आणि मुंबईत पुन्हा धावले वाफेचे इंजिन...!


      मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच.

(भारतीय रेल्वे 170 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने प्रकाशित केलेला व्हिडिओ खालील लिंकवर आहे. अवश्य पाहा, ही विनंती.)

(1) Railway Week Special - crossing, parallel running and overtaking action in Ghat Section - YouTube

भारतीय रेल्वेच्या दीडशेव्या वर्षाच्या निमित्ताने देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे वृत्त आले होते. त्या कार्यक्रमांपैकीच एक कार्यक्रम मुंबईत आयोजित होणार होता, तो विशेष असणार होता आणि त्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. भारतीय रेल्वेचे दीडशेवे वर्ष सुरू होईल, तेव्हा म्हणजेच 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत पहिल्या रेल्वेगाडीसारखीच एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार होती. त्या ऐतिहासिक सोहळ्यासाठीची रेल्वेकडून तयारी सुरू झाली होती. पहिल्या प्रवासी रेल्वेगाडीप्रमाणेच एक विशेष रेल्वेगाडी मुंबई आणि ठाण्यादरम्यान चालवण्याचे नियोजन करण्यात आले होते. ती रेल्वेगाडी वाफेच्या इंजिनावर चालवली जाणार होती. त्यासाठी दोन वाफेची इंजिने काही दिवस आधी मुंबईत दाखल झाली होती आणि त्यांची डागडुजी केली जात होती. त्याचवेळी या गाडीसाठीचे 14 डबेही मुंबईत आणले गेले होते. त्यातील 7 डबे जुन्या काळातील आलिशान होते आणि ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयातून मुद्दाम मुंबईपर्यंत आणले गेले होते. जुन्या काळातील ते डबे, त्यावेळी डब्यांमध्ये पुरवण्यात आलेल्या आलिशान सोयीसुविधांची ओळख करून देत होते. त्याचवेळी या गाडीला जर्मन तंत्रज्ञानावर बनवलेले अत्याधुनिक (त्यावेळी थेट जर्मनीतून आणले गेलेले) 7 LHB (Linke Hoffmann Busch Company) डबेही जोडले जाणार होते. त्यामुळे ती खास रेल्वेगाडी भारतीय रेल्वेच्या गेल्या 150 वर्षांतील प्रगतीचे प्रतीक बनणार होती.

(फोटो-महाराष्ट्र टाईम्स, 17/4/02) 
सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता. 16 एप्रिल 2002 ला ती विशेष रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सज्ज झाली होती. दोन वाफेची WP वर्गातील इंजिने त्या गाडीला जोडली गेली होती. अनेक मुंबईकर वाफेच्या इंजिनांना पहिल्यांदाच पाहत असल्यामुळे त्यांच्यात कमालीची उत्सुकता होती. आता फलाटांबरोबरच पुढे संपूर्ण मार्गाच्या दोन्ही बाजूंनी ही विशेष गाडी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. पहिल्या रेल्वेगाडीला 14 डबे आणि साहेब, सिंध, सुलतान अशी 3 वाफेची इंजिनं जोडलेली होती. म्हणून दीडशे वर्षांनंतरच्या त्या विशेष रेल्वगाडीलाही 14 डबे जोडले असले तरी इंजिनं मात्र दोनच होती. त्या विशेष समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे त्यावेळचे राज्यपाल पी. सी. लेक्सांडर उपस्थित होते.

  (फोटो-दै. लोकसत्ता, 17/4/02)  
 पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) स्थानकातून दुपारी ठीक 3.35 ला सुटली होती. त्यामुळे दीडशे वर्षांनी धावणारी ही विशेष रेल्वेगाडीही त्याचवेळी सुटणार होती. गाडीची वेळ होताच राज्यपालांच्या हस्ते त्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला आणि त्या ऐतिहासिक दौडीला सुरुवात झाली. त्या विशेष गाडीत राज्यपाल विराजमान झाले होते. त्यावेळी राज्यपालांबरोबर प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, रेल्वे मंत्री नीतिश कुमार, केंद्रीय संसदीय कामकाज, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रमोद महाजन, राम नाईक, मनोहर जोशी, मुंबईचे महापौर महादेव देवळे इत्यादी मान्यवरांनी मुंबई-ठाणे-मुंबई असा या रेल्वेगाडीतून प्रवास केला. या प्रवासात सगळ्या मान्यवरांची बसण्याची व्यवस्था शताब्दी एक्सप्रेसच्या अत्याधुनिक LHB डब्यांमध्ये, तर पत्रकारांची जुन्या काळातील ऐतिहासिक डब्यांमध्ये करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी विशेष पास आणि निमंत्रणपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. त्या निमंत्रणपत्रिकांना नावच दिले गेले होते – पहिल्या प्रवासाचा स्मृती सोहळा.

ठाण्यात ती विशेष गाडी 4.32 वाजता ठाण्याला पोहचली. तिथे एक तास विश्रांती घेऊन संध्याकाळी 5.40 ला ती ठाण्याहून परतीच्या प्रवासाला निघाली आणि 6.30 मिनिटांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दाखल झाली आणि त्या विशेष रेल्वेगाडीची ऐतिहासिक दौड समाप्त झाली.

(फोटो-दै. महाराष्ट्र टाईम्स,17/4/02)

    या सोहळ्यादरम्यान भारतीय रेल्वेच्या दीडशेव्या वर्षानिमित्ताने विशेष टपाल तिकिटाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. त्या समांरभाचा एक भाग म्हणून 16 एप्रिल 2002 ला संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ऐतिहासिक इमारतीवर रोषणाई करण्यात आली होती.

(फोटो - दै. सकाळ, 16/4/02)

16 एप्रिल 2002 रोजी धावलेल्या विशेष रेल्वेगाडीला मिळालेली लोकप्रियता पाहून मध्य रेल्वेने या वाफेच्या इंजिनाच्या गाडीच्या काही फेऱ्या पुढेही काही दिवस मुंबईत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होत्या. त्या गाडीच्या मुंबई-ठाणेदरम्यान 3-4 फेऱ्या झाल्या होत्या. ती विशेष गाडी दर रविवारी 2 वातानुकुलित आणि 5 द्वितीय श्रेणीच्या डब्यांबरोबर धावत होती. वातानुकुलित श्रेणीसाठीचे भाडे 350 रुपये आणि द्वितीय श्रेणीचे 250 रुपये होते. मुंबई ते ठाणे आणि परतीच्या प्रवासात ही गाडी कोठेही थांबत नसे. हा संपूर्ण प्रवास अडीच तासाचा होता. ती गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून दुपारी 3.45 वाजता सुटून 4.45 ला ठाण्यात पोहचत असे. त्यानंतर संध्याकाळी 5.05 वाजता ठाण्याहून सुटून ती 5.55 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसवर परतत असे.

गेल्या 169 वर्षांमधील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, तांत्रिकदृष्ट्या महत्वपूर्ण घडामोडींची आणि स्थित्यंतराची भारतीय रेल्वे साक्षीदार ठरली आहे. देशाच्या जडणघडणीत ती अतिशय मोलाचे योगदान देत आलेली आहे. म्हणूनच तर तिला राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आणि देशाची आर्थिक जीवनवाहिनी म्हटले जाते. काळानुरुप अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक आरामदायक रेल्वेप्रवास उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे सतत प्रयत्न करत राहिली आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा