प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या रोषणाईत उजळलेले संसद भवन (फोटो-पीआयबी) |
भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाच्या उद्घाटनाला आता 95 वर्षे पूर्ण झालेली आहेत. रायसीना टेकडीच्या परिसरात वसलेले संसद भवन शंभरीकडे वाटचाल करत असतानाच त्याच्या शेजारीच नव्या संसद भवनाची उभारणी केली जात आहे. त्या नव्या इमारतीचे बांधकाम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय लोकशाहीचा कारभार नव्या संसद भवनातून सुरू होईल. तरीही आधीच्या संसद भवनाने भारताच्या संसदीय वाटचालीला, स्वातंत्र्यलढ्याला अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे महत्व कायम राहणार आहे.
पहिल्या महायुद्धानंतर भारतात लागू झालेल्या
माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांवर आधारलेला भारत सरकार अधिनियम, 1919 (Government
of India Act-1919) संमत करण्यात
आला होता. त्यानुसार भारतीयांच्या प्रतिनिधींचे विधिमंडळ अस्तित्वात येणार होते.
त्यामुळे त्याची इमारत नव्या राजधानीत, नवी दिल्लीत रायसीना परिसरातच उभारण्याचे
ठरले. हे ठिकाण Viceroy’s Lodge पासून
(सध्याचे राष्ट्रपती भवन) अगदी जवळ होते. नियोजित जागी विधिमंडळाच्या इमारतीची
पायाभरणी 12 फेब्रुवारी 1921 रोजी ड्युक ऑफ कनॉट यांच्या हस्ते झाली होती.
त्यानंतर सहा वर्षांत तिचे काम पूर्ण होऊन 18 जानेवारी 1927 ला या इमारतीचे
उद्घाटन तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड आयर्विन यांनी केले. वास्तुरचनाकार सर एडविन
ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी आरेखित केलेल्या या इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे
83 लाख रुपये खर्च आला होता.
1919 च्या भारत सरकार अधिनियमानुसार
अस्तित्वात आलेल्या सेंट्रल असेंब्लीत 144, तर कौंसिल ऑफ स्टेट्समध्ये 60 सभासद
होते. मात्र भविष्यातील सभासदसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन 450 सभासद बसू
शकतील असे भव्य सभागृह उभारण्यात आले होते. बारा दरवाज्यांची ही वर्तुळाकार इमारत
वास्तुरचनेचा एक उत्तम नमुना आहे. या इमारतीसाठी पिवळसर, तांबड्या
वालुकाश्माबरोबरच संगमरवरही वापरला गेले आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने 23 ते 29
जानेवारीदरम्यान संसद भवनावर करण्यात येणाऱ्या रोषणाईमुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलते.
ही वर्तुळाकार वास्तू वातानुकुलित असून तिचा व्यास 560 फूट आणि परिघ सहा एकर आहे.
पहिल्या मजल्यावरील व्हरांड्याभोवती 26 फूट उंचीचे 144 स्तंभ उभारलेले आहेत. हे
स्तंभ या इमारतीचे खास वैशिष्ट्य ठरत आहेत. संसद भवनाच्या तळमजल्यावर गोलाकार
व्हारांड्याच्या भिंतींवर वैदिक काळापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचे विविध
प्रसंग देशभरातून आलेल्या चित्रकारांनी रंगवलेले आहेत. तसेच संसद भवनात विविध
ठिकाणी संस्कृत, अरबी अशा विविध भाषांमधून काही बोधवाक्ये लिहिलेली आहेत. इमारतीमधल्या
इनर आणि आऊटर लॉबींमध्ये सभासदांच्या अनौपचारिक चर्चा होत असतात.
संसद भवनाच्या मध्यभागी पूर्ण गोलाकार मध्यवर्ती सभागृह (Central
Hall) असून त्याच्या घुमटाची त्रिज्या 98
फूट आहे. पूर्वी येथे विधिमंडळाचे ग्रंथालय होते. पुढे नुतनीकरणानंतर येथे 9
डिसेंबर 1946 पासून 24 जानेवारी 1950 पर्यंत घटना परिषदेच्या बैठका झाल्या होत्या.
मुख्य प्रवेशद्वारातून मध्यवर्ती सभागृहाकडे जाणाऱ्या वाटेवर कारंजी आणि पहिले
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. या सभागृहाच्या
प्रवेशद्वाराजवळ चंद्रगुप्त मौर्याचा पुतळा आहे. पंडित नेहरूंनी 14 ऑगस्ट 1947
च्या मध्यरात्री राष्ट्राला उद्देशून केलेले Tryst with Destiny हे भाषण, स्वतंत्र भारतासाठी
राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया अशा ऐतिहासिक घटनांचे हे सभागृह साक्षीदार आहे.
नवी लोक सभा अस्तित्वात आल्यावर संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्यावेळी आणि दरवर्षी
संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्यावेळी राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि महत्वाच्या
राष्ट्रांच्या प्रमुखांचे संबोधन त्याचबरोबर लोक सभा आणि राज्य सभा यांच्या
संयुक्त बैठका यासाठी मध्यवर्ती सभागृहाचा वापर केला जातो. मध्यवर्ती सभागृहाकडे जाणारा मार्ग (फोटो-पीआयबी)
संसद भवनातील ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृह (Photo-PIB)
मध्यवर्ती सभागृहाच्या भोवतीने तीन अर्धवर्तुळाकार सभागृहे आहेत.
त्यांपैकी एकामध्ये लोक सभा, दुसऱ्यामध्ये राज्य सभा भरते आणि तिसरे सभागृह ग्रंथालय
म्हणून वापरले जाते. लोक सभेत हिरव्या रंगाचे, तर राज्य सभेत लाल रंगाचे गालिचे
आणि आसने आहेत. लोक सभेतील 550 आणि राज्य सभेतील 250 आसने सहा भागांमध्ये आणि 11
ओळींमध्ये विभागलेली असून त्या ओळींची मांडणी घोड्याच्या नालेच्या आकाराप्रमाणे
आहे. त्यासमोर मध्यभागी सभापतींचे आसन आणि त्यापुढे सभागृहाच्या महासचिवांचे आसन
आणि सभापटल आहे. सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर विशिष्ट व्यक्ती, पत्रकार,
सर्वसामान्य नागरिक इत्यादींसाठी गॅलेऱ्या आहेत. लोक सभेच्या लाकडाने मढवलेल्या
भिंतींवर पहिल्या भारतीय विधिमंडळाचे अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांचे चित्र आणि अखंड
भारतातील विविध प्रांतांच्या सोनेरी रंगातील मुद्रा बसवण्यात आलेल्या आहेत.
भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 ला ब्रिटिश सरकारच्या
Public Safety Bill आणि Trade
Dispute Bill यांना विरोध
दर्शवण्यासाठी सेंट्रल असेंब्लीत (आताची लोक सभा) प्रेक्षक गॅलरीतून बाँब टाकला
होता. त्यांनी हा बाँब जेथून टाकला होता त्या जागेचे आता स्मारक करण्यात आले आहे.
दोन्ही सभागृहांबरोबरच मध्यवर्ती सभागृहामध्ये 1957 मध्ये विधेयकावरील
मतदानासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवण्यात आली. तिच्यामुळे मतदान आणि निकाल
ही प्रक्रिया 10 सेकंदातच पूर्ण होते. तसेच आधुनिक ध्वनी यंत्रणा, दूरचित्रवाणीचे
कॅमेरेही या सभागृहांमध्ये बसवण्यात आलेले आहेत. या तिन्ही सभागृहांमध्ये प्रत्येक
सभासदाच्या वक्तव्याचा हिंदी, इंग्रजीबरोबरच कोणत्याही भारतीय भाषांमधून थेट
अनुवाद ऐकण्याचीही सोय करण्यात आलेली आहे.
तिसरे अर्धवर्तुळाकार सभागृह स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानिकांच्या
बैठकांसाठी वापरले जात असे. त्यामुळे त्याला त्यावेळी Prince’s Chamber म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर तेथे
15 ऑगस्ट 1987 पर्यंत संसदेचे ग्रंथालय सुरू होते. संसद भवनातील तिन्ही
सभागृहांच्या भोवतीच्या चार मजल्यांवर सभापती, मंत्री, पक्ष कार्यालये, लोक सभा
आणि राज्य सभा सचिवालयांची कार्यालये, संसदीय कामकाज मंत्रालय, भारतीय स्टेट
बँकेचा कक्ष, टपाल, रेल्वे आणि विमान आरक्षण कक्ष आहेत. पहिल्या मजल्यावर संसदीय
समित्यांसाठी आणि पत्रकारांसाठी प्रत्येकी तीन कक्ष आहेत.
संसद भवनाच्या परिसरात विविध नेत्यांचे पूर्णाकृती आणि अर्धपुतळे
उभारलेले असून ठिकठिकाणी कारंजी आणि बगीचे केलेले आहेत. संसद भवनाच्या स्वागत
कक्षाच्या वातानुकुलित इमारतीच्या बांधकामात नव्या-जुन्या वास्तुशैलींचा सुंदर
मिलाफ झालेला आढळतो. तेथे प्रेक्षक खासदारांच्या भेटी घेऊ शकतात.
संसदेच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन संसदीय सौंध या इमारतीची
उभारणी केली गेली. जे. एम. बेंजामिन यांनी आरेखित केलेल्या या इमारतीचे 24 ऑक्टोबर
1975 मध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले.
अभ्यासपूर्ण
उत्तर द्याहटवाधन्यवाद...
हटवापरिपूर्ण लेख
उत्तर द्याहटवा