भारत-जर्मनी राजनयिक संबंधांची 70 वर्षे

      भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनयिक संबंधांना नुकतीच 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने परस्परांमधील मैत्रीपूर्ण संबंधांची आठवण म्हणून 10 जून 2021 रोजी दोन्ही देशांनी प्रत्येकी एका विशेष स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण केले. या निमित्ताने दोन्ही देश संयुक्तपणे 2021-22 मध्ये विविध कार्यक्रमांचेही आयोजन करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये उच्च दर्जाचे संबंध प्रस्थापित झालेले असून भारतात नुकत्याच आलेल्या कोविड-19च्या दुसऱ्या लाटेच्या काळात बर्लिनने भारताला भरीव मदत केली आहे.

    भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनयिक संबंधांची सात दशके पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारताने जारी केलेल्या विशेष स्मृती टपाल तिकिटाची संकल्पना आकर्षक आहे. तिकिटावर डावीकडे भारतीय राजधानीची ओळख असलेले इंडिया गेट आणि उजवीकडे जर्मन राजधानीची ओळख असलेले ब्रांडेनबर्ग गेट (जर्मन भाषेतील नाव – ब्रांडेनबुर्गर टोर) यांच्या प्रतिमा छापण्यात आल्या आहेत. त्या तिकिटाच्या मध्यभागी भारतातील उडिया नृत्य प्रकार आणि जर्मनीतील बव्हेरिया प्रांतातील पारंपारिक शूह्प्लाट्लर (Schuhplattler) नृत्य प्रकार सादर करणाऱ्या व्यक्तींच्या पारंपारिक वेशभूषेतील प्रतिमा छापण्यात आलेल्या आहेत. तसेच त्याच्यावर तिकिटाच्या मधोमध भारतीय आणि जर्मन राष्ट्रध्वजातील तीन रंगांमधील आकृती छापली गेली आहे. 25 रुपये किमतीच्या या टपाल तिकिटावर खालच्या बाजूला भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनयिक संबंधांची 70 वर्षे असा मजकूर हिंदी आणि इंग्रजीतून छापण्यात आलेला आहे. या तिकिटाचे आरेखन श्रीमती गुलिस्ताँ यांनी केलेले आहे.

    जर्मनीने जारी केलेल्या तिकिटावर तिकिटाच्या मध्यभागी भारत जर्मनी हे देवनागरीतून मोठ्या अक्षरात छापलेले आहे. त्या नावांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि जर्मनी यांचे राष्ट्रध्वज छापण्यात आलेले आहेत. 170 युरो सेंट किमतीच्या या तिकिटावर खाली लहान अक्षरांमध्ये जर्मन भाषेतून ‘INDIEN – DEUTSCHLAND 70 JAHRE DIPLOMATISCHE BEZIEHUNGEN’ (जर्मन उच्चार – इंडियन-डॉईशलांड 70 याहरं डिप्लोमाटिशं बेत्शिहुंगन म्हणजे भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनयिक संबंधांची 70 वर्षे) असा मजकूर छापला आहे. या तिकिटाचे आरेखन माटथिआस विटिश यांनी केलेले आहे.

      भारत आणि जर्मनी (तत्कालीन पश्चिम जर्मनी) यांच्यातील राजनयिक संबंधांची सुरुवात 70 वर्षांपूर्वी झालेली असली तरी त्यांच्यातील आर्थिक, सांस्कृतिक संबंधांचा इतिहास त्याहूनही जुना आहे. सोळाव्या शतकापासून दोन्ही देशांमध्ये आर्थिक देवाणघेवाण सुरू झाली होती. त्यानंतरच्या काळात त्यांच्यात सांस्कृतिक क्षेत्रातही देवाणघेवाण सुरू झाली. जर्मन ही इंडो-युरोपीयन भाषा कुळातील एक भाषा आहे. त्यामुळे व्याकरणदृष्ट्या तिचे संस्कृत आणि मराठी भाषेशी साधर्म्य आहे. जर्मनीतील Goethe Institut ने भारतात आपल्या अनेक शाखा सुरू केल्या असून त्याद्वारे जर्मन भाषा, संस्कृती, साहित्य इत्यादींच्या अध्ययनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

      दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जर्मनीकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न केले होते. शीतयुद्धाच्या अखेरच्या दिवसांमध्ये जर्मनीचे पुन्हा एकीकरण झाल्यावर अस्तित्वात आलेल्या फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीने भारताचा पार्टनर ऑफ चॉईस असा उल्लेख करून आपल्या परराष्ट्र धोरणात भारताला प्रमुख स्थान दिले.

    आज दोन्ही देशांमध्ये व्यूहात्मक भागीदारी होत असून विविध क्षेत्रांमध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित झालेले आहेत. दर दोन वर्षांनी पार पडणाऱ्या भारत-जर्मनी आंतरसरकारी विचारविनिमय परिषदेमुळे हे संबंध अधिक विस्तृत होण्यास मदत होत आहे. या परिषदेच्या पाचव्या शिखर बैठकीच्या निमित्ताने जर्मन चांसलर आंगेला मेर्कल यांच्या नोव्हेंबर 2019 मधील भारत दौऱ्याच्यावेळी 2020-24 या कालावधीसाठीच्या विविध विषयांवरील संयुक्त जाहीरनाम्यांवर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये सल्लामसलत, व्यूहात्मक प्रकल्पातील सहकार्य, हरित शहरी वाहतुकीसाठी भारत-जर्मनी भागीदारी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन आणि विकासात सहकार्य, समुद्रात सांडपाणी जाण्यास प्रतिबंध इत्यादी विषयांचा समावेश होता. तसेच इस्रो आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांच्यात सहकार्य, नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातील सहकार्य, आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी संजाळाअंतर्गत सहकार्य, कौशल्य विकास आणि व्यवसायाभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षण, स्टार्ट-अप क्षेत्रातील आर्थिक सहकार्य, व्यावसायिक आजार-पुनर्वसन आणि अक्षम व्यक्ती व कामगारांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, देशांतर्गत-किनारी आणि सागरी तंत्रज्ञानात सहकार्य, वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन, आयुर्वेद आणि योग व ध्यान या क्षेत्रांमधील शैक्षणिक सहकार्य, उच्च शिक्षणातील सहकार्य इत्यादी क्षेत्रांसंबंधीचे करार/सहमतिपत्रे/जाहीरनामेही त्यावेळी केले गेले. म्हणूनच चांसलर मेर्कल यांनी या दौऱ्याच्यावेळी झालेल्या शिखर परिषदेनंतर असे म्हटले की, यातून भारत आणि जर्मनी यांच्यातील विस्तृत आणि अतिशय जवळचे संबंध अधोरेखित होत आहेत. आमच्या मनात या अतिशय विस्तृत देशाबद्दल आणि त्याच्या विविधतेबद्दल अतिशय आदर आहे.

मुंबई आणि स्टुटगार्ट (1968), कर्नाटक आणि बव्हेरिया (2007), पुणे आणि ब्रेमन, महाराष्ट्र आणि बाडन-व्यूर्टेंबर्ग (जानेवारी 2015), कोईंबतूर आणि एसलिंगन आम नेकर (2016) या दोन्ही देशांमधील शहरे आणि घटकराज्यांमध्ये परस्पर सामंजस्याचे करार करण्यात आलेले आहेत.

    भारतातून जर्मनीत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या, तर भारतीय संस्कृती, भाषांच्या अध्ययनासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जर्मनीत भारतीय भाषा आणि भारतात जर्मन भाषा शिकणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये संपर्क वाढण्यात या सर्व बाबींमुळे मदत होत आहे. आज सुमारे दीड लाख भारतीय आणि भारतीय वंशाचे लोक जर्मनीत वास्तव्य करत आहेत.

      भारत आणि जर्मनी यांच्यात अतिशय मजबूत सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत. माक्स म्यूलर यांनी एकोणिसाव्या शतकात उपनिषदांचे आणि ऋग्वेदाचे जर्मन भाषेत भाषांतर केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नृत्य प्रकार आणि हिंदी चित्रपटही जर्मनीत लोकप्रिय होत आहेत. एकूणच भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध आंतरराष्ट्रीय मंचावरील परस्परांना पूरक भूमिका, आर्थिक, विज्ञान-तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, संस्कृती अशा विविध क्षेत्रांमध्ये घनिष्ठ बनले आहेत आणि यापुढेही ते अधिकाधिक विस्तृत होत जाणार आहेत.

टिप्पण्या