सुखोई-30 एमकेआयचा प्रातिनिधिक फोटो. (स्रोत-सैनिक समाचार) |
8 ऑक्टोबर 1998. हवाईदल दिनाच्या निमित्ताने
पुण्याच्या लोहगाव हवाईदल स्थानकाला (Air Force Station) मी पहिली भेट दिली तो दिवस. त्याआधी दोन-तीन
वर्ष असं होत होतं की, लोहगाव विमानतळावर सामान्य नागरिकांना विमानं पाहण्यासाठी
खुली असल्याची बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये यायची. त्यामुळे लोहगाव
विमानतळावर विमाने पाहण्याची इच्छा असूनही संधी मिळत नव्हती. 1997 मध्येही असेच
झाल्यावर मात्र निश्चय केला की, पुढच्या वर्षी हवाईदल दिनाला या विमानतळावर जाऊन
प्रत्यक्षात विमाने पाहायचीच.
हवाईदलात असलेले आमचे एक नातेवाईक त्यावेळी
बदली होऊन लोहगाव हवाईदल स्थानकावर रुजू झाले होते. हवाईदलात ते अधिकारी होते. त्यांच्यामुळे
1998 च्या हवाईदल दिनाला या विमानतळावर जाऊन लढाऊ विमाने पाहण्याची संधी सुकर झाली.
त्या दिवशी पुण्याला मी खास तेवढ्यासाठीच गेलो होतो. कोणत्याही विमानतळावर
जाण्याची माझी पहिलीच वेळ असल्यामुळे खूपच रोमांचित झालो होतो. सकाळी लवकरच मी
त्या नातेवाईकांच्या घरी पोहचलो आणि त्यांच्याबरोबरच विमानतळावर गेलो. सगळीकडे
कडेकोट सुरक्षा होतीच.
प्रत्यक्ष विमानतळावर पोहचल्यावर धावपट्टीपासून काही शे मीटर अंतरावर
आम्ही उभे होतो, तेव्हा काही मिनिटांतच समोरून एका मिग-29 बीने अतिशय जबरदस्त गडगडाटी,
गगनभेदी आवाजात उड्डाण केले. तेव्हा मला मिग-29 चे पहिल्यांदाच प्रत्यक्ष दर्शन
होत होते आणि त्यामुळे खूप रोमांचितही झालो होतो. त्याला कारणही तसेच होते. मी
शाळेत असताना 1987 मध्ये लोहगावच्या हवाईदल स्थानकावरच मिग-29 या हवाई प्राबल्य
प्रस्थापित करणाऱ्या (Air Superiority) लढाऊ विमानांची पहिली तुकडी भारतीय हवाईदलात सामील झाली होती. त्या
समारंभासंबंधीचे फोटो मी वर्तमानपत्रात पाहिले होते आणि तेव्हापासूनच हे विमान मला
आवडू लागले होते. या विमानानेच माझ्यात विमानांविषयी आवड निर्माण केली होती.
मिग-29 च्यापाठोपाठ हवाईदलात साधारणत: वर्षभरापूर्वी सामील झालेले सुखोई-30 के बहुउद्देशीय लढाऊ विमानही तशीच
जबरदस्त गर्जना करत हवेत झेपावले. सुखोई-30 केची पहिली तुकडीही साधारण
वर्षभरापूर्वीच येथेच भारतीय हवाईदलात सामील करण्यात आली होती. या दोन्ही
विमानांची प्रत्यक्षात उड्डाणे पाहण्याचा अनुभव काही औरच होता. पण त्याचवेळी दोन्ही
विमानांच्या इंजिनांच्या आवाजातील फरक लक्षात आला.
तिकडे पार्कींग बेवर 5-6 मिग-29 बी ओळीने
उभी करून ठेवण्यात आली होती. हवाईदल दिनाच्या निमित्ताने दरवर्षी हवाईदलातील
कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी विमाने पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जात होती. त्यांना
पाहण्यासाठीच ही विमानेही तेथे उभी करण्यात आली होती. काही वेळाने आम्हीही ती
विमाने पाहण्यासाठी तिकडे गेलो. तेथे थोडा वेळ थांबून मी घरी
परतलो.
पुढे 2003 मध्ये पुन्हा एकदा लोहगाव हवाईदल स्थानकावर जाऊन लढाऊ विमाने
अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. यावेळी विमाने पाहण्याची संधी सर्वसामान्य
नागरिकांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली होती. कधी नव्हे ते हवाईदल दिनाच्या आधी
वृत्तपत्रात त्यासंबंधीची बातमीही प्रकाशित झालेली होती. मग काय, गर्दी होणारच की! मीही लवकरच लोहगाव विमानतळ गाठले. प्रदर्शनाच्या
ठिकाणी जात असताना समोर नजर पडली ती हवाईदलातून निवृत्त झालेल्या आणि आता जतन करून
ठेवण्यात आलेल्या मिग-21 विमानावर. पुढे थोड्या अंतरावर सुरक्षाविषयक तपासण्या पूर्ण करून प्रवेशद्वारातून
आत गेल्यावर तिथूनच सामान्य लोकांना पाहण्यासाठी मांडलेली हवाईदलाची वेगवेगळी आयुधे दृष्टीस पडू लागली. त्या सगळ्या शस्त्रास्त्रांच्या भोवतीने दर्शकांनी कधीच गराडा घातला
होता. त्यातल्या त्यात सुखोई-30 एमकेआय या दीर्घ पल्ल्याच्या बहुउद्देशीय हवाई प्राबल्य
स्थापित करणाऱ्या लढाऊ विमानाच्या भोवतीने तो गराडा जास्तच दिसत होता.
मीही पटकन प्रदर्शनासाठी मांडलेल्या त्या आयुधांच्या दिशेने गेलो. समोर सुखोई-30 एमकेआय त्याच्यावर बसवण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांसह दर्शकांसमोर सादर करण्यात आले
होते. त्याबरोबरच आकाश क्षेपणास्त्रे, मिग-29 बी आणि त्याची शस्त्रास्त्रेही मांडलेली
होती. या सगळ्या विमाने आणि शस्त्रास्त्रांच्या भोवतीने Walk Around ची सोयही होती. दोन्ही विमानांच्या
समोर ठेवण्यात आलेल्या माहितीफलकावरील विमानांविषयीची माहिती वाचून झाल्यावर मीही Walk
Around घेतला सुखोई
आणि मिग-29 च्या भोवतीने. कोणतेही विमान इतक्या जवळून पाहण्याला मिळण्याची ती आयुष्यातली
पहिलीच वेळ होती. कोणत्याही बाजूने पाहताना ही दोन्ही विमाने मस्त, सुंदर आणि
भारदस्तच वाटत होती. विमानांना पाहत असलेल्या गर्दीतील अनेकांच्या मनात
विमानांविषयी काही प्रश्न उपस्थित होत होते. त्यांची उत्तरं ते त्या विमानांजवळ असलेल्या
वायुसैनिकांकडून मिळवत होते. त्यावेळी सुखोई-30 एमकेआयला भारतीय हवाईदलात सामील
होऊन जेमतेम वर्षभरच झाले होते. या 4+ पिढीतील बहुउद्देशीय विमानांची पहिली तुकडी
(Squadron) याच ठिकाणी
भारतीय हवाईदलात सामील झालेली होती. त्यावेळी या विमानांच्या सामिलीकरणाच्या
बातम्या आणि लेख मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यामुळे या
विमानांविषयी सामान्य लोकांच्या मनात अतिशय उत्सुकता निर्माण झाली होती, आणि ती
किती होती हे तिथे पाहायला मिळत होते.
सुखोई-30 एमकेआय (फोटो-पीआयबी) |
प्रदर्शनात मांडण्यात आलेली विमाने पाहायला आलेल्यांना ध्वनीक्षेपकावरून सूचना केल्या जात होत्या. त्याचवेळी असेही आवाहन केले जात होते की, जर तुम्हाला सुखोईचे उड्डाण प्रत्यक्षात अनुभवायचे असेल, तर आणखी थोडा वेळ इथेच जरूर थांबा. त्यानंतर साधारणत: अर्ध्यातासाने एक सुखोई-30 एमकेआय धावपट्टीच्या एका बाजूने वेगाने आले आणि कर्णपटल फाटतात की काय असे वाटावे इतका प्रचंड गडगडाटी आवाज करत आमच्या समोरून आकाशात झेपावले. काय तो इंजिनांचा आवाज, काय ते उड्डाण, व्वा! असं मनातल्या मनात म्हणतोय तोच आणखी एका सुखोईने उड्डाण केले आणि ते जवळजवळ सरळ रेषेत आकाशात झेपावले. ही उड्डाणे पाहून इथे आलेले सर्वच जण मंत्रमुग्ध आणि रोमांचित झाले होते. पुन्हा ते या उड्डाणांविषयी प्रश्नही तेथील वायुसैनिकांना विचारू लागले होते. त्यानंतर मी परत प्रदर्शनात मांडलेली विमाने न्याहाळू लागलो.
प्रदर्शनाच्या ठिकाणची माझी खरेदी |
पुढे 2005 मध्येही लढाऊ विमाने पाहण्याचा तसाच अनुभव पुन्हा एकदा लोहगावला जाऊन घेतला. त्यावेळी सागर गंगाधरे हा माझा शाळेतला मित्र माझ्याबरोबर होता. हवाईदल स्थानकाला भेट देण्याची आणि लढाऊ विमाने पाहण्याची माझी ही तिसरी तर त्याची पहिली वेळ होती. पण प्रत्येकवेळी लढाऊ विमाने पाहण्याची मला मिळालेली संधी पहिलीच भासत राहिली. कारण ही विमाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कितीही वेळा पाहिली तरी मनाचे समाधान होत नाही. अशा ठिकाणी पुन्हापुन्हा यायला मिळावं असं वाटत राहतं. माझा मित्रही ही विमाने पाहून त्यावेळी प्रफुल्लित झाला होता. 2005 नंतर मात्र लोहगाव विमानतळावर सामान्य नागरिकांना लढाऊ विमाने पाहण्यासाठी खुली ठेवणे बंद झाले. या वर्षी नव्वदीत पदार्पण करत असलेल्या भारतीय हवाईदलाच्या स्थापना दिनाचे संचलन पाहत असताना या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
धन्यवाद
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवा