स्वप्नपूर्तीचा तो दिवस!

  


      दिल्लीला जाण्याची माझी ती चौथी वेळ होती. पण ही दिल्ली भेट सर्वात विशेष ठरणार होती. कारण त्यावेळी माझं अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येत होतं. त्या स्वप्नपूर्तीला यंदा 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.

      दिल्लीला जाण्यासाठी मी आणि माझा मित्र शशिकांत आम्ही पुण्याहून दुरंतो एक्सप्रेसनं निघालो. त्याआधी काही वर्ष आम्ही दोघं मिळून दिल्लीला जाण्याची योजना आखत होतो. खूप आधीपासून आरक्षणंही करून ठेवत होतो, पण ऐनवेळी काही तरी निमित्त होऊन आमचं जाणं रद्द होत होतं. पण 2012 मध्ये तसं काही झालं नव्हतं आणि दिल्ली भेटीची आमची योजना विनाअडथळा प्रत्यक्षात येत होती. त्यामुळे एकीकडे प्रवासाचा उत्साह होताच आणि दुसरीकडे दिल्लीला ज्या कारणासाठी निघालोय त्यामुळे तर उत्साह संचारलेला होता.

दिल्लीला जाण्याचं त्यावेळचं निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाचा सोहळा प्रत्यक्षात पाहण्याचं. प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण सोहळ्याला माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टीने अतिशय महत्व आहे. गेली 18 वर्ष बाळगलेलं स्वप्न 2012 मध्ये साकार होत होतं. आम्ही कडाक्याच्या थंडीत सूर्योदयापूर्वीच दिल्लीला पोहचलो. हजरत निजामुद्दिन स्टेशनवर उतरून लगेच नवी दिल्लीला गेलो आणि स्टेशनजवळच्याच एका हॉटेलमध्ये रुम घेतली.

26 जानेवारीला सकाळी राजपथाकडे निघालो. संचलनाची तिकिटं तर मिळाली नव्हती, त्यामुळे विनातिकिट संचलन पाहता येईल अशा ठिकाणी आम्हाला सोड असं रिक्षावाल्याला सांगितलं. कडक सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे त्यानं जरा लांबच आम्हाला सोडलं होतं. आम्ही मग भरभर चालत इंडिया गेटच्या दिशेने गेलो. मी मित्राला आधीच सांगितलं होतं की, जर इंडिया गेटच्या आसपास जाऊन संचलन बघता आलं तर ठीक, नाहीतर सरळ रुमवर येऊन टी.व्ही.वरच बघू. पण अखेर प्रत्येक सुरक्षा कडे ओलांडत आणि प्रत्येक ठिकाणी सुरक्षा तपासण्या पूर्ण करून आम्ही इंडिया गेटच्या मागच्या बाजूला पोहचलो. इंडिया गेटच्या मागच्या बाजूच्या टिळक मार्गाच्या अगदी कोपऱ्यावर जाऊन उभे राहिलो.

तपासणीच्या ठिकाणी आमच्या आसपासच्या काहींना सुरक्षारक्षक तिथूनच परत पाठवत होते. काहींच्या जवळ मोबाईल फोन आणि चार्जर होते, एक जण तर चक्क टॅबलेट घेऊन आला होता. काहींकडे इतरही काही प्रतिबंधित वस्तूही होत्या, काही जण तर मोठ्या बॅगा घेऊनही आलेले होते. मग त्यांना राजपथ आणि संचलन मार्गाच्या आसपासही जाण्यास मनाई केली जात होती. आम्ही मोबाईल, वॉलेट वगैरे काही जवळ ठेवलं नव्हतंच.

धावपळ करून आता इंडिया गेटच्या मागची मोक्याची जागा मिळाली होती. त्यामुळं आणखीच रोमांचित व्हायला झालं होतं. कारण स्वप्नपूर्तीची घटिका आता अगदी जवळ येऊन ठेपली होती. घड्याळात पाहिलं, तर सव्वानऊ झालेले होते. तिथून इंडिया गेटचा वरचा भाग दिसत होता. कारण आम्ही आणि इंडिया गेटच्या मध्ये एक मोठा पडदा उभा करण्यात आलेला होता. आता 9:35 वाजले होते. इंडिया गेटच्या त्या बाजूचं काहीच दिसत नसलं तरी आजवरच्या अनुभवावरून मित्राला म्हटलं, आता पंतप्रधान अमर जवान ज्योतीच्या इथं आलेले असतील. मग पाचच मिनिटांनी बिगुल वादनाची Last Post ची धून अगदी पुसटशी ऐकू आली. पंतप्रधानांकडून अमर जवान ज्योतीवर शहीद जवानांना आदरांजली वाहिली जात असल्याची ती खूण होती.

इकडे अजूनही संचलन पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी येतच होती. इथे जमलेली गर्दी जरा जास्तच त्रासदायक ठरत होती. धक्काबुक्की, आरडाओरडा करत बोलणं सुरूच होतं. सुरक्षेसाठी असलेले पोलिस सगळ्यांना व्यवस्थित उभे राहून संचलन पाहा असे सांगत होते. पण आपल्याकडे गर्दी कधी कोणाचं ऐकते का? उलट त्यातील काही जण पोलिसांना मुद्दाम चिडवत होती. काही वेळानंतर पुढे उभे असलेल्या माझ्यासारख्या इतरांना पोलिस म्हणाले की, तुम्ही खाली घालून बसा म्हणजे मागच्यांनाही दिसेल आणि ते शांत बसतील. आम्ही तसे केल्यावर मागची गर्दी आमच्या अंगावर यायला लागली. म्हणून शेवटी आम्हीही पुन्हा उभे राहिलो.

मित्र मला विचारत होता, संचलन कधी सुरू होणार?” मी त्याला म्हटलं, ठीक 10 वाजता, आता 9:50 होऊन गेले आहेत. त्यामुळे तिकडे सलामी मंचाजवळ उपराष्ट्रपती, पंतप्रधान पोहचले असतील आणि राष्ट्रपती प्रमुख पाहुण्यांबरोबर येऊ लागले असतील”. मग दहाच मिनिटांनी ठीक दहाच्या ठोक्याला तोफांचा आवाज येऊ लागला आणि मी मित्राला घड्याळ दाखवलं. म्हणजेच आता ध्वजारोहण, राष्ट्रगीत होऊन प्रत्यक्ष संचलन सुरू होत होतं.

PIB Photo

त्यानंतर पाचच मिनिटांनी आकाशातून हेलिकॉप्टर्सचा आवाज येऊ लागला आणि हवाईदलाची चार हेलिकॉप्टर्स उलट्या ‘Y’ आकारात उडत आमच्या डोक्यावरून निघून गेली. ही हेलिकॉप्टर्स राजपथावर पुष्पवर्षाव करत आली होती. आमच्यापर्यंत येईपर्यंत ही पुष्पवृष्टी जवळजवळ संपली होती, तरीही माझ्या मित्राच्या अंगावर त्यातील एक पाकळी पडलीच आणि त्याला त्याचा खूप आनंद झाला. त्यातील सर्वात पुढच्या हेलिकॉप्टर्सवर राष्ट्रध्वज आणि त्याच्या मागील तीन हेलिकॉप्टर्सवर तिन्ही सैन्यदलांचे ध्वज फडकत होते.

संचलनाच्या सर्वात पुढे असलेल्या परेड कमांडरांची जीप इंडिया गेटच्या मागेच थांबली. त्यांच्या मागे असलेली परेड सेकंड-इन-कमांडची जीप आमच्यासमोर यायला संचलन सुरू झाल्यानंतर 14 मिनिटं लागली. आता प्रत्यक्ष संचलन आमच्या समोरून जाऊ लागले. एनसीसीच्या त्यावर्षीच्या संचलन पथकात माझा पुतण्या, अभिषेकही सहभागी झालेला होता. मोठी शस्त्रास्त्रे इंडिया गेटच्या मागच्या बाजूलाच उभी राहिली आणि इतर छोटी शस्त्रास्त्रे आणि संचलन पथके तसेच चित्ररथ मात्र आमच्या समोरून टिळक मार्गाने लाल किल्ल्याकडे जाऊ लागले. ते पाहताना गर्दी असली, धक्काबुक्की होत असली तरी रोमांच काही कमी होत नव्हते. वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ आमच्यासमोरून पुढे सरकत असताना बिहारचा चित्ररथ समोर येताच आसपासच्या गर्दीमधल्या बिहारी तरुणांनी जल्लोष केला. त्यानंतर प्रत्येक राज्याच्या तरुणांनी तसे करायला सुरुवात केली. आम्हीही महाराष्ट्राचा चित्ररथ समोर आल्यावर जल्लोष केला. पण तिथे आमच्याशिवाय मराठी कोणी उपस्थित नव्हतेच.

PIB Photo
एकीकडे हे सुरू असताना मी मित्राला संचलनात काय काय होणार आहे ते क्रमाने सांगत होतोच. आता संचलन शेवटच्या टप्प्याकडे आले होते. राजपथावर सलामी मंचासमोरून कसरती करत आलेले मोटरसायकलस्वार आमच्यासमोर येऊन थांबू लागले. त्यांच्यानंतर काही मिनिटे शांतता होती. संचलन संपल्यासारखा भास होत होता. कारण आमच्यासमोर काहीच येत नव्हते. पण त्याचवेळी तिकडे सलामी मंचासमोर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले होते. पुढे 13 मिनिटांनी आकाशातून विमानांचे आवाज येऊ लागले आणि संचलनातील सर्वात रोमांचक भाग सुरू झाला, Fly past!

राष्ट्रपती भवनाकडून आकाशातून उडत आलेली हवाईदलाची हेलिकॉप्टर्स, विमाने आमच्या डोक्यातून कर्णभेदी असली रोमांचकारी वाटणारी गर्जना करत दृष्टीपलीकडे निघून जात होती. पहिल्यांदा आली 3 Mi-35 लढाऊ हेलिकॉप्टर्स, त्यानंतर 3 C-130J Super Hercules मालवाहू विमाने. मग आलेल्या Big Boy Formation मध्ये 1 IL-78 MKI त्याच्या बाजूने 2 AN-32 आणि 2 Dornier विमानंही उडत होती. त्यांच्यामागे होती 5 Jaguar  आणि 5 MiG-29 लढाऊ विमाने. ताशी 780 किलोमीटरने उडत ही विमाने आमच्या डोक्यावरून निघून गेली.

PIB Photo

PIB Photo

आता मात्र मी मित्राला लगेच तयार राहायला सांगितलं, कारण आता येणार होती 3 SU-30MKI लढाऊ विमानं त्रिशूळ Formation मध्ये. त्या विमानांनी वेगानं उडत येत आकाशात जात त्रिशुळाची आकृती तयार केली. आमच्या डोक्यावरूनच ही विमानं प्रचंड गडगडाट करत आकाशात वर गेली होती. आणि लगेचच त्यांच्या मागोमाग आणखी एका SU-30MKI नं आकाशात एकदम सरळ रेषेत वर जात स्वत:भोवती गिरक्या घेत आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले. अशा रितीने संचलनाचा शेवट झाला आणि आम्ही हॉटेलकडे निघालो. जाता जाता संचलनाच्या शेवटी हवेत सोडण्यात आलेले तीन रंगांचे फुगे आम्हाला दिसत होते.

संध्याकाळी फिरायला बाहेर पडल्यावर मी मित्राला पुन्हा इंडिया गेटकडे जाऊया म्हटलं. पुन्हा राजपथाकडे जाण्यासाठी तो जरा नाखुशच होता. पण त्याला म्हटलं की, आपल्याला राजपथावरचं आणि रायसीनावरचं लायटिंग पाहता येईल. मग आम्ही तिकडे गेलो आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमत्ताने उजळलेला तो सगळा परिसर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. आजपर्यंत फक्त दूरचित्रवाणीवर पाहिलेलं ते दृश्य प्रत्यक्षात समोर साकारलेलं होतं. काय नजारा होता तो!! हे पाहण्यासाठी तिथे प्रचंड गर्दी झाली होती. हे दृश्य पाहून माझा मित्रही मग खूश झाला. अशा रितीनं अनेक वर्षे पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आलं होतं. हे सगळं प्रत्यक्ष पाहत असताना त्या दिवशी माझ्या भावना काय होत्या हे शब्दांत मांडणं मात्र कठीण झालं आहे!



टिप्पण्या

  1. मी 1959 ते 62 परेड पहायला भल्या पहाटे 4 वा. जातहोते आणि.
    63 साली म्हणजे भारत चीन युद्धानंतर आमच्या कॉलेजने परेडमध्ये प्रत्यक्ष भाग धेतला होता, त्याची आठवण झाली

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा