सेंट पीटर्सबर्गच्या तळावर प्रवेश करणारी 'भा. नौ. पो. तबर'. (फोटो-पीआयबी) |
भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला. नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यातील विशेष द्वीपक्षीय सामरिक संबंधांना ‘तबर’ची ही भेट आणखी मजबूत करून गेली.
25 जुलै हा रशियन नौदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1696 मध्ये रशियन नौदलाची सेंट पीटर्सबर्ग येथे स्थापना झाली होती. त्या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी सेंट पीटर्सबर्ग येथे रशियन नौदल दिनाचा संचलन सोहळा आयोजित केले जातो. यंदा रशियन नौदलाचा 325 वा वर्धापन दिन असल्यामुळे हा सोहळा विशेष होता. अशा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या समारंभामध्ये भारतीय नौदलाने रशियाकडून विकत घेतलेल्या युद्धनौकेसह सहभागी होणे दोन्ही देशांमधील संबंध आणि विश्वास अधोरेखित करणारे होते.
‘तबर’चीरशियन फेडरेशनच्या राष्ट्रपतींना मानवंदना . (फोटो-पीआयबी) |
खुल्या समुद्रातील निरीक्षण आटपून नीवा नदीच्या किनाऱ्यावर या समारंभाच्या मुख्य आयोजनस्थळी पुतीन यांचे आगमन झाले. तेथे पुतीन यांनी संचलनाला संबोधित केले आणि नंतर तेथील संचलनाचे निरीक्षण केले. त्यात रशियन नौदलाची विमाने, हेलिकॉप्टर्सनी फ्लाय पास्ट केला. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात फिनलंडच्या खाडीत उभ्या असलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांनी राष्ट्रपतींच्या समोरून जात मुख्य संचलनातही भाग घेतला. या संचलनात भारताबरोबरच इराण आणि पाकिस्तानच्या युद्धनौकाही सहभागी झाल्या होत्या. या संपूर्ण सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या कक्षात भारताचे नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह हेसुद्धा उपस्थित होते. ‘तबर’वर तैनात असलेल्या बँडपथकाने संध्याकाळी झालेल्या सिटी परेडमध्ये भाग घेतला.
पिस्कार्योव्स्कये मेमोरियल सिमेट्री येथे आदरांजली वाहण्यात आली. (फोटो-पीआयबी) |
‘तबर’ सध्या दीर्घकालीन तैनातीवर आहे. सेंट पीटर्सबर्गला जाताना वाटेत तिने ॲलेक्सांड्रिया (इजिप्त) येथे पहिला मुक्काम केला. त्यानंतरचा तिचा मुक्काम नेपल्स (इटली) येथे आणि पुढचा ब्रेस्ट (फ्रांस) येथे होता. यावेळी ‘तबर’ने त्या त्या देशांच्या नौदलाबरोबर संयुक्त युद्धसरावही केले. या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी ‘तबर’चे नाविक परंपरेनुसार स्वागत झाले. भूमध्य समुद्रातून जात असताना ग्रीसच्या नौदलाबरोबर आणि चिंचोळी जिब्राल्टरची खाडी ओलांडल्यावर लगेचच स्पॅनिश नौदलाबरोबर ‘तबर’ने सागरी भागीदारी सराव केले.
भा. नौ. पो. तबर'. (फोटो-पीआयबी) |
‘तबर’ ही भारतीय नौदलातील ‘तलवार’ श्रेणीतील स्टेल्थ युद्धनौका आहे. या श्रेणीतील 6 युद्धनौका भारतीय नौदलात कार्यरत असून त्या सर्वांची बांधणी रशियातच सेंट पीटर्सबर्गच्या गोदीत करण्यात आली होती. या युद्धनौकांवर स्वनातीत ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रासह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आणि इतर यंत्रणा बसवण्यात आलेल्या आहेत.
‘तबर’च्या या सर्व तैनातीमधील या सर्व घडामोडी राजनयिकदृष्ट्या महत्वाच्या ठरतात. लष्करी दले शांततेच्या काळात अशा प्रकारे राजनयात सहभागी होत असतात. योगायोगाने ‘तबर’ सेंट पीटर्सबर्गमध्ये असतानाच भारतीय हवाईदलातील ‘सारंग’ ही हेलिकॉप्टरच्या कसरती करणारी तुकडी मॉस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘माक्स-21’ या आंतरराष्ट्रीय हवाई प्रदर्शनात सहभागी झाली होती. नौदल आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला अधिकाधिक पुढे नेण्याचे एक महत्वाचे साधन असते आणि त्या साधनाचा वापर खूप आधीपासूनच होत आला आहे. ‘तबर’नेही विविध देशांना भेटी देत पार पाडलेली जबाबदारी राजनयाचाच भाग आहे.
‘माक्स-21’मध्ये सहभागी झालेली भारतीय हवाईदलाची ‘सारंग’ तुकडी. (फोटो-पीआयबी) |
दीर्घ तैनातीवर असलेली 'तबर' आता मायदेशी परत यायला निघाली आहे. परतीच्या मार्गावर तिने 30-31 जुलैला स्वीडीश राजधानी स्टॉकहोमला भेट दिली आहे.
उत्तर द्याहटवा'तबर' ५ ते ८ ऑगस्टदरम्यान नॉर्वेच्या बेर्गर बंदरात मुक्कामाला होती.
उत्तर द्याहटवा'तबर'नं 13 ते 16 ऑगस्ट 2021 दरम्यान ब्रिटनमध्ये रॉयल नेव्हीच्या पोर्टस्माऊथ तळावर मुक्काम केला.
उत्तर द्याहटवादीर्घ तैनातीवर असलेल्या 'तबर'ने २५ आणि २६ ऑगस्टला मोरोक्कोच्या कासाब्लांका बंदराला भेट दिली.
उत्तर द्याहटवा3 ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान 'तबर' इजिप्तच्या अॅलेक्सांड्रा बंदरात होती.
उत्तर द्याहटवा