अफगाणिस्तानातून सुरक्षित सुटका

भारतीय हवाईदलाचे ‘सी-17 ग्लोबमास्टर-3’ (सर्व फोटो-पीआयबी)

    तालिबान आणि अमेरिका यांच्यातील सत्ता हस्तांतरासंबंधीच्या करारानुसार अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नोटोचे सैन्य 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मायदेशी परतले. सैन्यमाघारी आणि सत्ता हस्तांतराची ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अफगाणिस्तानात अतिशय अनिश्चित आणि अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली. अनेक देशांनी अफगाणिस्तानातील आपापले राजदुतावास बंद केले आणि आपापल्या नागरिकांबरोबरच अमेरिका आणि मित्रदेशांच्या सैन्याला मदत करणारे खबरे यांनाही सुरक्षितपणे अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यास त्या देशांनी सुरुवात केली. त्याचवेळी तालिबानी सत्तेच्या भीतीने सामान्य अफगाणी नागरिकही तेथून बाहेर पडण्यासाठी काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. त्यातच अमेरिका आणि अन्य देशांचे अफगाणिस्तानातील सैन्य कोणत्याही परिस्थितीत 31 ऑगस्टच्या आत माघारी जाणे गरजेचे असल्यामुळे तीही गडबड विमानतळावर सुरू होती. या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वच देशांचे अहोरात्र प्रयत्न सुरू होते. परिणामी विमानतळाच्या संचलनावर अतिशय ताण येत होता. या परिस्थितीत अफगाणिस्तानातून आपल्या सर्व नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठीची मोहीम भारतीय हवाईदलाने पूर्ण केली. या कामगिरीतून भारतीय हवाईदलाने आपली सामरिक पोच पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

   15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबाननं काबूल काबीज केलं होतं. त्यानंतर तातडीने अफगाणिस्तानातून भारतीयांची सुखरुप सुटका करण्यासाठी 16 ऑगस्टपासून ऑपरेशन देवी शक्ती राबवण्यास सुरुवात झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे ही मोहीम आखली होती.

   भारतीय हवाईदलाचे ‘सी-130 जे सुपर हर्क्युलिस’  
    भारतीय हवाईदलाने या मोहिमेत आपल्या सी-17 ग्लोबमास्टर-3 आणि सी-130 जे सुपर हर्क्युलिसया व्यूहात्मक वाहतूक करणाऱ्या विमानांचा वापर केला. त्या विमानांनी काबूल आणि ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथील विमानतळांवरून उड्डाणं घेत 260 भारतीय आणि अन्य देशांचे 290 अशा 550 नागरिकांची संकटग्रस्त देशातून सुटका केली. 

   ‘सी-17’मधून संकटग्रस्त भागातील भारतीयांची सुटका

    या मोहिमेच्या काळात हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती हाताबाहेर गेलीच, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारतीय हवाईदलातील विशेष प्रशिक्षित गरुड कमांडो आणि भारत-तिबेट सीमा पोलिसही तेथे तैनात करण्यात आले होते.

  संकटग्रस्त प्रदेशातून आपल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्याची मोहीम भारतीय हवाईदलाने यापूर्वी 2015 आणि 2016 मध्ये अनुक्रमे येमेनमध्ये (ऑपरेशन राहत) आणि दक्षिण सुदानमध्ये (ऑपरेशन संकट मोचन) राबवली होती. येमेनमधून आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन राहतभारताने सुरू केले असले तरी अमेरिका आणि कॅनडासह 23 देशांच्या विनंतीवरून त्यांच्या नागरिकांचीही या मोहिमेद्वारे सुटका करण्यात आली होती. या मोहिमेत भारतीय हवाईदलानेही सक्रीय सहभाग घेतला होता. त्याआधी 1990 मध्ये पहिल्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने कुवेतमधून 1 लाख 70 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मायदेशी परत आणले होते. परदेशातून आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी कोणत्याही देशाकडून राबवली गेलेली ती जगातील आजपर्यंतची सर्वात मोठी मानवीय बचाव मोहीम ठरली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या नियोजनाखाली राबवल्या गेलेल्या त्या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचाही सहभाग होता.

                    भारतीय हवाईदलाचे ‘एएन-32’              
 ‘लाल सेनेच्या माघारीनंतर 1992 मध्ये अफगाणिस्तानातील राजकीय परिस्थिती अतिशय बिघडली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाईदलाने आपत्कालीन मोहीम राबवून एएन-32 विमानातून काबूलमधील भारतीय राजदूत आणि त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुरक्षित सुटका केली होती.

   हवामान बदलामुळे पूर, चक्रिवादळं, हिमस्खलन, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा जगातील सर्व देशांना वारंवार फटका बसू लागला आहे. अशा आपत्तीच्या काळात भारत परदेशांना तातडीने मदत पोहचवत आहे. परदेशातील संकटग्रस्त प्रदेशातून आपल्या नागरिकांच्या सुटकेबरोबरच अशा प्रकारच्या मदतीचा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपयोग होत आहे. म्हणूनच देशाबाहेर येणाऱ्या आपत्तींच्या काळात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय एकमेकांशी समन्वय राखत योजना आखत असतात.

परदेशी भूमीवर आलेली संकटे नैसर्गिक आणि मानवी अशा दोन्ही प्रकारची असू शकतात. यापैकी कोणत्याही संकटाच्यावेळी एखाद्या देशात तातडीने मदत पोहचवणे, त्या प्रदेशातून आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका करणे यांसारख्या बाबी प्रत्येक देशासाठी आपल्या हितसंबंधांचे प्रभावक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असतात. भारताने डिसेंबर 2004मध्ये आलेल्या त्सुनामीच्या काळात इंडोनेशिया, श्रीलंका, मालदिवज् या देशांना तातडीने मदत पोहचवली होती. त्सुनामीमध्ये अंदमान व निकोबार द्वीपसमूहामधील कार निकोबारचे हवाईदल स्थानक (Air Force Station) पूर्णपणे नष्ट होऊनही तेथून हवाईदलाची विमाने मदतसाहित्य घेऊन शेजारच्या देशांमध्ये पोहचली होती. त्याच वर्षी अमेरिकेत आलेल्या कॅटरिना चक्रिवादळानंतर भारतीय हवाईदलाच्या विमानातून वादळग्रस्त भागात मदत पोहचवण्यात आली होती. मदतसाहित्य घेऊन अमेरिकेत पोहचलेलं ते पहिलं परदेशी विमान ठरलं होतं. चक्रिवादळग्रस्त फिजीला फेब्रुवारी 2016 मध्ये मदत साहित्याने भरलेले हवाईदलाचे विमान भारताने धाडले होते. देशाची मृदू सत्ता (Soft Power) म्हणूनही ओळख निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे मदतकार्य उपयुक्त ठरत असते.

   भारतीय हवाईदलातील सी-17 ग्लोबमास्टर-3, सी-130 जे सुपर हर्क्युलिस तसेच आयएल-76, एएन-32 यांसारख्या विमानांमुळे अशा मदत आणि बचाव मोहिमा प्रभावीपणे राबवता येत आहेत. गेल्या 15-20 वर्षांमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्यावेळी मदत आणि बचाव मोहीम राबवण्याचा मोठा अनुभव भारताला आहे. भारतीय लष्करीदले आज हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि त्याही पलीकडच्या प्रदेशांमध्ये आवश्यकतेनुसार कमीतकमी वेळेत पोहचून मदत आणि बचाव मोहीम प्रभावीपणे राबवत आहेत. त्यातून ती भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीला हातभार लावत आहेत.





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा