पुण्यात मेट्रो सुरू झाली!

 

पुणे मेट्रो


      पुण्यात 2 मेट्रो मार्ग उभारले जाणार आहेत असं साधारण 2009-10 मध्ये वाचनात आल्यावर खूप आनंद झाला होता. याविषयीचं प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यातील संभाव्य मेट्रो मार्गांचे नकाशे प्रकाशित केले गेले. त्यापैकी एक मार्ग आमच्या घराजवळून जाणार आहे आणि घराच्या जवळच तिचं एक स्थानक असणार आहे, असं त्यात दिसल्यावर आणखीनच आनंदीत झालो होतो. आमच्या इथून जाणारा मार्ग थेट पुणे जंक्शनपर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे मला घराजवळून पुणे जंक्शनपर्यंत मेट्रोनं थेट जाता-येता येणार आहे, त्यामुळे मला पुढील काळात पीएमपीएलच्या सेवेवर विसंबून राहायची गरज उरणार नाही या विचारानं तर आनंद गगनात मावेनासा झाला. मग तिथून पुढे मेट्रो सुरू होण्याची आतुरतेनं वाट बघणं सुरू झालं. मधल्या काळातील नुसत्याच चर्चा ऐकून असं वाटू लागलं होतं की, मेट्रो बहुतेक कागदावरच राहणार आहे बहुतेक. पण अखेर मर्यादित मार्गावर का असेना पुण्यात 6 मार्च 2022 पासून मेट्रो सुरू झाली आहे आणि मी त्यातून फेरफटका मारूनही आलो आहे.

                    काम सुरू असलेले मेट्रोचे स्थानक                
 सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.

        मेट्रो प्रवासाचा आनंद घेणारे उत्साही पुणेकर           
      गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे. मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.

     शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक मेट्रो रेल्वेम्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

      भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात 1984 मध्ये कोलकातामध्ये झाली. त्यानंतर सन 2009 मध्ये दिल्लीमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर देशाच्या अन्य शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्याबाबत मागण्या सुरू झाल्या. सध्या भारतात कोलकाता मेट्रो वगळता अन्य मेट्रो व्यवस्था केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांच्या 50:50 भागीदारीतून उभारल्या आणि चालवल्या जात आहेत.

देशात उभारल्या जात असलेल्या सर्व मेट्रोंमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यवस्थेच्या रेल्वेगाड्यांमधील ‘Total Suspended Particles’ प्रमाण प्रति एक घनमीटर हवेमध्ये केवळ 280 मायक्रोग्रॅम इतके आढळले आहे, जे पादचाऱ्याकडून होणाऱ्या उत्सर्जनापेक्षाही कमी ठरते. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

      भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
  • आवश्यक स्रोतांची कमतरता
  • देशातील कायदेशीर व्यवस्था
  • मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
  • कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव

      मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे

  • शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
  • शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
  • शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
  • इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
  • दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
  • दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
  • एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे

  • कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.

सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प

  • नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.

मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प

  • ठाणे, विशाखापट्टणम

टिप्पण्या

  1. बर झाल पुण्यात मेट्रो चालू झाली ,उर्वरित मेट्रोचे काम लवकरच मार्गी लागो.

    उत्तर द्याहटवा
  2. वा मस्त.मेट्रो आली एकदाची

    उत्तर द्याहटवा
  3. मेट्रो रेल्वेची उपयुक्ततता सर्वांना पटली तरी कार्यवाहीत होणारी दिरंगाईअक्षम्य आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा