![]() |
INS Visakhapattanam : Indian Navy's new Stealth Guided Missile Destroyer. (Photo - PIB) |
मुंबईतील माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ‘भा. नौ. पो.
विशाखापट्टणम’ (आय.एन.एस. विशाखापट्टणम) ही स्वदेशी अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका 21
नोव्हेंबरला भारतीय नौदलात सामील होत आहे. ती भारतीय नौदलातील आतापर्यंतची सर्वात
अत्याधुनिक, सर्वात मोठी आणि हिंदी महासागरातील सर्वांत शक्तिशाली विनाशिका ठरणार आहे.
ही विनाशिका भारताच्या आणि भारतीय नौदलाच्या तांत्रिक, सामरिक, कौशल्यात्मक ताकदीचे
प्रतीक बनणार आहे.
विसाव्या शतकाच्या अखेरीस भारताच्या राष्ट्रहितांचा विस्तार संपूर्ण हिंदी
महासागरावर झाला. तेव्हापासूनच भारताच्या सागरी सुरक्षेसमोर अनेक आव्हानेही
निर्माण होत गेली आहेत. ही परिस्थिती विचारात घेऊन भारताने आपल्या नौदलाची त्रिमितीय
शक्ती वाढवण्यासाठी 1990च्या दशकापासूनच विविध प्रकल्प हाती घेतले. त्या
प्रकल्पांतर्गत भारतीय नौदलासाठी विविध प्रकारच्या अत्याधुनिक युद्धनौका,
पाणबुड्या स्वदेशातच बांधल्या जाऊ लागल्या आहेत. त्याचवेळी काही शस्त्रास्त्रांची
गरज परदेशांकडून खरेदी करून भागवली जात आहे. ‘प्रोजेक्ट-15
बी’ असाच एक प्रकल्प. भारतीय नौदलासाठी ‘प्रोजेक्ट-15
बी’अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञान व आरेखनावर आधारित अत्याधुनिक
स्टेल्थ विनाशिका बांधल्या जात आहेत. भारतीय नौदलाच्या स्वदेशी विनाशिका
बांधणीच्या ‘प्रोजेक्ट-15 ए’चा तो पुढचा टप्पा आहे. ‘प्रोजेक्ट-15 बी’मध्ये बांधल्या जात असलेल्या विनाशिका भारतात
बांधण्यात आलेल्या आजपर्यंतच्या सर्वांत अत्याधुनिक आणि मोठ्या विनाशिका आहेत.
‘प्रोजेक्ट-15 ए’मधील विनाशिकांच्या (कोलकाता, कोची, चेन्नई) बांधणीच्या अनुभवानंतर अशा प्रकारच्या आणखी चार विनाशिकांची बांधणी करण्याला (प्रोजेक्ट-15 बी) संरक्षण मंत्रालयाने 2011 मध्ये मान्यता दिली होती. ‘प्रोजेक्ट-15 ए’मधील सर्व विनाशिकांचे गोदीतील मुख्य काम 2013 मध्ये संपल्यावर नव्या ‘प्रोजेक्ट-15 बी’मधील विनाशिकांची बांधणी सुरू करण्यात आली. कोलकता श्रेणीतील विनाशिकांच्या आरेखनात काही सुधारणा करून आणि आणखी काही वैशिष्ट्यांचा समावेश करून ‘प्रोजेक्ट-15 बी’ तयार करण्यात आला आहे. यातील पहिल्या विनाशिकेचे भा. नौ. पो. विशाखापट्टणम असे नामकरण करण्यात आले आहे. तिचे 21 नोव्हेंबर 2021 ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते मुंबईतील नाविकतळावर भारतीय नौदलात सामिलीकरण होत आहे.
![]() |
‘विशाखापट्टणम’चा जलावतरण समारंभ. (फोटो-पीआयबी) |
त्याआधी या विनाशिकेच्या मुख्य कणा (keel) असलेला भाग 12 ऑक्टोबर 2013 रोजी बसवण्यात आला होता. त्यानंतर 20 एप्रिल 2015 ला तिचे जलावतरण करण्यात आले होते. या ‘प्रोजेक्ट-15 बी’मध्ये - मोर्मुगाव, इंफाळ, सुरत या अन्य विनाशिका बांधल्या जात आहेत.
‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील युद्धनौकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नव्या
वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर बसविण्यात येणारे निर्भय हे
स्वदेशी बनावटीचे सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र. एक हजार किलोमीटर दूरच्या
लक्ष्यावर मारा करू शकणारे हे क्षेपणास्त्र असून सध्या त्याचा विकास करण्यात येत
आहे. याबरोबरच स्वनातीत (सुपरसॉनिक) क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसही ‘प्रोजेक्ट-15 बी’मधील युद्धनौकांवर बसविण्यात आलेले आहे. या दोन
क्षेपणास्त्रांमुळे समुद्रात संचार करत असताना शत्रुच्या भूमीवरील लक्ष्यांचा व युद्धनौकांचा
प्रभावीपणे वेध घेणे विशाखापट्ट्णमला शक्य होणार आहे. या विनाशिकांवरील अशाच अन्य
काही शस्त्रसामग्री आणि दळणवळण यंत्रणांमुळे भारतीय नौदलाची निळ्या पाण्यावरील शक्ती
वाढणार आहे.
कोलकता श्रेणीतील युद्धनौकांपेक्षा ‘प्रोजेक्ट-15 बी’मधील युद्धनौकांच्या बाह्यभागाला विशिष्ट प्रमाणात कोन करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे या युद्धनौकेला थडकून शत्रुच्या रडार, त्याचबरोबर ध्वनी आणि इंफ्रारेड लहरींचे नगण्य परावर्तन होते.
‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील विनाशिका 7400 टन वजनाच्या आहेत. ताशी 30 सागरी मैल
किंवा 56 किलोमीटर वेगाने या विनाशिका समुद्रात संचार करू शकतात. समुद्रात दूरवर
टेहळणी, पाणबुडीविरोधी कारवाई, मदत आणि बचाव अशा विविध मोहिमांसाठी यातील प्रत्येक विनाशिकेवर दोन
सी-किंग, धृव किंवा कामोव्ह-31 ही हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय आहे. विनाशिकेच्या दिशेने येत
असलेल्या हवेतील लक्ष्याचा 100 ते 150 किलोमीटर दूरवरूनच शोध घेऊन त्यावर हल्ला
करण्यासाठी बराक-8 ही क्षेपणास्त्र यंत्रणा ‘विशाखापट्टणम’वर बसविण्यात आली आहे.
त्याचबरोबर तोफा आणि शत्रुच्या पाणबुड्यांचा वेध घेण्यासाठी पाणतीर (torpedos) आणि रॉकेट्स या विनाशिकेवर बसवलेली आहेत.
सुरुवातीच्या नियोजनानुसार ‘प्रोजेक्ट-15 बी’मधील पहिली विनाशिका 2015 च्या
मध्यावर नौदलाला मिळणे अपेक्षित होते. मात्र ‘प्रोजेक्ट-15 ए’मधील विनाशिकांच्या कामाला तब्बल पाच वर्षांचा विलंब झाल्याने पुढील प्रकल्प
हाती घेण्यासही विलंब झाला आहे. ‘पी-15 ए’मधील विनाशिकांच्या बांधणीसाठी गोदीत आवश्यक असलेल्या
पायाभूत सुविधा उभारण्यातील आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी लागलेला वेळ
यांसारख्या कारणांमुळे या विनाशिकांचे काम रखडत गेले. सुरुवातीला ‘पी-15 बी’मधील पहिली विनाशिका जून
2018 पर्यंत आणि उर्वरित तीन युद्धनौका 2024 पर्यंत दर दोन वर्षांनी एक याप्रमाणे
नौदलात सामील करण्याची योजना होती.
वसाहतवादाच्या आधीच्या काळात भारताने जहाजबांधणी क्षेत्रात
उल्लेखनीय यश संपादित केले होते. भारताने त्याद्वारे जगात आपली स्वतंत्र ओळख
निर्माण केली होती. युरोपीयनांचे भारतात जेव्हा आगमन झाले, तेव्हा त्यांनाही
भारताच्या या कौशल्याने प्रभावित केले होते. पुढे वसाहतवादाच्या काळात ब्रिटिशांनी
भारतातील या ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ स्वतःच्या जहाजबांधणी क्षेत्राच्या
विकासासाठी करून घेतला. मात्र त्याचवेळी त्यांच्याकडून भारतातील हा उद्योग बंद
पाडण्यात आला. पुढे पारतंत्र्य, गरिबी इत्यादी कारणांमुळे भारतात जहाजबांधणी
उद्योग उभारी घेऊ शकला नव्हता. मात्र 1980 च्या दशकापासून भारताने युद्धनौका
बांधणीच्या क्षेत्रात स्वदेशीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यास सुरुवात केली.
त्यानंतर गोदावरी, दिल्ली, कोलकाता, शिवालिक, विक्रांत, कामोर्टा अशा वेगवेगळ्या श्रेणींच्या
अत्याधुनिक युद्धनौकांची स्वदेशातच आरेखन व बांधणी करून या क्षेत्रातील आपल्या
परंपरागत कौशल्याचे जगाला पुन्हा एकदा प्रदर्शन घडविण्यास सुरुवात केलेली आहे. ‘भा. नौ. पो. विशाखापट्टणम’ हे त्याचेच आणखी एक उदाहरण आहे.
Nice
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाVery good 👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाSuperb 👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवा