लोणावळा ते पुणे


       व्हिस्टा डोमच्या दख्खनच्या राणीतून लोणावळ्यापर्यंत प्रवास केल्यावर आता वेळ होती, परतीला 01007 दख्खन विशेष एक्सप्रेसमधून पुण्याला परतण्याची. त्यासाठी मी लोणावळ्याच्या फलाट एकवर येऊन बसलो होतो. लोणावळ्यात हलका पाऊस सुरू होताच, शिवाय स्थानकातून आजूबाजूला दिसणारे हिरवेगार डोंगर ढगांमध्ये अर्धे लपलेले दिसत होते.

      सध्या आरक्षणाशिवाय कोणालाही रेल्वे प्रवासाची परवानगी नसल्यामुळे लोणावळ्याच्या तीनही फलाटांवर थोडीशीच वर्दळ दिसत होती. एरवी ’15 ऑगस्ट म्हटल्यावर या फलाटांवर किती गर्दी दिसली असती. वर्दळ नसल्यामुळे स्थानकावरचे स्टॉलही साडेआठ वाजताही बंदच होते. पलीकडे तिसऱ्या फलाटावर उभी असलेली लोणावळा-पुणे लोकलही आता गेलेली होती. मी या फलाटावर येऊन बसल्यावर 07221 काकीनाडा पोर्टहून लोकमान्य टिळक (ट)कडे कल्याणच्या दोन शक्ती (डब्ल्यूडीजी-3ए) कार्यअश्वांसह निघालेली विशेष एक्सप्रेस फलाट क्रमांक दोनवर थोडीशी विसावून पुढे निघून गेली. 

ती गाडी येण्याआधी पाचच मिनिटं दुसऱ्या फलाटाच्या मुंबईच्या बाजूला ध्वजवंदनाचा समारंभ पार पडला होता. 15 ऑगस्ट होता ना. रेल्वे पोलिस आणि लोणावळा स्थानकातील प्रमुख अधिकारी-कर्मचारी त्यावेळी उपस्थित होते. असेच ध्वजवंदन पहिल्या फलाटाला लागून असलेल्या घाट लोको पायलट लॉबी आणि त्या शेजारच्या सेक्शन इंजिनियरच्या कार्यालयातही पार पडले होते.

      यादरम्यान अप डिस्पॅच लाईनवर उभ्या असलेल्या बीसीएन वाघिण्यांची मालगाडीची सर्व प्रकारची तपासणी पूर्ण झाल्यावर ती गाडी डब्ल्यूडीजी-4 आणि डब्ल्यूडीजी-4डी या तिच्या कार्यअश्वांबरोबरच कल्याणच्या तीन डब्ल्यूएजी-7 (त्रिकुट) अशा एकूण पाच कार्यअश्वांसह तिसऱ्या फलाटाच्या पलीकडच्या मार्गावरून कर्जतच्या दिशेने निघाली होती. हे तिघे डब्ल्यूएजी-7 अश्व बँकर लोको होते आणि खाली कर्जतला त्यांची रवानगी या मालगाडीबरोबरच केली जात होती. तिच्याआधी गेलेली 07221 तिसऱ्या मार्गावरून घाट उतरत होतीच आणि तिच्या मागोमाग ही मालगाडी निघाली होती.

      9:15 वाजता लोकमान्य टिळक (ट)कडून विशाखापट्टणमकडे जाणारी विशेष एक्सप्रेस फलाट क्रमांक 1वर लवकरच येत असल्याची उद्घोषणा होऊ लागली. माझ्या बाकड्याच्या शेजारी असलेल्या स्टॉलगाडीचा ज्येष्ठ मालकही आता आला होता आणि लगबगीने आपला स्टॉल सुरू करत होता. पाचच मिनिटांत त्याची गाडी विशाखापट्टणच्या प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झालीही. तरीही आज फलाटावर विक्रेत्यांची फारशी संख्या दिसत नव्हती. काही मिनिटांतच 08520 कल्याणच्या गौरवबरोबर म्हणजेच डब्ल्यूडीपी-4डी या कार्यअश्वाबरोबर फलाट क्रमांक एकवर आली. 21 डब्यांसह बोर घाटातील तीव्र चढ सहज चढण्यासाठी गौरवच्या मदतीला मागे कल्याणचे तीन डब्ल्यूएजी-7 बँकर कार्यअश्व (त्रिकुट) होतेच. पुढच्या दोनच मिनिटांत ते त्रिकुट गाडीपासून वेगळे करून झाले आणि लगेचच 08520 पुण्याकडे निघून गेली.

      08520 गेल्यावर तिचे बँकर लोको त्यांच्या घरी म्हणजेच इलेक्ट्रीक लोको ट्रीप शेडमध्ये विसावण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी दुसऱ्या फलाटावर पुण्याहून आलेली विशेष लोकल येऊन थांबली. 

