015 मध्ये भारतीय हवाईदलाच्या स्थापना दिनाच्या संचलनावेळी केलेल्या भाषणात तत्कालीन हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी म्हणाले होते की, भारतीय हवाईदल आता व्यूहात्मक हवाईदल (Strategic Air Force) झाले आहे. अलीकडील काळात भारतीय हवाईदलाला आपल्या सामरिक हितांच्या संरक्षणासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातील घडामोडींवरही सतत लक्ष ठेवावे लागत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा