बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवरतला नव्या रुपात

 

हम्बोल्ड्ट फोरम’ (फोटो स्रोतFile:HumboldtForum-9148.jpg - Wikimedia Commons)

जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मधूनच वाहणाऱ्या स्प्रे नदीच्या किनाऱ्यावर स्टाड्टश्लोस (सिटी पॅलेस) म्हणजेच हम्बोल्ड्ट फोरम (Humboldt Forum) उभारण्यात आलेला आहे. या नवनिर्मित राजवाड्याचा उर्वरित भागही 20 जुलै 2021 पासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात आला आहे. बर्लिन शहराच्या स्थापनेला 2012 मध्ये 775 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकेकाळी बर्लिनची ओळख असलेल्या या राजवाड्याची पुन:उभारणी करण्याची योजना जर्मन सरकारने आखली होती.

बर्लिनमधील मूळचा सिटी पॅलेसज्या जागेवर होता त्याच जागेवर तत्कालीन जर्मन राष्ट्रपती योआषिम गाऊक यांच्या हस्ते 12 जून 2013 रोजीहम्बोल्ड्ट फोरमची (जर्मन भाषेतील नाव - हुम्बोल्ड्ट फोरुम) पायाभरणी झाली होती. मात्र युरोपमधील आर्थिक मंदी आणि त्यानंतरच्या काळातील अन्य आर्थिक अडचणींचा फटका या राजप्रासादरुपी हुम्बोल्ड्ट फोरमच्या उभारणीलाही बसला. सुरुवातीला 2018 पर्यंत याचे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण ती मुदत पाळणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर प्रसिद्ध जर्मन भूगोल संशोधक आलेक्झांडर फोन हुम्बोल्ड्ट यांच्या 250 व्या जयंतीच्यावेळी 2019 मध्ये याचे उद्घाटन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले, पण परत ती मुदतही उलटून गेली. अखेर पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2020 मध्ये या राजवाड्यातील काही भाग जनतेसाठी खुला करण्यात आला होता.

हुम्बोल्ड्ट फोरमच्या अंतर्गत भागात प्रशियन काळातील सिटी पॅलेसनुसार आलिशान कक्ष उभारण्यात आलेले नाहीत. याच्या केवळ बाह्यभागाला मूळच्या सिटी पॅलेसप्रमाणे घडवण्यात आले आहे. या इमारतीचा वापर प्रामुख्याने प्रदर्शने, संग्रहालये इत्यादींसाठीच केला जाणार आहे. त्यामध्ये ही नवी इमारत उभी असलेल्या जागेचा इतिहास, विल्हेल्म आणि आलेक्झांडर फोन हुम्बोल्ड्ट या बंधुंच्या भौगोलिक शोधांविषयीचे संग्रहालय तसेच वसाहतवाद आणि त्याचे परिणाम या संकल्पनांचा समावेश आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली चित्रपटगृहे, संगीत आणि नृत्य कार्यक्रमांसाठी मंच, प्रदर्शने आणि संमेलनांसाठी दालने यांचाही समावेश आहे. त्यामुळे याचे काम पूर्ण होत गेले, तसतसे यात बर्लिनमधील इतर संग्रहालये हलवण्यात येऊ लागली. सुरुवातीला Ethnological Museum आणि Dahlem's Museum of Asian Art ही दोन संग्रहालये येथे आली.

स्टाड्टश्लोसला बेर्लिनर श्लोस म्हणूनही ओळखले जात होते. याच्या पुन:उभारणीचा विचार मांडला जाऊ लागला तेव्हापासूनच ही संपूर्ण योजना सतत वादात सापडत राहिली. सुरुवातीला अशा खर्चिक योजनेला आणि संकल्पनेला विरोध झाला. त्यातच या राजवाड्याच्या उभारणीतून जर्मनीने वसाहतवादाच्या काळात केलेली लूट आणि अत्याचाराचे उदात्तीकरण होणार आहे, असाही आरोप होत राहिला आहे. मात्र ही इमारत उभारण्यामागे संशोधनाला चालना देण्चा हेतू असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आणि ही नवी इमारत स्टाड्टश्लोसऐवजी हुम्बोल्ड्ट फोरुमम्हणून ओळखले जाईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र 2008 मध्ये मंजुरी मिळालेल्या इटालियन वास्तुरचनाकार फ्रँको स्टेला यांच्या आरेखनामुळे या इमारतीच्या तीन बाजू मूळच्या स्टाड्टश्लोसप्रमाणे उभारल्या जातील हे निश्चित झाले होते. म्हणून पुन्हा वाद सुरू झाला. या इमारतीच्या मुख्य घुमटावर उभारण्यात आलेल्या क्रुसावरूनही वाद होत राहिला.

सिटी पॅलेसच्या मूळच्या तीन मजली इमारतीला मुख्य प्रवेशद्वारावर एक उंच घुमट होता. त्या राजवाड्याला अन्य दिशांना छोटीछोटी प्रवेशद्वारे करण्यात आली होती. या संपूर्ण आयताकृती वास्तूच्या तिसऱ्या मजल्यावर गच्ची होती. त्या गच्चीला आकर्षक दगडी कठडे तयार करण्यात आले होते. ही वैशिष्ट्ये या नव्या इमारतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्याचवेळी या राजवाड्यातील राजघराण्याच्या भव्य कक्षांची निर्मिती करणे टाळण्यात आले आहे.

स्प्रे नदीच्या किनारी त्स्योल्न (Zölln) परिसरात अठराव्या शतकाच्या सुरुवातीला एक छोटेसे गाव वसलेले होते. त्या गावातील फिशर्स बेटावर सिटी पॅलेस उभारण्यात आला. तोवर या जागी 12 जून 1443 मध्ये ब्रांडेनबुर्गचा युवराज होअनत्सोलर फ्रेडरिक (दुसरा) याने उभारलेला किल्ला अस्तित्वात होता. फ्रेडरिकच्या मृत्युनंतर योआषीम (दुसरा) याने 1538 मध्ये तो भूईकोट जमीनदोस्त केला आणि त्या जागी एक प्रशस्त राजवाडा उभारण्याचे आदेश दिले. सन 1701 मध्ये प्रशियाचा राजा फ्रेडरिक (पहिला) याने त्या राजवाड्यात बदल केले. बर्लिनच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या त्या सिटी पॅलेसने 1701 ते 1918 दरम्यान प्रशियन साम्राज्याचा समृद्धीचा काळ आणि अस्तही अनुभवला होता. याच राजवाड्यातून राजा विलहेल्म (पहिला) याने 1871 मध्ये स्वत:ला एकीकृत जर्मन प्रदेशाचा पहिला सम्राट (जर्मन भाषेतील शब्द - काइझर) म्हणून घोषित केले. पहिल्या महायुद्धापर्यंत ही स्थिती कायम होती. मात्र पहिल्या महायुद्धात जर्मनीचा दारूण पराभव झाल्यावर तत्कालीन प्रशियन सम्राट विलहेल्म (दुसरा) याला जनमताच्या प्रचंड रेट्यापुढे सिंहासनाचा त्याग करावा लागला आणि त्याचबरोबर 217 वर्षे युरोपातील एका महत्त्वाच्या साम्राज्याचाही अंत झाला.

काइझर विलहेल्म (दुसरा) सिंहासनावरून पायउतार झाल्यावर जर्मनीतील स्पार्टासिस्ट नेता कार्ल लिबक्नेष्ट याने सिटी पॅलेसच्या बाल्कनीतून जर्मनी एक समाजवादी प्रजासत्ताक बनल्याचे घोषित केले. पुढे वायमर प्रजासत्ताकाच्या काळात सिटी पॅलेसच्या काही भागाचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले होते, तर उर्वरित भागात सरकारी समारंभ होत असत. मात्र ॲडॉल्फ हिटलरने जर्मनीची सत्ता बळकाविल्यानंतर हा राजवाडा दुर्लक्षित होत राहिला. दुसऱ्या महायुद्धात हा राजवाडा जवळजवळ जमीनदोस्तच झाला होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांमध्ये झालेल्या जर्मनीच्या आणि बर्लिनच्या विभागणीनुसार स्टाड्टश्लोसचा पूर्व बर्लिनचा भाग तत्कालीन सोव्हिएट संघाच्या अधिपत्त्याखाली आला. त्यानंतर या राजवाड्याचा लिबनेष्टने घोषणा केलेल्या बाल्कनीचा भाग वगळता उर्वरित भागही सुरूंग लावून पाडण्यात आला. 

त्या जागी 1976 मध्ये तत्कालीन पूर्व जर्मनीतील साम्यवादी सरकारने प्रजासत्ताकाचा राजवाडा/ Palace of the Republic’  (जर्मन भाषेत - Palast der Republik/पालास्ट डेर रेपुब्लिक) ही नवी आधुनिक आरेखनातील इमारत उभारली.

1990 मध्ये जर्मनीच्या एकीकरणानंतर सिटी पॅलेसच्या पुनरुज्जीवनाचा विचार सुरू झाल्यावर त्याच्या बाजूने आणि विरोधात असे दोन्ही प्रकारचे सूर जनतेत उमटू लागले. पण जर्मन संसदेने (बुंडेसटाग) 2002 मध्ये स्टाड्टश्लोसच्या पुनर्बांधणीचा ठराव मंजूर केला. त्यानंतर 2006-2008 या काळात प्रजासत्ताकाचा राजवाडा नव्या इमारतीच्या बांधकामासाठी पाडण्यात आला.

नव्या स्टाड्टश्लोसची बाह्य दर्शनी बाजू मूळच्या राजवाड्याप्रमाणे आहे, तर त्या इमारतीच्या अंतर्गत भागात आधुनिक वास्तुशैलीतील काही वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या इमारतीची मागील बाजू आधुनिक शैलीमध्ये बांधण्यात आली आहे. अशा प्रकारे उभ्या राहिलेल्या हुम्बोल्ड्ट फोरम म्हणजेच एकेकाळच्या स्टाड्टश्लोसमध्ये आंतरराष्ट्रीय कला आणि संस्कृती केंद्राचा समावेश झालेला असून तो बर्लिनमधील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

टिप्पण्या