पहिल्या आणि दुसऱ्या फलाटाच्या मधल्या लाईनवर बराचवेळ आपल्या सारथ्यांची वाट बघत कल्याणच्या डब्ल्यूएजी-7 बँकरची जोडी उभी होती. अखेर 08520च्या बँकर त्रिकुटातून त्यांचे सारथी लोणावळ्यात आले होते. हे त्रिकुट त्या जोडीच्या शेजारी जाऊन शंटिंग सिग्नल मिळण्याची वाट बघत होते, तेव्हाच त्या जोडीचे सारथी यातून तिकडे जाताना दिसले. पुढच्या 3-4 मिनिटांतच लाईन क्लिअर देऊन मधल्या लाईनवरून त्या जोडीला कर्जतकडे धाडून देण्यात आले. कारण इकडे लोणावळ्यात आज बँकरच्या बऱ्याच जोड्या आणि त्रिकुटं दिसत होती. त्यामुळे खाली कर्जतमधला बँकर्सचा समतोल बिघडू नये यासाठी आता लोणावळ्यात झालेले अतिरिक्त बँकर खाली पाठवण्यास सुरुवात झाली होती.

      लोणावळ्यात हलका पाऊस असला तरी घाटात त्याचा जोर जरा जास्तच होता. म्हणूनच आमची 01007 कल्याणच्या डब्ल्यूएपी-7 या कार्यअश्वासह जरा उशिरा, म्हणजे 22 मिनिटं उशिरा लोणावळ्यात आली होती. एरवी पांढराशुभ्र दिसणारा हा अश्व चिखल्या उडाल्यानं मळलेला होता. ही गाडी दीड महिन्यापूर्वीपासूनच व्हिस्टा डोमसोबत धावू लागली होती. माझा डबा परत त्या व्हिस्टा डोमच्या जवळच होता. गाडी फलाटावर थांबल्याबरोबर गाडीतून उतरणाऱ्यांची गर्दी जास्त होती. त्या गर्दीने गाडीत चढणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होत होता. पण तरीही त्यातून वाट काढत काही फेरीवाले मात्र सरकन गाडीत चढले. मी माझ्या आसनाजवळ पोहचलो, तेव्हा एक तरुण माझ्या आसनावर बसलेला होता. तोही लोणावळ्यालाच डब्यात चढला होता. मी त्याला - हा माझा आसनक्रमांक आहे - सांगितल्यावर तो बाजूला झाला, पण एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला एक तरुणी यामुळे त्याला मध्ये खूपच अडचण वाटत होती. त्यामुळे त्याने दुसऱ्या डब्यातील त्याच्या मित्राला फोनवरून विचारले – अरे आहे का रे जागा तिकडे? त्याच्याकडून सकारात्मक उत्तर येताच तो तिकडे गेला.

दरम्यान, कर्जतला गाडीला जोडलेल्या बँकर जोडीला गाडीपासून वेगळे करून झाले होते. तसे संकेत मला डब्यात जाणवले. त्यानंतर मुंबई आणि पुण्याच्या सेक्शन कंट्रोलर्सच्या संमतीने गाडी पुढे सोडण्यासाठी निर्देश मिळताच लोणावळ्याच्या स्टेशन मास्टरने 01007 साठीचा स्टार्टर सिग्नल हिरवा केला. त्याचे संकेत मागे गार्डलाही मिळाले आणि त्यानेही हिरवा बावटा दाखवल्यावर ठीक 10:05 ला दख्खन पुण्याच्या दिशेने निघाली. 

हे सर्व तांत्रिक सोपस्कार तीन मिनिटांत आवरले गेले होते. लोणावळ्याच्या बाहेरच 07032 हैदराबाद दख्खन छत्रपती शिवाजी महाराज (ट) विशेष एक्सप्रेस लोणावळ्याला पोहचत होती. दख्खनच्या राणीला अजून जुनेच डबे आहेत, पण दख्खन आता अत्याधुनिक एलएचबी डब्यांबरोबर धावत आहे. तरीही या अत्याधुनिक डब्यात गाडी वेग घेत असताना जर्क्स बसत होते आणि अंतर्गत रचना जरा congested वाटत होती. पुढच्या पाचच मिनिटांत बीसीएन वाघिण्यांची एक मालगाडी गडद पिवळ्या-निळ्या रंगातील दोन डब्ल्यूडीजी-4 कार्यअश्वांसह धडाडत लोणावळ्याकडे गेली.

लोणावळ्यानंतर तळेगावपर्यंत कोणताही थांबा नसल्यामुळं दख्खननं आता चांगलाच वेग घेतला होता. बाहेरचे तेच पावसाळी वातावरण अनुभवत आणि नेहमीच्या सवयीप्रमाणं रेल्वेच्या कामकाजाकडं लक्ष देत माझा प्रवास सुरू होता. लोणावळ्यात गर्दी बऱ्यापैकी उतरली आणि चढली होती. डब्यात आता जी तरुणाई होती, त्यापैकी काहींचे डोळे अजूनही हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनवरच होते. मुंबईहून निघाल्यापासून त्यांनी बघायला सुरू केलेले सिनेमे कदाचित संपत आलेले असावेत आता. बाकी डब्यात फारशा गप्पाही सुरू नव्हत्या. अधूनमधून पाणी बाटलीवाले फेऱ्या मारत होते.

दख्खननं 10:25 ते 10:27 असा तळेगावात थांबा घेतला. डब्यातली गर्दी इथे आणखी कमी झाली, पण त्याचबरोबर काही जण गाडीत चढलेही. सध्या पुणे-लोणावळा मार्गावरच्या स्थानिक गाड्या (लोकल) सामान्य लोकांसाठी अजून बंद असल्यामुळे अशा एक्सप्रेस गाड्यांमधून थोड्या अंतरासाठीही प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. माझ्या एवढाच जण डब्यात माझ्या पलीकडच्या खिडकीजवळ बसायला गेला. तिथे एक तरुणी आधीपासूनच बसली आहे बघून तो गोंधळला आणि दुसरीकडे आपली आसनक्रमांक शोधायला गेला. दरम्यान, गाडी तळेगावातून निघाली होतीच. तेवढ्यात तिकीट तपासनीस आला आणि त्याने त्याच्या क्रमांकांचा पुकारा केला. पण तो तिथे न दिसल्यामुळे तो पुढे निघाला होताच, तोच तो प्रवासी जवळ आला आणि त्या तरुणीने खिडकीपासून बाजूला होत त्याला त्याची जागा मोकळी करून दिली. मग त्यानंही तळेगावातल्या त्याच्या परिचितांना फोन लावून गाडी सुटली आहे असा निरोप दिला. मग समोरून प्रश्न आले होतेच – जागा मिळाली का? गर्दी आहे का? त्याच्या प्रतिक्रियेवरूनच हे प्रश्न विचारले गेले असल्याचं लक्षात आलं.

दख्खननं आता पुन्हा वेग घेतला होता. पण पुढे बारा मिनिटांतच तिचा वेग कमी झाला आणि आणखी दोनच मिनिटांत गाडी चिंचवडच्या बाहेर थांबली. कारण चिंचवडच्या होम सिग्नलच्या पुढेच रुळ बदलण्याचे काम सुरू होते. त्यामुळे चिंचवड स्थानकाच्या अलीकडे वेग कमी करण्याची लोको पायलटला सूचना देण्यासाठी ताशी 45 किलोमीटर वेगमर्यादेचा फलक लावण्यात आला होता.  चिंचवडच्या बाहेर डब्ल्यूएपी-4 कार्यअश्वाच्या साथीनं लोकमान्य टिळक (ट)कडे निघालेली 01014 विशेष एक्सप्रेस अप लाईनवरून क्रॉस झाली. दरम्यान, रुळ बदलीचे काम तात्पुरते थांबवून दख्खनला हळुहळू चिंचवडमध्ये प्रवेश देऊन पुढं जाऊ देण्यात आलं. चिंचवडच्या कंटेनर डेपोमध्ये आलेल्या एनएमजी डब्यांच्या गाडीचं कल्याणच्या डब्ल्यूएजी-9 या अश्वासह मार्शलिंग सुरू होतं. पिंपरी-चिंचवड परिसरातील कारखान्यांमध्ये बनवण्यात आलेल्या नव्या मोटारगाड्या घेऊन देशभरात पोहचवण्यासाठी त्या गाडीला सज्ज केलं जात होतं.

चिंचवडनंतर दख्खननं पुन्हा वेग घेतला. पुढचा थांबा आता जवळ येतच होता. 10:51 ला दख्खन खडकीला दोन मिनिटं थांबून पुढं निघाली. इथं फारसे प्रवासी उतरले नाहीत. खडकीत पुण्याकडे जाणारी बीसीएन वाघिण्यांची मालगाडी 2 डब्ल्यूडीजी-4डी कार्यअश्वांसह मेन डाऊन लाईनवर रोखून धरण्यात आली होती. दख्खनला पुढे जाऊ देण्यासाठी तसं करण्यात आलं होतं. खडकीतून गाडी हलताच शिवाजीनगरला उतरणाऱ्यांची आपापलं सामान सावरून, बरोबरच्या माणसांसह दाराजवळ जाऊन उभारण्यासाठी गडबड सुरू झाली. पण त्यातच पुण्याला उतरणाऱ्यांची आता फ्रेश होण्यासाठी घाई सुरू झाली होती, उतरणाऱ्यांना - बाजूला व्हा म्हणत!

संथगतीनं दख्खन आता शिवाजीनगरमध्ये शिरत होती. 10:59 ला दख्खन तिथं थांबली आणि भरपूर प्रवासी तिथं उतरले. त्यांच्यामध्ये मीही होतो. मी जिन्यावर चढत असताना दख्खनच्या कार्यअश्वाने जोरात हॉर्न वाजवून पुण्याकडे प्रस्थान केले.

आणि अशा प्रकारे माझा हा छोटासा प्रवास संपन्न झाला.

टिप्पण्या