एडनच्या आखातात नौदलांचे युद्धसराव


     भारतीय नौदल आणि युरोपीय संघातील (European Union) तीन नौदलांचे पहिल्यांदाच संयुक्त युद्धसराव 18 आणि 19 जून रोजी एडनच्या आखातात पार पडले. भारत आणि युरोपीय संघ या दोघांसाठीही एडनचे आखात, तांबडा समुद्र आणि सुएझ कालवा हा सगळा परिसर सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्या परिसरात पार पडलेले हे युद्धसरावही महत्वपूर्ण ठरले.

      भारतीय नौदलाची लढाऊ नौका भा. नौ. पो. (आयएनएस) त्रिकंड, तर युरोपीय संघातील इटालियन नौदलाची लढाऊ नौका काराबिनिएरे, स्पॅनिश नौदलाची लढाऊ नौका नावाऱ्या आणि फ्रेंच नौदलातील लढाऊ नौका सुरकोफ तसेच तोनेरे यांचा या सरावांमध्ये सहभाग होता. फ्रेंच नौदलातील तोनेरे हे उभयचर (amphibious) हल्ल्यासाठी वापरले जाणारे हेलिकॉप्टरवाहू जहाज आहे. भारतीय नौदलात अशा प्रकारची चार जहाजे सामील करण्याची योजना अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. सध्या भारत आणि फ्रांस यांच्या नौदलांमध्ये हिंदी महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहकार्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाला फ्रेंच नौदलातील या उभयचर जहाजांची मदत होऊ शकेल. त्या दृष्टीनेही हे युद्धसराव महत्वाचे होते. ‘त्रिकंड’ सध्या एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधातील मोहिमेसाठी तैनात केली गेली आहे.

       एडनच्या आखातातून जाणारे जलमार्ग सुरक्षित आणि कायम खुले राहणे भारत आणि युरोपीय संघ या दोघांच्यादृष्टीने आवश्यक आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून एडनच्या आखातात सोमालियन चाचांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यांच्याकडून या क्षेत्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असतात. त्यामुळे युरोपीय देशांनी आपल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी या क्षेत्रात आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. भारतही व्यापारी जहाजाच्या सुरक्षेसाठी आणि या क्षेत्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 2008 पासून एडनच्या आखातात आपली युद्धनौका अखंड तैनात करत आहे.

      भारतीय नौदल हे हिंदी महासागर क्षेत्रातील सर्वात मोठे नौदल आहे. त्यामुळे या क्षेत्रातील जलमार्गांबरोबरच एकूणच हिंद-प्रशांत क्षेत्र सुरक्षित, आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित आणि खुले ठेवण्यासाठी विविध देश विशेषत: युरोपीय देश आणि अमेरिका यांची नौदले भारतीय नौदलाबरोबर सहकार्य वाढवत आहेत. या सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याशी (United Nations Convention on Law of the Sea /UNCLOS) पूर्ण बांधिलकी व्यक्त केलेली आहे. अलीकडील काळात विशेषत: एडनच्या आखातातील ड्जीबुटीमध्ये चीनने स्वत:चा नाविकतळ सुरू केल्यावर त्याचा  आपापल्या हितसंबंधांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता विचारात घेऊन भारत आणि विविध देशांनी परस्परांच्या नौदलांदरम्यान सहकार्य वाढवलेले आहे.

        भारत आणि युरोपीय संघाच्या नौदलांमध्ये यंदा पार पडलेल्या या पहिल्या संयुक्त युद्धसरावांचा मुख्य उद्देश चाचेगिरीविरुद्ध संयुक्तपणे कारवाई करण्यासाठी परस्पर समन्वय वाढवणे हा होता. त्यामध्ये एकमेकांच्या लढाऊ नौकांवर हेलिकॉप्टर उतरवणे, समुद्रातील गुंतागुंतीच्या तंत्रांचा अवलंब करणे, प्रत्यक्ष गोळिबाराचा सराव, रात्रीच्यावेळी लढाऊ नौकांची संयुक्त गस्त इत्यादींचा समावेश होता. अत्याधुनिक हवाई सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी सरावही यावेळी केले गेले. खोल समुद्रातील मदत आणि बचावकार्य, एकमेकांच्या युद्धनौकांना रसद पुरवठा यांचाही या सरावांमध्ये समावेश करण्यात आला होता. भारतीय नौदलाचे Indian Navy Information Fusion Centre – Indian Ocean Region आणि Maritime Security Centre-Horn of Africa यांच्यातील माहितीच्या देवाणघेवाणीचाही सराव यावेळी करण्यात आला. भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारचे सहकार्य महत्वपूर्ण ठरत आहे.
      
      युरोपीय संघाकडून सोमालियाला दिली जाणारी मानवी मदत व सहकार्य यांच्या सुरक्षेसाठी युरोपीय संघाकडून EU NAVFOR Somalia - Operation Atalanta चालवले जात आहे. इटलीची काराविनिएरे या लढाऊ नौकेकडे सध्या त्या मोहिमेचे नेतृत्व आहे. सोमालियात ‘जागतिक अन्न कार्यक्रमा’अंतर्गत मदत घेऊन जाणाऱ्या विशेष जहाजांना भारतीय नौदल EU NAVFOR Somalia - Operation Atalanta शी समन्वय राखून सुरक्षाकवच पुरवत आहे.

      याच वर्षी जानेवारीमध्ये भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील सागरी सुरक्षेविषयीच्या संवादाला सुरुवात झाली आहे. त्यावेळी दोन्ही बाजूंमधील या क्षेत्रात घनिष्ट सहकार्य आणि संवाद वाढवण्यावर भर दिला गेला आहे.

टिप्पण्या