जहाजांचे संमेलन

आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण 2016 (फोटो-पीआयबी)

      राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविक ताफ्याचे निरीक्षण करणार आहेत. राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण(Presidential Fleet Review) दर 5 वर्षांनी भारतीय नौदल आयोजित करत असते. कोविड-19च्या साथीमुळे 2021 मध्ये नियोजित असलेला हा समारंभ एक वर्ष पुढे ढकलण्यात आला होता.

आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा हा समारंभ अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो. नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनाच्या खालोखाल या राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण समारंभाचे महत्व आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात 1953 पासून आतापर्यंत 11 वेळा असे ताफा निरीक्षण पार पडलेले आहे. त्यापैकी 2001 आणि 2016 मध्ये आयोजित करण्यात आलेले ताफा निरीक्षण आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण होते. भारताचे प्रत्येक राष्ट्रपती आपल्या कार्यकाळात एकदा आपल्या नाविकशक्तीचा संपूर्ण आढावा घेत असतात. नौदलाच्या एका विभागातील (Command) प्रमुख ठिकाणी हा समारंभ आयोजित केला जात असतो. भारतीय नौदलातील सर्व आघाडीच्या युद्धनौका, विमानवाहू जहाजे, पाणबुड्या, नौदलाची विविध प्रकारची विमाने आणि हेलिकॉप्टर्स, तटरक्षक दलाच्या नौका, विमाने आणि हेलिकॉप्टर्स तसेच भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील जहाज वाहतूक कंपन्या आणि सागरी संशोधन विभागाची महत्वाची व्यापारी जहाजे आणि नौकाही या समारंभात सजून सहभागी होत असतात.

राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण

राष्ट्रपतींना नौसैनिकांकडून मानवंदना - Guard of Honour 
(फोटो-पीआयबी)

      भारतीय सैन्यदलांचे सर्वोच्च सेनापती असलेले राष्ट्रपती त्यांच्यासाठी नेमलेल्या खास युद्धनौकेवर (Presidential Yacht) स्वार होण्याआधी नौदलाच्या जवानांकडून मानवंदना स्वीकारतात. यावेळी राष्ट्रपतींनी नौदलाला प्रदान केलेले अतिशय मानाचे राष्ट्रपतींचे निशाणसुद्धा (President’s Colours) तिथे असते. मानवंदनेनंतर राष्ट्रपती आपल्यासाठीच्या खास युद्धनौकेवर स्वार होऊन समुद्रात ओळीने उभ्या असलेल्या युद्धनौका, पाणबुड्या आणि अन्य जहाजांबरोबरच नौदलाच्या हवाईशक्तीचे अवलोकन करतात. राष्ट्रपतींची खास युद्धनौका बंदर सोडत असताना तिथे उभ्या असलेल्या नौदलाच्या बँडपथकाकडून राष्ट्रगीत वाजवले जाते. त्याचबरोबरच राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामीही दिली जाते. राष्ट्रपतींसाठीच्या या खास युद्धनौकेच्या दोन्ही बाजूंवर राजमुद्रा चितारलेली असते. त्या युद्धनौकेवर राष्ट्रपतींबरोबरच पंतप्रधान, संरक्षण मंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि संबंधित घटकराज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्रीही उपस्थित असतात. या समारंभात स्थिर, चलित आणि हवाई या तीन प्रकारांनी नाविकशक्तीचे प्रदर्शन घडविले जाते.

          राष्ट्रपतींच्या या खास युद्धनौकेपाठोपाठ अन्य युद्धनौकाही जात असतात, ज्यांच्यावर भारतातील विविध देशांच्या राजदुतावासांमधील सैन्य प्रतिनिधी (defence attache) आणि अन्य मान्यवर विराजमान झालेले असतात. राष्ट्रपतींची खास युद्धनौका समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या युद्धनौकांसमोरून जात असताना त्यांच्यावरील नौसैनिक डेकवर उभे राहून, आपल्या कॅप हातात धरून राष्ट्रपतींचा त्रिवार जयजयकार करतात.

नौदलाच्या ताफा निरीक्षणाचा इतिहास

      राष्ट्रप्रमुखाने आपल्या नौदलाच्या ताफ्याचे निरीक्षण करणे ही बरीच जुनी नाविक परंपरा आहे. आज जगातील सर्वच देशांच्या नौदलांकडून ती परंपरा जोपासली जात आहे. नौदलाच्या दृष्टीने या ताफा निरीक्षणाला अतिशय महत्त्व असते. अशा ताफा निरीक्षणामधून राष्ट्रप्रमुखाप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याची संधीही नौसैनिकांना मिळत असते. त्याद्वारे युद्धनौका आणि नौसैनिक आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्याप्रती सन्मान आणि बांधिलकी व्यक्त करत असतात. या निरीक्षणातून राष्ट्राचे नेतृत्वही आपल्या देशाच्या नाविक ताफ्याच्या क्षमतेबाबत आश्वस्त होत असते. भारताच्या इतिहासातील पहिले नाविक ताफ्याचे निरीक्षण सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अठराव्या शतकात रत्नागिरीच्या किनाऱ्यावर केल्याची नोंद आढळते.

     अटलांटिक महासागरात वसलेल्या ब्रिटनसाठी समुद्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. हा व्यापारी प्रवृत्तीचा देश असल्यामुळे सागरावरील प्रभुत्व त्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरते. सतराव्या शतकात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर त्याने आपल्या नाविकशक्तीमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आणि नाविकशक्तीच्या जोरावर जगातील विविध प्रदेश काबीज करण्यास, वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सतराव्या शतकातच ब्रिटनच्या राजाकडून रॉयल नेव्हीची तयारी पाहण्यासाठी त्याच्या ताफ्याचे निरीक्षण करण्याची पद्धत तेथे रुढ झाली. युद्धाला जाण्यापूर्वी किंवा राजा/राणीच्या राज्यारोहणाच्यावेळी देशाच्या सर्वोच्च प्रमुखाकडून रॉयल नेव्हीच्या ताफ्याचे निरीक्षण केले जाऊ लागले आणि आधुनिक काळातील ताफा निरीक्षणाची ती प्रथा जगभरात गेली.

भारताचा सागरी इतिहास

      भारताला हजारो वर्षांचा सागरी इतिहास आहे. सिंधू संस्कृतीच्या काळात भारताचे मेसोपोटेमियाशी (सध्याचा इराक) घनिष्ठ व्यापारी संबंध होते. तो व्यापार सागरीमार्गानेच होत असे. याचे पुरावे सिंधू नदीचे खोरे आणि लोथल येथे केलेल्या उत्खननातही सापडलेले आहेत. भारताच्या सागरी व्यापाराचे असेच पुरावे देशाच्या अन्य भागात झालेल्या उत्खननात सापडले आहेत. रोमशी होत असलेल्या सागरी व्यापाराचे पुरावे कोल्हापूरजवळ ब्रह्मपुरी येथे झालेल्या उत्खननातही सापडले आहेत.

भारताचा सागरीमार्गाने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून युरोप आणि आग्नेय आशियाई देशांबरोबर व्यापार होत होता. हा व्यापार जसजसा भरभराटीला येत गेला, तसतसा भारतातील जहाज जहाजबांधणी उद्योगही विकसित होत गेला. सतराव्या शतकात समुद्रातून स्वराज्याला वाढलेला धोका ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रबळ आरमाराची उभारणी केली, जे आरमार पुढील अनेक वर्षे युरोपीयनांचा प्रबळपणे मुकाबला करत राहिले होते.

स्वातंत्र्योत्तर काळातील परिस्थिती

स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विशाखापट्टणम या
अत्याधुनिक विनाशिकेचे जलावतरण. (फोटो-पीआयबी) 
      भारतीय नौदल स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने विकसित होत राहिले आहे. 1990 च्या दशकापर्यंत भारतीय नौदल प्रामुख्याने आपल्या सागरी सीमांचेच संरक्षण करत होते. शेजारी देशांची विनंती किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेचा (United Nations Organisation) ठराव याच्या आधारेच ते आपल्या सीमांच्या पलीकडे जाऊन कार्य करत असे. काळानुरुप आपल्या कार्यक्षमतेत आणि कार्यकक्षेत बदल करून देशाच्या परराष्ट्र धोरणाला पूरक भूमिका भारतीय नौदल घेत आले आहे. 1990च्या दशकात शीतयुद्धाचा आणि द्वीधृवीय जागतिक व्यवस्थेचा अंत झाला. त्याचवेळी जागतिकीकरणानेही वेग घेतला. भारतानेही आता मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले होते. परिणामी जगातील विविध भागांमध्ये भारताची राष्ट्रहिते विस्तारू लागली. त्यांच्या संरक्षणासाठी भारतीय नौदल पश्चिमेला सुएझ कालव्याच्या पलीकडे आणि पूर्वेला दक्षिण चीन सागरापर्यंत कार्यरत राहू लागले आहे. 

    हिंदी महासागरातून चालणाऱ्या सागरी वाहतुकीला       
भारतीय नौदलाकडून संरक्षण. (फोटो-पीआयबी)
    ‘नाविक राजनयाच्या (Naval Diplomacy) माध्यमातून भारतीय नौदल भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विस्तारीकरणाला हातभार लावत आहे. संकटग्रस्त प्रदेशांमध्ये मानवी मदत आणि बचावकार्य भारतीय नौदल राबवत आहे. आज हिंदी महासागरातील सर्वात प्रबळ नौदल असलेले भारतीय नौदल या क्षेत्रातील मुख्य सुरक्षा पुरवठादार (Net Security Provider) म्हणून भूमिका बजावत आहे.

भारत आणि त्याच्या आजूबाजूचा सागर यांच्यातील नात्याशी संबंधित या सर्व बाबींची झलक राष्ट्रपतींच्या ताफा निरीक्षणामधून पाहायला मिळत असते. त्यामुळे हा समारंभ भारतीय नौदलाची, भारताच्या सागरी इतिहासाची, सागरी परंपरांची माहिती करून घेण्याचे एक साधन ठरत असते. या सोहळ्यात नौदलाशी संबंधित अन्य कार्यक्रमांचा - जसे, बँडपथकाचे सादरीकरण, सागरी परिसंवाद, प्रदर्शने, सागरी युद्धाची प्रात्यक्षिके यांचाही समावेश असतो. हे संपूर्ण आयोजन राष्ट्रीय प्रतिमेशी निगडीत असल्याने त्याचे नियोजनही अतिशय शिस्तबद्ध आणि दिमाखदार असते. अशा सोहळ्याला एक दर्शक म्हणून प्रत्यक्ष उपस्थिती लावण्याची माझी अनेक वर्षांपासून इच्छा आहे. 2016 मध्ये विशाखापट्ट्णममध्येच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षण सोहळ्याला भेट देण्याचे ठरवले होते, पण शेवटच्या क्षणी तो बेत रद्द करावा लागला होता.

टिप्पण्या

  1. छान माहिती ... नाविन्यपूर्ण. एक विचार मनात आला तो असा की अशा परंपरा जपण्यासाठी जो काही खर्च होतो तो भारता सारख्या देशाला परवडतो का? राष्ट्रपती पंतप्रधान इत्यादी येणार म्हटल्यावर त्यांची सुरक्षा यंत्रणा आली आणि त्याबरोबर चा प्रचंड खर्च ही

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा