‘विक्रांत’

  


1971 मध्ये 4 आणि 5 डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने Operation Trident द्वारे पाकिस्तानच्या कराची बंदरावर यशस्वी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाचे प्रचंड नुकसान झाले होते. भारतीय नौदलाने गाजवलेल्या त्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी भारतीय नौदलाच्या विमानवाहू जहाजावरील, भा. नौ. पो. विक्रांतवरील (आयएनएस विक्रांत) सी हॉक आणि ॲलिझे विमानांनी पूर्व पाकिस्तानातील चित्तगाँग आणि कॉक्स बझार या बंदरांवर हल्ले चढवले होते. त्या दोन्ही घटनांना या 4 डिसेंबरला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. बांगलादेश मुक्तियुद्धाच्या 50 व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने भारतात स्वर्णिम विजय वर्ष सोहळा साजरा केला जात आहेच. या पार्श्वभूमीवर बांगलादेश युद्धात पराक्रम गाजवलेल्या आणि सेवानिवृत्तीनंतर संग्रहालय म्हणून नावारुपाला आलेल्या, अल्पावधीतच मुंबईतील एक आकर्षण ठरलेल्या, पण आता इतिहासजमा झालेल्या विक्रांतवरील त्याच संग्रहालयाविषयी...

      भारतीय नौदलाच्या सेवेतून 31 जानेवारी 1997 ला विक्रांत निवृत्त झाले. ते भारतीय नौदलाचे पहिले विमानवाहू जहाज होते. विक्रांत भारतीय नौदलात 4 मार्च 1961 ला सामील झाले. भारतीय नौदलाचे ते पहिले विमानवाहू जहाज होते. त्यापूर्वी ते ब्रिटनच्या रॉयल नेव्हीत एच. एम. एस. हर्क्युलिस म्हणून कार्यरत होते. भारताने 1957 मध्ये ते ब्रिटनकडून विकत घेतले होते. 1971 च्या बांगलादेश मुक्तियुद्धात या जहाजाने पूर्व आघाडीवर मोठा पराक्रम गाजवला होता.

विक्रांतने गाजवलेल्या पराक्रमाची भावी पिढीला ओळख व्हावी या हेतूने त्यावर नौदलाने एक तात्पुरते पण आकर्षक संग्रहालय उभारले होते. त्यामधून विमानवाहू जहाजावरील नौसैनिकांच्या जीवनाची ओळख करून देण्यात आलेली होती. ते संग्रहालय मुंबईतील नाविकतळावर सर्वांना पाहण्यासाठी दरवर्षी नौदल सप्ताहात खुले ठेवले जात होते. ते पाहण्यासाठी बरीच गर्दीही होत असे.

      विक्रांतचे संग्रहालयात रुपांतर केल्यावर त्यावरील डेकच्या धावपट्टीखालील दोन मजले आणि नियंत्रण कक्षातील एक मजला दर्शकांसाठी खुले करण्यात आले होते. त्यातील प्रत्येक कक्षात देखाव्यांच्या माध्यमातून संबंधित कक्षात चालणाऱ्या कामकाजाची ओळख करून दिली गेली होती. तिथे ठेवण्यात आलेले पुतळे अतिशय सुबक आणि सजीवच भासावेत असे होते. मी आणि माझा मित्र सागरने या संग्रहालयात प्रवेश केल्यावर समोरच सॅल्युट करणाऱ्या नौसैनिकांचे दोन पुतळे दिसले. ते पाहून आम्ही फसलो होतो. आम्हाला प्रत्यक्ष नौसैनिकच आपल्याला सॅल्युट करत आहेत असे वाटले होते. विक्रांतवरच्या संग्रहालयात प्रवेश केल्याकेल्या तिथे विक्रांतची आणि त्यावेळी भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या काही युद्धनौकांच्या प्रतिकृती ठेवलेल्या होत्या. विक्रांतचा इतिहासही तेथे मांडण्यात आला होता. पुढे विक्रांतच्या पुढील भागाकडे गेल्यावर त्याच्या नांगरांचे भलेमोठे साखळदंड पाहून डोळे विस्फारले. तेथून पुढे गेल्यावर विक्रांतच्या धावपट्टीखाली असलेल्या हँगरमध्ये पोहचलो. तिथे विक्रांतवरून सेवा बजावलेली विमाने, हेलिकॉप्टर्स आणि विविध प्रकारची शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली होती.

चितगाँग आणि कॉक्स बझारवरील हल्ल्याचा हलता देखावा.  

हँगरमध्ये प्रवेश करताच सर्वात आधी विक्रांतवरच्या विमानांनी तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील कॉक्स बझार आणि चित्तगाँगवर कसे निर्णायक हल्ले चढवले होते, त्याचे हलते देखावे सादर करण्यात आले होते. तिथूनच थोडे पुढे गेल्यावर विक्रांतवरची भलीमोठी लिफ्ट पाहायला मिळाली. त्या लिफ्टवर नौदलाचे एक चेतक हेलिकॉप्टर ठेवण्यात आले होते आणि त्यावरून हँगरमधली विमानं कशा पद्धतीनं वरच्या धावपट्टीवर नेली जात याची आपल्याला कल्पना येत असे. 

 
     ‘विक्रांत’च्या हँगरमध्ये ठेवलेली विमाने     
आणि इतर साधनसामग्री
त्या लिफ्टच्या पलीकडे हँगरच्या दुसऱ्या भागात ‘विक्रांतवर सुरुवातीच्या काळात विशेषत: 1971 च्या युद्धाच्यावेळी कार्यरत असलेली विमाने, हेलिकॉप्टर्स आणि त्यांची शस्त्रास्त्रे मांडलेली होती. त्यांची माहिती देणारे फलकही तिथे लावलेले होतेच. विमानवाहू जहाजाच्या संरक्षणासाठी वापरली जाणारी छोटी पाणबुडीही तेथे ठेवण्यात आलेली होती. विशेष कारवायांसाठी मरीन डायव्हर्स वापरत असलेले विशेष पोशाखही तिथे आम्हाला पाहायला मिळाले. पंखाच्या घड्या घालून हँगरमध्ये उभी असलेली विमाने त्यांनी विक्रांतवरून गाजवलेल्या पराक्रमाची ओळख करून देत होती. या प्रदर्शन कक्षातच दुसऱ्या बाजूला भारताच्या समृद्ध सागरी इतिहास आणि परंपरांची माहिती करून देणारे नकाशे, चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती.

हँगरमध्ये मांडण्यात आलेल्या सर्व गोष्टी पाहून झाल्यावर आम्ही डेकवरच्या धावपट्टीवर गेलो. त्या धावपट्टीवर गेल्यावर खरंच रोमांचित व्हायला झाले. कारण याच धावपट्टीवरून 1971 च्या युद्धात नौदलाच्या लढाऊ विमानांनी पूर्व पाकिस्तानवर निर्णायक हल्ले चढवले होते. धावपट्टीवर असलेल्या नौदलाच्या गाईडनेसुद्धा ही माहिती सांगितली. त्या धावपट्टीवर विक्रांतवर सेवा वजावून निवृत्त झालेले सी किंग हेलिकॉप्टर ठेवण्यात आले होते.

विक्रांत’ची वॉर रुम
    धावपट्टीवरून पुढे विक्रांतवरचे युद्ध कक्ष, नियंत्रण कक्ष, नौसैनिकांचे भोजनालय, स्वयंपाकघर, रुग्णालय, साधनसामग्रीचा कक्ष इत्यादी कक्षही पाहायला मिळाले आणि शिवाय तिथे उभारलेल्या देखाव्यांमुळे त्या कक्षांमध्ये कशा प्रकारे कामकाज चालत होते याचीही कल्पना आली. या कक्षांकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूने विविध प्रसंगी नौदल कर्मचारी वापरत असलेले विविध प्रकारचे गणवेश, विविध प्रकारचे शौर्य पुरस्कार यांची माहिती करून दिलेली होती. इथून पुढे विक्रांतला गती देणाऱ्या इंजिन रुममध्ये पोहचलो. तिथे गेल्यावर भल्यामोठ्या पाईप, पंप, चक्रे पाहायला मिळाली. सगळ्याच वस्तू इथे अजस्त्र वाटत होत्या. त्याच ठिकाणी या सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षही होता. इथून पुढचा मार्ग या प्रदर्शनाच्या बाहेरच्या दाराकडे जात होता. मात्र जाताना वाटेत तो कँटिन आणि भेटवस्तूंच्या दुकानांवरून जात होता. मी आणि माझा मित्र सागर तिथून काही भेटवस्तू खरेदी करून विक्रांतवरून खाली उतरलो. खूप छान झाली होती ती संग्रहालयरुपी विक्रांतची भेट.

विक्रांत’वर नौसैनिक आणि नौदल अधिकारी वापरत असलेले गणवेश
      बांगलादेश युद्धात पराक्रम गाजवलेल्या विक्रांतचे जतन करण्याचे महाराष्ट्र शासनाने बरेच संकल्प सोडले होते. मात्र त्याबाबत पुढे काही झाले नाही. दरम्यानच्या काळात भारतीय नौदलाने त्यावर तात्पुरते संग्रहालय उभारून त्याची डागडुजी सुरू ठेवली होती. खाऱ्या पाण्यामुळे जहाजाच्या बाह्य आवरणावर परिणाम होत होता आणि त्याच्या डागडुजीसाठी दरवर्षी 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येत होता. डागडुजीचा वाढता खर्च आणि नाविकतळाच्या सुरक्षेचा प्रश्न या दोन्ही बाबी विचारात घेऊन अखेर नौदलाने ते जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आणि भारताच्या इतिहासातील स्फूर्तीदायक पराक्रमाचा एक साक्षीदार कायमचा इतिहासजमा झाला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा