राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी 25 जून 2021 रोजी विशेष रेल्वेगाडीतून प्रवास केला. राष्ट्रपतींनी
रेल्वेगाडीतून प्रवास करण्याची प्रथा अलिकडील काळात अतिशय दुर्मिळ झालेली आहे. यंदाही
तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींकडून दौऱ्यासाठी रेल्वेगाडीची निवड केली
गेली होती. आपल्या मूळगावी परौख येथे जाण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्ली
ते कानपूर असा 438 किलोमीटरचा प्रवास रेल्वेगाडीने केला. अलिकडील काळात भारताच्या
राष्ट्रपतींनी केलेला तो सर्वाधिक लांबचा रेल्वे प्रवास ठरला. दिल्ली सफदरजंग
रेल्वे स्थानकावरून राष्ट्रपतींसाठीची खास रेल्वेगाडी सुटणार असल्यामुळे संपूर्ण
स्थानक टापटीप ठेवण्यात आलेले होते. मात्र यंदा राष्ट्रपतींच्या रेल्वे
प्रवासासाठी प्रथमच त्यांच्यासाठी तयार केलेल्या खास डब्यांचा वापर केला गेला
नाही.
राष्ट्रपती
कोविंद यांच्या ‘राष्ट्रपती
विशेष’ रेल्वेगाडीचे
संचालन अशा रेल्वेगाडीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष नियमावलीनुसारच झाले. पूर्वी राष्ट्रपती जेव्हा
खास रेल्वेगाडीने प्रवास करत असत, तेव्हाही अशी नियमावली अस्तित्वात होती. कालानुरुप
त्या नियमावलीमध्ये सुधारणा होत गेलेली आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या ‘राष्ट्रपती विशेष’ गाडीला दोन डब्ल्यूएपी-7 इंजिने जोडलेली होती. ही भारतीय रेल्वेतील
शक्तिशाली प्रवासी विद्युत इंजिने आहेत. मात्र राष्ट्रपतींसाठीचे खास रेल्वे डबे
आता वापरात नसल्यामुळे यावेळी ‘राष्ट्रपती विशेष’ गाडीसाठी आलिशान महाराजा एक्सप्रेसचे 15 डबे वापरण्यात आले होते. ही
इंजिने आणि डबे या प्रवासासाठी खास सज्ज करण्यात आले होते. या प्रवासादरम्यान संपूर्ण लोहमार्गाच्या भोवतीने कडेकोट
सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. ही गाडी जसजशी पुढे जात होती, तसतसे या मार्गावर धावत असलेल्या इतर सर्व रेल्वेगाड्यांना बऱ्याच आधीपासून बाजूला उभे करून या
रेल्वेगाडीसाठी मार्ग मोकळा करून दिला जात होता. ‘राष्ट्रपती विशेष’ रेल्वेगाडी जाण्याच्या
आधी तिच्या पुढे एक ‘पायलट विशेष’ ही
एक डब्याची गाडी धावत होती. त्या गाडीद्वारे मार्ग ठीक असल्याची खात्री करून घेतली
जात होती. ‘राष्ट्रपती विशेष’ गाडी
पुढे गेल्यावर तिच्या मागून काही अंतराने डिझेल इंजिन जोडलेली तीन डब्यांची राखीव
विशेष रेल्वेगाडी धावत होती. ‘राष्ट्रपती विशेष’ रेल्वेगाडीच्या संचालनामध्ये काही अडचणी उद्भवल्या, तर या राखीव विशेष गाडीचा
वापर केला जाणार होता.
दिल्ली
सफदरजंग रेल्वे स्थानकातून निघाल्यानंतर ‘राष्ट्रपती विशेष’ने 380 किलोमीटरचा प्रवास करून पहिला थांबा घेतला तो कानपूर ग्रामीण जिल्ह्यातील झिंझक
येथे आणि त्या पुढचा थांबा 19 किलोमीटरनंतर घेतला तो रुरा येथे. या दोन्ही ठिकाणी
राष्ट्रपतींनी आपल्या जुन्या परिचितांशी संवाद साधला. अखेर ‘राष्ट्रपती
विशेष’ गाडी सायंकाळी कानपूर सेंट्रल स्थानकात पोहचली. तेथे
ही गाडी तीन दिवस थांबणार असून 28 जून रोजी या गाडीने राष्ट्रपती लखनौपर्यंतचा 75
किलोमीटरचा प्रवास करतील.
कोरोनाच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या सेवेला दाद देऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच देशात या काळात थंडावलेल्या पर्यटन व्यवसायालाही चालना मिळावी आणि रेल्वेच्या प्रवासी संख्येत पुन्हा वाढ व्हावी या हेतूंसाठी राष्ट्रपतींनी असा प्रवास करावा यासाठी रेल्वे मंत्रालयाने विनंती केली होती, असे उत्तर रेल्वेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा