![]() |
पहिले पत्र |
26 नोव्हेंबर 2001. त्या दिवशी मी गावाहून
परतलो आणि घरात आल्याआल्या एक पाकीट हातात पडलं. पाकीटावर पाठवणाऱ्याचा पत्ता होता
तो बघितला, तर लिहिलं होतं ГОЛОС
РОССИИ (रशियन भाषेतील
उच्चार – गोलस रसिइ) म्हणजे Voice of Russia. ते वाचून एकदम आनंदित झालो होतो. कारण काही
महिन्यांपूर्वी रेडिओवर काटा फिरवत असताना शॉर्ट वेववर एका ठिकाणी रशियन भाषेतून
काहीतरी ऐकू येतंय असं लक्षात आलं होतं. ते प्रसारण भारतासाठी नव्हतं, त्यामुळं
पुसटसं ऐकू येत होतं. थोडे दिवस ते तसंच ऐकत राहिलो होतो. मग त्या प्रसारण
केंद्राचा पत्ता ऐकण्याचा प्रयत्न केला, पण पुसटसं ऐकू येत असल्यामुळे जितकं समजलं
तेवढ्याच पत्त्यावर पत्र पाठवण्याचं ठरवलं होतं. तोडक्यामोडक्या रशियनमधून छोटं
पत्र लिहून झालं आणि त्यावर Voice of Russia, Moscow, Russia एवढाच पत्ता घालून ते पाठवलं. परदेशात पत्र
पाठवायचं असल्यामुळे एवढ्याशा पत्त्यावर पत्र पोहचेल का, अशी शंका होतीच. पण पत्र
योग्य जागी पोहचल्याची पावती म्हणजे त्यांच्याकडून आलेलं ते उत्तर होतं.
पाकीट उघडून बघितलं तर माझ्या अपेक्षेपेक्षा
वेगळंच होतं. मी पत्र रशियन भाषेतून लिहिलेलं असल्यामुळे उत्तरही रशियनमधून असेल
असं वाटत होते, पण पत्र चक्क शुद्ध हिंदीतून पाठवलेलं होतं. ते पाहूनही चक्रावलो. त्या
पत्राबरोबर रेडिओची कार्यक्रमपत्रिका, भेटकार्डही होतं. त्या घटनाक्रमाला यंदा 20
वर्षे पूर्ण होत आहेत.
![]() |
सोची 2014 हिवाळी ऑलिंपिकच्या निमित्ताने व्हॉईस ऑफ रशियाने आयोजित केलेल्या स्पर्धेत मिळालेले दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. (स्पर्धेच्या तीन शुभंकरांपैकी एक शुभंकर - हिमबिबट्या) |
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice
of Russia ची हिंदी सेवा
ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर
लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक
साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल
रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित
झालो. मग तेव्हापासून मी या केंद्राचे कार्यक्रम नियमितपणे ऐकण्यास आणि त्याच्या
विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा क्रमही सुरू झाला, अगदी 2014
मध्ये हे प्रसारण केंद्र बंद होईपर्यंत.
Voice of Russia या नभोवाणी केंद्राच्या माध्यमातून एक नवा साथीदार मला मिळाला होता. त्याचे माझ्या आयुष्यात अतिशय महत्वाचे स्थान राहिले. हे नभोवाणी केंद्र मी ऐकण्यास सुरुवात केली, त्याच्या अडीचच महिने अगोदर अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 ला दहशतवादी हल्ले झाले होते. त्या हल्ल्यांनंतर आपोआपच सगळ्या जगातून अमेरिकेच्या बाजूने सहानुभूती वाढलेली होती. त्यामुळे पाश्चात्य प्रसारमाध्यमांमधून नेहमीप्रमाणे फक्त अमेरिकेची भूमिका कशी योग्यच आहे याचाच प्रचार केला जात होता. पण अशा प्रत्येक महत्वाच्या घटनेच्यावेळी त्याची दुसरी बाजू सांगण्याचे कामही Voice of Russia केले आणि तेही समतोल पद्धतीने, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता, भडक भाषा न वापरता! योगायोगाने त्याच वर्षी मी पुणे विद्यापीठात एम. ए.ला अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हा विषय घेतला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारण हाही एक विषय होता. या दोन्ही विषयांची तयारी करण्यातही Voice of Russia ची मदत होत राहिली. त्याच वर्षी पुणे विद्यापीठाच्या परदेशी भाषा विभागात रशियन भाषा शिकत असल्यामुळे Voice of Russia बरोबर रशियनमधूनही पत्रसंवाद होत राहिला आणि त्याला नियमित उत्तरेही मिळत राहिली.
Voice of Russia हे रशियन सरकारचे आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्र
होते. Voice of Russia च्या
हिंदी कार्यक्रमांचा दर्जाही उत्तम असायचा. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री
संबंधांची छाप त्याच्या प्रसारणातून, उद्घोषकांच्या भाषेतून दिसून येत असे. 29
ऑक्टोबर 1929 रोजी हे प्रसारण केंद्र सुरू झाले होते आणि ते जगातील पहिले
आंतरराष्ट्रीय प्रसारण केंद्र होते. सोव्हिएट संघाच्या विघटनापर्यंत ते Radio
Moscow या नावाने
ओळखले जात होते. सुरुवातीची काही वर्षे त्यावरून फक्त जर्मन आणि इंग्रजी भाषेतून
कार्यक्रम प्रसारित होत होते. मात्र कालांतराने या केंद्राने आणखी काही भाषांमधून
आपले प्रसारण सुरू केले. हे केंद्र बंद होत असताना जगातील 39 भाषांमधून 160
देशांसाठी दररोज एकूण 82 तास कार्यक्रम प्रसारित करत होते. 1 एप्रिल 2014 ला हे
केंद्र बंद होत असताना ते जगातील तिसऱे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्र ठरले
होते.
Radio Moscow ची सुरुवात झाल्यानंतर आपल्या देशाच्या
ध्येयधोरणांची माहिती अन्य देशांमध्ये सहजतेने पोहोचवता येऊ शकते हे अन्य
देशांच्याही लक्षात आले. परराष्ट्रातील जनतेला आपल्या देशाबाबत माहिती करून
देतानाच तिच्यात आपल्या देशाविषयी चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी नभोवाणी हे
सहज, सोपे आणि प्रभावी साधन मानले जाऊ लागले. परिणामी काही वर्षांनी ब्रिटन, जपान
यांनीही आपापली आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्र सुरू केली.
Radio Moscow वरून भारतासाठी हिंदी भाषेतून प्रसारण 18 मे
1942 ला सुरू झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात हे केंद्र 16 भारतीय
भाषांमधून कार्यक्रम प्रसारित करत होते आणि तसे करणारे ते जगातील एकमेव
आंतरराष्ट्रीय प्रसारण केंद्र होते. तेव्हापासूनच भारताच्या विविध भागांमध्ये
राहणारे श्रोते आणि Radio Moscow
यांच्यात आपुलकीचं नातं तयार होत गेलं. पुढे सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर बिकट
आर्थिक परिस्थितीमुळे हिंदी, उर्दू आणि बंगाली या व्यतिरिक्त अन्य भारतीय
भाषांमधील प्रसारण बंद झाले.
भारत आणि रशिया यांच्यातील विस्तृत संबंधांना सामान्य जनतेच्या
स्तरापर्यंत विकसित करून त्यांना एक भावनिक पैलू पाडण्यात Radio Moscow चे मोलाचे योगदान राहिले आहे. जगातील
सर्वात विशाल आणि पोलादी पडद्यामुळे तितक्याच गूढ बनून राहिलेल्या आणि भारताचे
घनिष्ठ मित्रराष्ट्र राहिलेल्या रशियाची ओळख करून घेण्याचे Radio Moscow/ Voice
of Russia हे एक उत्तम
साधन होते. या केंद्रातील भारतीय भाषांसाठीचे जवळजवळ सर्वच उद्घोषक रशियन होते.
त्या सर्वांनी भारतात येऊन त्या-त्या भाषांचे शिक्षण घेतले होते. त्यातीलच एक
होत्या इरिना लेबेदेवा. Radio Moscow च्या मराठी भाषेतील सेवेत रुजू होण्यापूर्वी त्या पुणे विद्यापीठातून
मराठी भाषेचे शिक्षण घेऊन गेल्या होत्या.
Voice of Russia च्या प्रसारणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते.
त्याच्या हिंदी सेवेवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या तसेच विश्लेषणांमध्ये
रशियातील, दक्षिण आशिया आणि रशिया संबंधांमधील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील
महत्वाच्या घटना, रशियन संस्कृती, इतिहास इत्यादींनाच स्थान मिळत असे. BBC किंवा Voice of America यांच्या हिंदी सेवांच्या अगदी उलट
परिस्थिती होती, यांच्या प्रसारणाचा भर भारतातील घडामोडींवरच असे. भारताचा
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मॉस्कोतील भारतीय राजदूताची
मुलाखत प्रसारित करण्याची परंपरा Voice of Russia ने जपली होती.
Voice of Russia भारतातील आपल्या श्रोत्यांचे नियमितपणे संमेलन आयोजित करत असे. नवी दिल्लीतील Russian Centre of Science and Culture इथे ते संमेलन आयोजित केले जात असे. त्याचे उद्घाटन भारतातील रशियन राजदूतांच्या हस्ते होत असे. यातील 2010 मध्ये झालेल्या संमेलनाला मी हजेरी लावली होती. तिथे मराठी येत असलेल्या श्रीमती लेबेदेवा यांच्याशी थोडा मराठीतून, थोडा रशियनमधून आणि बाकी हिंदीतून माझा संवाद झाला.
![]() |
नवी दिल्लीतील श्रोते संमेलनाला उपस्थित असलेले (डावीकडून भारतातील तत्कालीन रशियन राजदूत कदाकिन, व्हॉईस ऑफ रशियाच्या उद्घोषिका लेबेदेवा आणि जेएनयूतील प्रा. अरुण मोहंती) |
आठवणीना उजाळा मिळाला की पुन्हा एकदा आंनद द्विगुणीत होतो .
उत्तर द्याहटवाहो खरं आहे.
हटवा👏👏
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा