टोकियोचा ‘मिराईतोवा’ सज्ज


        नियोजित वेळापत्रकाच्या एक वर्ष पुढे गेलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे 23 जुलैला अधिकृतपणे उद्घाटन होत असले तरी त्यातील फुटबॉल आणि सॉफ्टबॉल स्पर्धांना 21 जुलैपासूनच सुरुवात होत आहे. या क्रीडा स्पर्धांसाठी जगभरातील क्रीडारसिकांचे स्वागत करण्यासाठी मिराईतोवा आणि सोमेईती हे दोघंही टोकियोमध्ये पार पडत असलेल्या उन्हाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकचे शुभंकर आता सज्ज झालेले आहेत. पण कोविड-19च्या महासाथीमुळे यावेळी त्यांना आपल्या सर्वांचे स्वागत आभासी पद्धतीनेच करावे लागणार आहे.

      टोकियो 2020 उन्हाळी ऑलिंपिकचे अधिकृत नाव Games of the XXXII Olympiad असे आहे. टोकियो 2020 च्या अधिकृत बोधचिन्हात वापरण्यात आलेल्या चौकटींमधूनच प्रेरणा घेत मिराईतोवाचे आरेखन करण्यात आलेले आहे.

मिराईतोवा आणि सोमेईती (स्रोत - Wikipedia)

मिराईतोवाच्या आरेखनात निळ्या-पांढऱ्या चौकटींचा, तर सोमेईती गुलाबी-पांढऱ्या चौकटींचा वापर करण्यात आलेला आहे. सोमेईतीच्या आरेखनाची संकल्पना जपानमधील प्रसिद्ध cherry blossom वर आधारलेली आहे. टोकियो 2020 चे शुभंकर निवडण्यासाठी 2017 आणि 2018 मध्ये स्पर्धा आयोजित केली गेली होती. या स्पर्धेत आलेल्या सुमारे दोन हजारांवर प्रवेशिकांमधून ऱ्यो तानिगुची यांची संकल्पना टोकियो 2020 चे अधिकृत शुभंकर म्हणून निवडली गेली.

मिराईतोवा हा शब्द जपानी शब्द मिराई म्हणजे भविष्य आणि तोवा म्हणजे निरंतरता यांच्यापासून तयार केला गेला आहे. तसेच सोमेईती cherry blossom चा एक प्रकार असलेल्या सोमेईयोशिनो यावरून घेतला गेला आहे. मिराईतोवाच्या आरेखनात नव्या-जुन्या संकल्पनांचा समावेश केलेला आहे. मिराईतोवा आणि सोमेईती आधुनिक डिजिटल युगाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या दोघांमध्ये एकमेकांविषयीची प्रचंड आदर आणि मैत्री दिसून येते.

टोकियो 2020 च्या अधिकृत बोधचिन्हात तीन प्रकारच्या आयताकृती आकृत्या वापरण्यात आलेल्या असून त्या आकृत्या जगातील वैविध्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यातून परस्परांबद्दलचा आदर आणि विविधतेत एकता या तत्वांना स्थान देण्यात आलेले आहे. या स्पर्धांचे ब्रीद United by Emotions असे ठेवण्यात आलेले आहे.

टोकियो 2020 उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये जगभरातील 206 देशांमधून जवळजवळ 11,238 क्रीडापटू सहभागी होणार आहेत. हे क्रीडापटू 33 क्रीडाप्रकारांमधून पदक जिंकण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या हस्ते या ऑलिंपिक स्पर्धेचे 23 जुलै रोजी भव्य समारंभात औपचारिक उद्घाटन होणार आहे. 3x3 बास्केटबॉल, फ्रीस्टाईल बीएमएक्स आणि मॅडिसन सायकलिंग हे क्रीडाप्रकार ऑलिंपिकमध्ये यंदा प्रथमच सामील करण्यात आलेले आहेत.

टिप्पण्या