सेइन नदीकडून दिसणारा आयफेल टॉवर. (फोटो - केदार होनप) |
आयफेल टॉवर – फ्रांसचे बोधचिन्ह. संपूर्ण फ्रांसमध्ये व्हर्सायपासून
मार्सेलिसपर्यंत कितीही भव्यदिव्य राजवाडे आणि अन्य ऐतिहासिक वास्तू उभ्या असल्या
तरी फ्रांस हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर जी प्रतिमा उमटते ती असते केवळ आयफेल
टॉवरचीच. पॅरिसमधून वाहणाऱ्या सेईन नदीच्या किनाऱ्यावर हा टॉवर उभा आहे. त्याच्या
उभारणीला सुरुवात झाली, त्या घटनेला यावर्षीच्या सुरुवातीलाच 135 वर्षे पूर्ण होत
आहेत.
आयफेल टॉवरची उभारणी 28 जानेवारी 1887 ला सुरू झाली होती. भव्य आणि
जगभरात फ्रांसची ओळख बनलेल्या आयफेल टॉवरचे आरेखन आणि उभारणी गुस्ताव आयफेल या
अभियंत्याने केली होती. त्याच्या नावावरूनच पुढे या टॉवरचे नामकरण केले गेले. तो
बांधून पूर्ण झाला त्यावेळी हे जगातील सर्वात उंच बांधकाम ठरले होते. पुढील काळात
जगात आयफेल टॉवरपेक्षाही उंच अनेक इमारती उभारल्या गेल्या. परिणामी जगातील सर्वात
उंच बांधकामांच्या यादीमध्ये 324 मीटर उंचीच्या आयफेल टॉवरचा क्रमांक खालीखाली
घसरू लागला. पण तरीही आजही ही रचना जगाला भुरळ घालत आहे आणि पॅरिसमध्ये येणाऱ्या
पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. परिणामी आजही आयफेल टॉवरला भेट देणाऱ्या पर्यटकांची
संख्या जगभरातील अन्य स्मारकांच्या तुलनेत सर्वाधिक असते.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या आदर्शांचा पुरस्कार करत घडलेल्या
फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पॅरिसमध्ये 1889
मध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या उत्सवाच्या
आयोजनस्थळाचे प्रवेशद्वार म्हणून एका आकर्षक रचनेची उभारणी करण्याचे ठरले होते.
त्यानुसार गुस्ताव आयफेल याने आयफेल टॉवर उभारला होता. त्याआधी 1888 मध्ये
स्पेनमधील बार्सिलोना येथे हा टॉवर उभारण्याची योजना होती. पण त्याचे आरेखन आणि
संकल्पना तेथील सरकारला न पटल्याने आयफेलचा प्रस्ताव फेटाळला गेला. तसेच या
टॉवरच्या उभारणीसाठी बराच खर्च येणार असल्यानंही स्पॅनिश सरकारने आयफेलच्या
आरेखनाला मंजुरी दिली नव्हती.
स्पेनमध्ये अपयश आल्यानंतर आयफेलने तोच प्रस्ताव फ्रेंच सरकारसमोर मांडून
त्याला मंजुरीही मिळवली. या टॉवरची उभारणी 15 मार्च 1889 ला पूर्ण झाल्यानंतर 31
मार्च 1889 ला पॅरिसमधील या नव्या बांधकामाचे औपचारिक उद्घाटन केले गेले. त्यानंतर
6 मे 1889 पासून आयफेल टॉवर सर्वांसाठी खुला करण्यात आला. सुरुवातीला आयफेल याला
हा टॉवर 20 वर्षांपर्यंतच उभा ठेवण्याची परवानगी मिळाली होती. म्हणजे 1909 मध्ये
हा टॉवर पाडला जाणे अपेक्षित होते. पण त्यानंतर पॅरिसच्या नगर प्रशासनाने या
टॉवरची मालकी स्वत:कडे
घेतली. त्यानंतरही या टॉवरचा काही भाग पाडण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती.
पण पुढे तो विचार मागे पडला. त्याचवेळी नभोवाणी प्रसारणासाठी या टॉवरचा उपयोग
करण्याला सुरुवात झाली. टॉवरवर 1899 मध्ये सुरू करण्यात आलेले एक नभोवाणी प्रसारण केंद्र
आजही कार्यरत आहे.
चार पायांवर उभा असलेला आयफेल टॉवर शिखराकडे निमुळता होत जातो. तीन
भागांमध्ये विभागलेल्या या टॉवरमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पायऱ्या तसेच
लिफ्टने जाता येते. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी 328 पायऱ्या चढाव्या लागतात.
त्यानंतर 340 पायऱ्यांनंतर येतो दुसरा मजला आणि त्यापुढे 18 पायऱ्यांनंतर येते
लिफ्ट. फक्त या लिफ्टच्या मदतीनेच तिसऱ्या मजल्यावर जाता येते. आयफेल टॉवरच्या
पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवर रेस्टॉरंट्स आहेत. गुस्ताव आयफेल याने त्या काळातील
फ्रांसमधील नामांकित 72 शास्त्रज्ञ, अभियंते आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींची नावे
या टॉवरवर कोरलेली आहेत.
आयफेल टॉवरच्या उभारणीसाठी 7300 टन पोलाद वापरण्यात आलेले आहे. हा संपूर्ण
टॉवर उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या अन्य साहित्याचाही त्यात समावेश केल्यास
त्यांच्यासह टॉवरचे वजन तब्बल 10,000 टन भरते. पोलादाचा प्रसरण-आकुंचन हा मूलभूत
गुणधर्म लक्षात घेऊन या टॉवरच्या काही टप्प्यांच्यादरम्यन थोडे अंतर ठेवण्यात
आलेले आहे. हवामानाचा पोलादावर परिणाम सतत होत असतो. त्यामुळे टॉवरला कोणत्याही
प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण आयफेल टॉवरला दर 7 वर्षांनी गंजरोधक
रंग दिला जातो. यासाठी सुमारे 60 टन रंग लागतो. टॉवरचा रंग पायथ्याकडील भागात
सर्वात गडद तपकिरी असून तो शिखराकडे फिकट होत जातो. आयफेल टॉवर उभारला जात
असलेल्या परिसरात वाहणाऱ्या वाऱ्यांचा विचार करून त्याचे आरेखन करण्यात आलेले आहे.
324 मीटर उंचीचे बांधकाम केले जात असताना हा विचार करणे आवश्यकच होते.
31 डिसेंबर 1999 रोजी नव्या सहस्त्रकाच्या स्वागताच्या निमित्ताने आयफेल
टॉवरवरून आतषबाजी करण्यात आली होती. त्यावेळी सुरू झालेली ही प्रथा आजपर्यंत कायम
आहे. 2000 मध्ये आयफेल टॉवरमध्ये 4 सर्च लाईट्स बसवण्यात आले. युरोपीय संघाचा
फ्रांस हा संस्थापक सदस्य आहे. 1 जानेवारी 2022 पासून फ्रांसकडे युरोपीय संघाचे
अध्यक्षपद आले आहे. हा योग साधून युरोपीय संघाच्या ध्वजातील बारा चांदण्या आणि
निळा रंग यांची प्रतिमा आयफेल टॉवरवर 31 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री उमटवण्यात
आली होती. दर तासाला चमचमणारे लाखो विद्युत दिवेही या टॉवरवर बसवण्यात आलेले आहेत.
आज सर्वात जास्त परदेशी पर्यटक भेट देणाऱ्या देशांमध्ये फ्रांस जगात अव्वलस्थानी
आहे आणि त्या पर्यटकांसाठी आयफेल टॉवर हे प्रमुख आकर्षण आहे.
आयफेल टॉवरवरून दिसणारे पॅरिसचे विहंगम दृश्य. (फोटो - केदार होनप) |
Uttam
उत्तर द्याहटवाKhuppp masta lekh aahe
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा