लॉकडाऊननंतरचा पहिला प्रवास

मुंबईकडे निघालेली कोयना कोव्हीड-19 विशेष

बदला-बदलासा एहसास

       सर्वांनीच गेल्या वर्षी लॉकडाऊन म्हणजे काय ते अनुभवलं आहे. त्याचा परिणाम सर्वच बाबींवर झाला आहे. लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली सर्व प्रकारची वाहतूक मे-जून 2020 पासून अतिशय मर्यादित प्रमाणात सुरू होत होती. सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये अजून काही रेल्वेगाड्या कोव्हीड-19 विशेष रेल्वेगाड्या म्हणून सुरू केल्या जात होत्या. त्यापैकीच एक होती कोल्हापूर आणि मुंबईदरम्यान धावणारी कोयना एक्सप्रेस. जवळजवळ सात महिन्यांपासून मी कोल्हापुरात अडकून पडलो होतो. त्यामुळे ही गाडी सुरू झाल्यावर मी त्या गाडीने पुण्याला यायला निघालो. या प्रवासाच्यावेळी बरंच काही बदललेलं दिसत होतं.

      कोयनेचे आरक्षण केल्यावर मी सकाळी लवकरच कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर पोहचलो. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा परिणाम रेल्वेच्या प्रत्येक बाबीवरही दिसत होता. स्थानकात प्रत्येकाला तिकीट तपासूनच प्रवेश दिला जात होता. दोन नंबरच्या फलाटावर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी कोयना उभी होतीच. अजून बाकीच्या गाड्या सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे एरवी कोयना सुटण्याच्या आधी दिसणारी प्रवाशांची गर्दी आणि लगबग यावेळी दिसत नव्हती. फक्त महाराष्ट्र कोव्हिड-19 विशेष पिटलाईनवर उभी होती आणि काही अतिरिक्त डबे इतर लाईन्सवर उभे करून ठेवण्यात आलेले होते.

कल्याणचे निळ्या रंगातील दोघे डब्ल्यूडीएम-3 डी कार्यअश्व आमच्या गाडीचे सारथ्य करण्यासाठी सज्ज होते. लोको पायलट्सकडून गाडी सुरू करण्याआधीची सर्व प्रक्रिया पार पाडली जात होती. ते लोको पायलट्स गळ्यात ओळखपत्र अडकवूनच आले होते. लॉकडाऊनमध्ये झालेला हा आणखी एक बदल. तिकडे मागे गार्डही गाडी सुटण्याआधीचे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्यात मग्न होता.

लॉकडाऊननंतरच्या काळात कोयनाही बदलली होती. आजपर्यंत फक्त आसन (Seating) व्यवस्था असलेल्या डब्यांच्याबरोबरीने आता कोयनेला तीन शयनयान श्रेणीचे आणि एक 3-टियर वातानुकुलित शयनयान जोडले जाऊ लागले आहेत. कोरोनाच्या काळात अनारक्षित म्हणजेच जनरल श्रेणीच गायब झालेली आहे. कोयनेच्या वेळापत्रकातही आता बदल झाले आहेत. या गाडीचे कोल्हापूर आणि पुण्यादरम्यानचे सहा थांबे कमी करण्यात आले आहेत. स्टेशनवरच्या शांत-शांत वातावरणातच मी कोयनेमध्ये माझ्या डब्याजवळ पोहचलो. त्या डब्याचे दोनच महिन्यांपूर्वी उत्कृष्ट डब्यामध्ये रुपांतर करण्यात आलेले होते; तरीही डबा फारसा सुस्थितीत वाटत नव्हता.

      नियोजित वेळी पुण्याच्या सेक्शन कंट्रोलरकडून गाडी सुरू करण्याची परवानगी मिळाल्यावर सकाळी ठीक 08:05 वाजता कोव्हीड-19 विशेष कोयनेने मुंबईच्या दिशेने कूच केले. नेहमी कोल्हापूरहूनच भरणारे डबे आज मोकळे-मोकळे होते. कारण लोकांचे गावाला जाणे आता कमी झालेले होते आणि प्रवासावरही अजून काही निर्बंध होते. माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या हिंदीभाषिक प्रवाशांचीही कोरोना, लॉकडाऊन आणि कमी गर्दी यावर चर्चा सुरू होती. सकाळचं कोवळं उन अंगावर घेत मी प्रवास अनुभवायला लागलो होतो. पावसाळा संपलेला असला तरी अधूनमधून जोरदार पाऊस पडतच होता. त्यामुळे बाहेर सगळीकडे हिरवळ, पाण्याचे छोटे-छोटे प्रवाह आणि वर स्वच्छ आकाश होते. त्यामुळे संपूर्ण प्रवास मस्तच होणार याबाबत माझ्या मनात शंका नव्हती. गाडी गुळ मार्केट, वळिवडे आणि त्यापुढे पंचगंगा नदी ओलांडून रुकडीत पोहचली. कोयनेचा हा थांबा आता रद्द करण्यात आलेला असला तरी ती इथे मुख्य मार्गावरच दोन मिनिटं थांबून पुढे निघाली. 08:35 ला हातकणंगल्यात गाडी आली आणि अगदी मोजकेच प्रवासी गाडीत चढले. आधीच्या आणि आताच्या परिस्थितीतील विरोधाभास पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसला. पुढे मिरजेच्या आधी 15 किलोमीटरवर लोहमार्गाच्या दुरुस्तीमुळे ताशी 30 किलोमीटरची वेगमर्यादा ठेवली गेली होती. तिथे कोयनेचा वेग त्यानुसार कमी करण्यात आला होता.

कोयना 09:11 ला मिरजेत दाखल झाली. इथेही गर्दी आत आलीच नाही. फळवाले, इडली-सांबार, वडापाववाले हेही कुठे फारसे नव्हते. बाकीचे फलाटही लोकांची वाट पाहत होते. सगळंच पूर्वीच्या मानानं सामसुम होतं. तिकडे लोको पायलट आणि गार्ड लॉबीत मात्र ड्युटीवर आलेल्या लोको पायलट्स आणि गार्डची ड्युटीवर रुजू होण्याची पूर्वतयारी झालेली होती. लॉबीतील ब्रेथ लायझर चाचण्या, उपस्थिती, इंजिनियरींग बुकमधल्या नोंदींची पडताळणी या सगळ्या बाबींची पूर्तता करून ते फलाटावर उभे होते. म्हैसुरूला जाण्याऱ्या एक्सप्रेसवर त्यांची ड्युटी होती आणि ती गाडी कोयना गेल्यावर मिरजेत दाखल होत होती.

मिरजेत 11 मिनिटं थांबून कोयना पुढच्या प्रवासाला निघाली. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक अतिशय मर्यादित, तर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती. याची प्रचिती कोयना फलाटाच्या पुढे गेल्यावर आली. प्रवासीगाड्यांचे फलाट सामसुम असले तरी TXR Lines वर बीसीएन वाघिण्यांच्या तीन मालगाड्या उभ्या होत्या. त्यातल्या दोन पुण्याच्या दिशेने जाणार होत्या. मात्र कोयनेला मार्ग मोकळा करून देण्यासाठी त्यांना तिथेच थांबवून ठेवण्यात आले होते. तिसरी गाडी कुर्डुवाडी किंवा बेळगावकडून आली होती आणि त्यामुळे पुढच्या प्रवासासाठी तिची दिशा बदलली जात होती. म्हणजेच तिची इंजिने काढून दुसऱ्या दिशेला लावली जात होती. त्याच्या पलीकडच्या लाईनवर बीसीएन वाघिण्यांच्या एका मालगाडीचे डब्ल्यूडीएम-2 या जुन्या इंजिनाच्या मदतीने मार्शलिंग सुरू होते.

सांगलीमध्ये 09:38 ला कोयना पोहचली, तेव्हा तिथे दोन गाड्या आमची वाट बघत उभ्या होत्या. एक होती कृष्णराजपुरमच्या डब्ल्यूडीपी-4डी इंजिनाबरोबर 06209 अजमेर जं.-म्हैसुरू जं. कोव्हीड-19 विशेष एक्सप्रेस आणि दुसरी होती डब्ल्यूडीजी-4डी इंजिन जोडलेली बॉक्सएन वाघिण्यांची मालगाडी. या दोन्ही गाड्या मिरजेकडे निघाल्या होत्या, पण कोयना सांगलीत येत होती म्हणून या दोघींनाही तिथेच रोखून ठेवण्यात आले होते. आता कोयना सांगलीत पोहचल्यावर त्या मालगाडीच्या आधी म्हैसुरू एक्सप्रेसला प्राधान्याने मिरजेच्या दिशेने सोडण्यात आले. सांगलीतही कोयनेत फारशी गर्दी झाली नाही. सांगलीनंतर 8 मिनिटांनी बिसूर ओढा कोयनेनं जरा सावधपणेच ओलांडला. कारण तिथे लोहमार्गाच्या दुरुस्तीमुळे ताशी 30 किलोमीटरची वेगमर्यादा ठेवलेली होती. पुढे नांद्य्रापर्यंत कोयना अशीच हळू धावत राहिली. कारण नांद्रे स्थानकाला लागूनच येरळा नदी आहे तिच्यावरचा पूल कोयनेला अगदी हळू, सावधपणे ओलांडायचा होता. कारण या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे तिथे तर वेगमर्यादा 10 किलोमीटरची होती. आठच दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात हा पूल खचला होता आणि पुणे-मिरज लोहमार्गावरची सहा दिवस बंद होती.

कोयना भिलवडीला आली, तेव्हा तिथे रिकामी डेमू आणि केशरी-पिवळसर रंगातील डब्ल्यूडीएम-3 डी इंजिनासोबत एक क्रेन गाडी (Departmental Train) तिची वाट बघत उभ्या होत्या. त्यापैकी डेमूला मिरजेकडे, तर क्रेनच्या गाडीला पुण्याकडे जायचे होते. भिलवडीतून सुटल्यावर सातच मिनिटांत किलोमीटर क्रमांक 243 वर कोयनेला आपला वेग पुन्हा कमी करावा लागला, कारण पुन्हा ताशी 30 किलोमीटरची वेगमर्यादा तिथे होती. खरं तर या वेळी कोयना किर्लोस्करवाडीत हवी होती, पण सततच्या वेगमर्यादांमुळे आज ती 17 मिनिटं उशिरा किर्लोस्करवाडीत पोहचली. तिथे गोंदिया जं.-कोल्हापूर महाराष्ट्र कोव्हिड-19 विशेष पुण्याच्या गोऱ्यापान डब्ल्यूडीपी-4डी कार्यअश्वांच्या जोडीबरोबर उभी होती.

माझ्या आधीच्या आणि आताच्या प्रवासांदरम्यानच्या कालावधीत मिरज ते ताकारीपर्यंतचे विद्युतीकरण पूर्ण झालेले दिसले. आता ताकारीपर्यंत दुहेरीकरणासाठी छोटे पूल आणि भराव टाकण्याचे काम सुरू होते. ताकारी आणि शेणोलीदरम्यान दुहेरी मार्ग त्याआधीच सुरू झालेला आहे. त्याचा परिणाम असा दिसला की, मगाशी 17 मिनिटं उशिराने धावत असलेली कोयना आता 6 मिनिटंच उशीरा धावत होती.

कराडमध्ये कोयनेला नियोजित कालावधीपेक्षा 13 मिनिटे जादा थांबावे लागले. कारण एक बीटीपीएन वाघिण्याची, पेट्रोल टँकरची मालगाडी दोन डब्ल्यूडीजी-4 इंजिनांसह शिरवड्याहून कराडकडे येत होती. ती कोयनेच्या शेजारून शेणोलीकडे वेगाने निघून जात असताना त्या गाडीला गार्डचा डबा जोडलेला नसल्याचे दिसले. म्हणजेच गार्ड कॅबऐवजी त्या गाडीच्या शेवटच्या वाघिणीवर आधुनिक संयंत्र बसवलेले होते, जे गार्डची भूमिका पार पाडत होते. त्यानंतर लगेचच कोयनेला कराडमधून निघण्यासाठी शिरवड्याच्या स्टेशन मास्टरकडून सांकेतिक परवानगी मिळाली. पुढे मसूरमध्ये OHE mast उभारण्याचे आणि फलाटाची लांबी वाढवण्याचे काम एकाचवेळी सुरू होते. त्या पुढच्या तारगाव स्थानकाच्या आधी रुळ बदलण्याचे काम सुरू असल्यामुळे कोयनेचा वेग पुन्हा ताशी 20 किलोमीटर इतका झाला.

12:24 ला साताऱ्यात पोहचलो, तेव्हा तिथे एक पूर्ण आणि एक अर्धी अशा रिकाम्या डीएमयू उभ्या होत्या. लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या सगळ्या गाड्या अजून सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचे रिकामे डबे अधल्यामधल्या स्थानकावर असे उभे करून ठेवण्यात आलेले होते. साताऱ्यात OHE mast उभारण्याचे काम युद्धपाळीवर सुरू होते. तसेच बीसीएन वाघिण्यांची एक मालगाडी यार्ड लाईनवर उभी होती.

आता माझा निम्म्यापेक्षा थोडा जास्त प्रवास पूर्ण झालेला होता. पण अजूनही गाडीत कोणीही फेरीवाला फिरकला नव्हता, अगदी चहा किंवा पाणीवालाही नाही. लॉकडाऊनचा हा आणखी एक परिणाम दिसला. साताऱ्याच्या पुढच्या स्थानकात, जरंडेश्वरमध्ये शिरत असताना कोयनेचा वेग पुन्हा कमी झाला आणि ती लूप लाईनवर जाऊ लागली. पुढून मालगाडी येत आहे बहुतेक, असा विचार मनात येत असताना मुख्य मार्गावर एक पुण्याचे डब्ल्यूडीपी-4डी आणि त्याच्यामागे एकच डबा जोडलेला लांबूनच दिसला. हे काय आहे म्हणून उत्सुकतेने पाहिलं, तर तो निरीक्षण यान होते. पुणे-मिरज लोहमार्गाची वेगमर्यादा वाढवण्यासंबंधीची चाचणी त्या एका डब्याच्या गाडीतून सुरू होती. कोयना जरंडेश्वर ओलांडून पुढे गेली आणि ती विशेष निरीक्षण गाडीही साताऱ्याकडे गेली.

कोयनेनं आदर्की ओलांडल्यावर पुढच्या प्रवासाला निघालेली  
कर्नाटक संपर्क क्रांती कोव्हीड-19 विशेष

आता वाठारनंतर यू-टर्न असलेला छोटा घाट जवळ आला होता. आदर्की स्थानकाच्या आधी, स्थानकात आणि त्याच्या पुढे अनेक तीव्र वळणे आहेत. ती झिग-झॅग वळणे पार करत आदर्कीला पोहचलो. तिथे कोयनेसाठी हजरत निझामुद्दीन-यशवंतपूर जं. कोव्हीड-19 विशेष कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्पेस रोखून ठेवलेली होती. काय तो तिचा निळाशार कार्यअश्व चमकत होता, व्वा! कोयना आदर्की ओलांडून बोगद्यात यू-टर्न घेऊन पुढे जात असताना संपर्क क्रांती पुढच्या प्रवासाला निघालेली दिसली.

आता 13:32 ला लोणंद आले आणि तिथे कोयनेत थोडीशी गर्दी चढली. त्यानंतर दहाच मिनिटांत निरा नदी ओलांडून कोयनेनं पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. निऱ्याला दोन मिनिटांचा थांबा घेऊन माझ्या प्रवासातील शेवटच्या अधिकृत थांब्याच्या दिशेने (जेजुरी) कोयना वेगाने निघाली. दरम्यान, निऱ्याच्या पुढच्या दौंडजमध्ये डब्ल्यूडीएम-3 डी इंजिनांची साताऱ्याकडे निघालेली जोडी पुढे जाण्याची परवानगी मिळण्याची वाट बघत लूप लाईनवर उभी होती. त्यातल्या लोको पायलट आणि आमच्या लोको पायलटने एकमेकांना हिरवे बावटे दाखवले. त्याचवेळी स्टेशन मास्टरने हिरवा बावटा दाखवून कोयनेला पुढे नेण्याची परवानगी दिली. तिकडे पलीकडे पॉईट्समनही हिरवा बावटा घेऊन उभा होताच.

जेजुरीत अप कोयनेची डाऊन कोयनेशी भेट झाली.
पलीकडे उभी असलेली नव्या मोकळ्या डब्यांची गाडी.    

दुपारी ठीक सव्वादोन वाजता कोयना जेजुरीत आली होती. तिथे कोल्हापूरकडे जाणारी कोयना पुण्याच्या डब्ल्यूडीपी-4 डी कार्यअश्वाबरोबर आधी येऊन आमची वाट बघत थांबली होती. तिच्या पलीकडे नव्याकोऱ्या रिकाम्या एलएचबी डब्यांची गाडी उभी करून ठेवलेली होती. पुढे शिंदवण्याचा घाट उतरून आळंदीत आलो. त्यावेळी मिरजेच्या दिशेने जाणारी मालगाडी दोन डल्ब्यूडीजी-4 इंजिनांसह लूप लाईनवर कोयनेनं मार्ग मोकळा करून देण्याची वाट पाहत उभी होती. त्यानंतर फुरसुंगी, सासवड रोड, घोरपडी स्थानकांना ओलांडत कोयना दुपारी 15:22 वाजता म्हणजे नियोजित वेळेच्या 18 मिनिटं आधीच पुण्यात पोहचत होती. 

02221 पुणे-हावडा एसी विशेष एक्सप्रेसचे पुण्याहून प्रस्थान 
नियोजित फलाटाकडे जात असताना शेजारून संतरागाछीच्या डब्ल्यूएपी-7 कार्यअश्वाबरोबर पुणे-हावडा वातानुकुलित कोव्हीड-19 विशेष गेली आणि त्यानंतर लॉकडाऊनोत्तर काळातील माझा पहिला प्रवास अनेक बदल अनुभवत पूर्ण झाला. नेहमी कोयनेतून पुण्यात उतरल्यावर दिसणारी गर्दी यावेळी मात्र नव्हती.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा