बर्फावरचा क्रीडा महोत्सव


      बीजिंगमध्ये (चीन) 4 ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा भरत आहेत. यामुळे एकाच शहरात उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन होणारे बीजिंग हे जगातील एकमेव शहर ठरले आहे. पण त्याचवेळी पूर्णपणे कृत्रिम बर्फावर खेळवले जाणारेही हे पहिलेच हिवाळी ऑलिंपिक असणार आहे. बीजिंग हे या स्पर्धांचे मुख्य ठिकाण राहणार असले तरी काही क्रीडाप्रकारांचे सामने यानकिंग आणि चांगझियाकाऊ येथे खेळवले जाणार आहेत. ही दोन्ही ठिकाणं बीजिंगपासून अनुक्रमे 75 ते 180 किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे ही तिन्ही ठिकाणं अतिजलद रेल्वेसेवेने जोडण्यात आलेली आहेत. पण COVID-19 च्या वाढलेल्या संक्रमाणामुळे हे ऑलिंपिक प्रेक्षकांविनाच पार पडत आहेत. त्यातच स्वत:ची प्रतिमा उंचावण्याच्या नादात चीनकडून ऑलिंपिकच्या तत्वांना धक्का लावला जात आहे, असा आरोप केला जात आहे.

बीजिंगमध्ये होत असलेले हे हिवाळी ऑलिंपिक 24 वे हिवाळी ऑलिंपिक (XXIV Olympic Winter Games) असून त्यामध्ये 90 देश आणि संघटनांमधून सुमारे 2900 क्रीडापटू सहभागी होत आहेत. या ऑलिंपिकमध्ये सात खेळांच्या 15 प्रकारांचे एकूण 109 सामने होणार आहेत. त्यात महिलांचे मोनोबॉब, महिला आणि पुरुषांचे फ्रीस्टाईल स्किईंग बिग एअर, तसेच फ्रीस्टाईल स्कीईंग एरियल, स्की जंपिंग, स्नोबोर्ड क्रॉस यांचे मिश्र संघ आणि शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंगमध्ये मिश्र रिले हे क्रीडाप्रकार ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

ऑलिंपिक आणि राजकारण

      बीजिंग 2022 चे Together for a shared future असे ब्रीद असले तरी चीनकडून हाँग काँग, तिबेट, शिंझियांग प्रांतांमधल्या स्थानिक लोकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांनी या हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकवर राजनयिक बहिष्कार (diplomatic boycott) टाकला आहे. तसे असले तरीही त्या देशांचे खेळाडू या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहेत. आता या देशांपाठोपाठ भारतानेही बीजिंग 2022 वर राजनयिक बहिष्कार टाकण्याचा आणि त्याच्या उद्घाटन आणि समारोप समारंभांचे देशात DD Sports वाहिनीवरून थेट प्रसारण न करण्याचाही निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयांमुळे बीजिंगमधील भारतीय दुतावासातील कोणतेही अधिकारी या दोन्ही समारंभांमध्ये उपस्थित राहणार नाहीत. गलवान येथे भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या झटापटीमध्ये जखमी झालेल्या चिनी जवानाला बीजिंग 2022 चा एक मशालवाहक (Torch Bearer) बनवण्यात आलेले आहे. त्याला विरोध म्हणून भारताने हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच चीन या ऑलिंपिकला राजकीय रंग देत आहे, असेही भारताने म्हटले आहे.

बीजिंग 2022 चा शुभंकर

पिंग तुने तुन

      Bing Dwen Dwen (चिनी भाषेतील उच्चार - पिंग तुन तुन)  हा बीजिंग 2022 चा शुभंकर (mascot) आहे. जगात केवळ चीनमध्येच आढळणारा आणि चीनचा राष्ट्रीय प्राणी असलेला विशाल पांडा (Giant Panda) या प्राण्याची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे. काओ जियू यांनी हा शुभंकर साकारलेला आहे.

    पिंग म्हणजे बर्फ, तर तुन तुन म्हणजे मजबूत आणि सजीव. अंतराळवीरासारखा पेहराव केलेल्या पिंग तुन तुनच्या चेहऱ्याच्या भोवतीने वेगवेगळ्या रंगांची कडी करण्यात आलेली आहेत ती वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचे प्रतिनिधित्व करत आहेत. याच्या डाव्या हातावर असलेली लाल रंगाची हृदयाची प्रतिमा हिवाळी ऑलिंपिकसाठी आलेल्या क्रीडापटू आणि दर्शकांप्रती प्रेम व्यक्त करत आहे.


बीजिंग 2022 चे प्रतीकचिन्ह

      बीजिंग 2022 च्या प्रतीकचिन्हाचे (emblem) आरेखन लिन क्यूंजेन यांनी केले आहे. या प्रतीकचिन्हामध्ये चीनची संस्कृती, आधुनिक परंपरा तसेच हिवाळी ऑलिंपिकमधील जोश आणि शक्ती यांचे प्रतिबिंब उमटले आहे. चिनी भाषेतील (उच्चार - तोंग) या शब्दाच्या वळणानुसार बीजिंग 2022 ऑलिंपिकचे प्रतीकचिन्ह तयार करण्यात आलेले आहे. या शब्दाचा अर्थ हिवाळा असा आहे. हिवाळी ऑलिंपिकमधील खेळांचे मुख्य आधार असलेले स्केटर आणि स्कीअर यांच्या प्रतिमेचा भास या प्रतीकचिन्हाकडे पाहिल्यावर होतो. या प्रतीकचिन्हाच्या मध्यभागी ऑलिंपिकच्या आयोजन ठिकाणाचे प्रतिनिधित्व करणारी एक रिबीन काढलेली आहे. या प्रतीकचिन्हात वापरण्यात आलेला निळा रंग स्वप्न, भविष्य आणि बर्फाच्या शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर चीनच्या राष्ट्रध्वजाचं प्रतिनिधित्व करणारे लाल आणि पिवळा हे रंगही या त्यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

ऑलिंपिक मशाल

      थेन्समध्ये प्रज्वलित करून चीनमध्ये दाखल झालेली बीजिंग 2022 ची मशाल वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मशालीवर ऑलिंपिकच्या बोधचिन्हाबरोबरच चीनची भिंत (Great wall of China), स्किईंग मार्ग आणि प्रकाश, शांती, श्रेष्ठतेचे प्रतीक म्हणून एक लाल रंगाची रेषा रेखाटलेली आहे. या मशालीसाठी कार्बन-फायबरचा वापर करण्यात आलेला आहे. तिच्यामध्ये प्रदूषणमुक्त इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर करण्यात आलेला आहे. 4 फेब्रुवारीला बीजिंग 2022 च्या उद्घाटनाच्यावेळी याच मशालीच्या मदतीने मुख्य स्टेडियममधली ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे.

हिवाळी ऑलिंपिक आणि भारत

      हिवाळी ऑलिंपिक तसा आपल्याकडे अपरिचित क्रीडा महोत्सव. त्यामुळे बीजिंगमध्ये होत असलेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांकडे आपल्यापैकी बऱ्याच जणांचे लक्ष असणार नाही. उन्हाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताला पदके मिळत राहिली आहेत. त्यामुळे क्रिकेटशिवाय अन्य क्रीडाप्रकार आणि क्रीडा स्पर्धांविषयी आपल्याकडे जागृती आता वाढलेली आहे. मात्र हिवाळी ऑलिंपिक आणि हिवाळी पॅरालिंपिकबाबत आपण अजूनही जागृत झालेलो नाही. वास्तविक हिवाळी ऑलिंपिकमधील क्रीडाप्रकारांच्या तयारीसाठी आवश्यक असलेली नैसर्गिक परिस्थिती आपल्याकडे उपलब्ध आहे. तरीही त्यांच्याबाबत प्रचंड अज्ञान आपल्याकडे आहे.

भारताचा हिवाळी ऑलिंपिकमधील एकमेव क्रीडापटू महंमद अरिफ खान (फोटो - पीआयबी)

बीजिंग 2022 साठी भारताचा महंमद अरिफ खान पात्र ठरलेला आहे. तो या ऑलिपिंकमध्ये सहभागी होत असलेला आपला एकमेव क्रीडापटू आहे. अल्पाईन स्किईंगच्या (Alpine Skiing) स्पर्धेत तो भाग घेणार आहे.

हिवाळी पॅरालिंपिक 2022

शुएय ऱ्होन ऱ्होन

     हिवाळी ऑलिंपिकनंतर 13 वे हिवाळी पॅरालिंपिक (XIII Paralympic Winter Games) 4 ते 13 मार्चदरम्यान बीजिंगमध्ये पार पडणार आहेत. त्यामध्ये 6 खेळांचे 78 सामने आयोजित केले जाणार आहेत. शुएय ऱ्होन ऱ्होन हा या स्पर्धांचा शुभंकर आहे. शुएय ऱ्होन ऱ्होन म्हणजे चमकणारा कंदील. चिनी मूलाच्या प्रतिमेचा तो कंदील जगभरातून आलेल्या क्रीडापटूंचे स्वागत करणार आहे. अशा प्रकारच्या कंदिलाला चिनी संस्कृतीत समृद्धी, उत्सव, उज्वल भविष्य याचे प्रतीक मानले जाते. याचे बोधचिन्ह (उच्चार - फे) म्हणजे उडणे या चिनी भाषेतील शब्दाच्या वळणावरून तयार करण्यात आलेले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा