‘रेड फ्लॅग’नंतर आता ‘ब्ल्यू फ्लॅग’ची तयारी



      इस्रायलमध्ये नोव्हेंबर २०१७ मध्ये पार पडणाऱ्या ‘ब्ल्यू फ्लॅग’ या बहुराष्ट्रीय हवाई युद्धसरावांमध्ये भारतीय हवाईदल पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतील अलास्कामध्ये पार पडलेल्या ‘रेड फ्लॅग’ हवाई युद्धसरावांनंतर आता ‘ब्ल्यू फ्लॅग’मध्ये भारतीय हवाईदल आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करेल.
      अमेरिकेत दरवर्षी पार पडणारे ‘रेड फ्लॅग’ हवाई युद्धसराव 'जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव' म्हणून ओळखले जातात. सहभागी देशांच्या विमानांची दोन परस्परविरोधी गटांमध्ये विभागणी करून ते गट एकमेकांसमोर येत असल्यामुळे या सरावांमध्ये जवळपास खऱ्याखुऱ्या युद्धासमान परिस्थिती निर्माण होत असते. अमेरिकेतील अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळावर नुकत्याच पार पडलेल्या ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांच्या एका टप्प्यात सहभागी होत भारतीय हवाईदलाने नवनवीन युद्धतंत्रे आत्मसात करतानाच खंडपार तैनातीतही आपली कार्यक्षमता किती उच्च पातळीची आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
      ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव नेवाडा आणि अलास्का या दोन ठिकाणी चार-चार टप्प्यांमध्ये आयोजित केले जातात. भारतीय हवाईदलाने सर्वप्रथम २००८मध्ये नेवाडा राज्यातील नेलिस येथे होणाऱ्या ‘रेड फ्लॅग’ हवाई युद्धसरावांमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर आता अलास्कामधील ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्येही भारतीय हवाईदल पहिल्यांदाच सहभागी झाले होते. या युद्धसरावांसाठी ३ एप्रिल रोजी जामनगरच्या हवाईतळावरून ४ सुखोई-३० एमकेआय, ४ जग्वार डॅरिन-२, २ आयएल-७८ एमकेआय आणि २ सी-१७ ग्लोबमास्टर-३ या विमानांनी अलास्काच्या दिशेने उड्डाण केले होते. यासाठी जाता-येताना बहरिन, इजिप्त, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा आणि यू.ए.ई. अशा विविध देशांच्या हवाईतळांना भेट दे‘हवाई राजनया’द्वारे भारताचे त्या-त्या देशांबरोबरील संबंध भक्कम करण्यातही भारतीय हवाईदलाने योगदान दिले. चार खंडांमधून सुमारे २० हजार किलोमीटरचे अंतर १८ दिवसांमध्ये पार करत भारतीय हवाईदलाची विमाने २० एप्रिलला अलास्कातील नियोजित तळावर पोहोचली होती.
      अमेरिकन तसेच मित्रराष्ट्रांच्या हवाईदलांना उच्च कोटीचे प्रशिक्षण पुरवून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या हेतूने ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांचे आयोजन केले जाते. व्हिएतनाम युद्धातील नामुष्कीनंतर अमेरिकेने १९७५पासून हे युद्धसराव सुरू केले. अलास्का येथे होणारे ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव सुरुवातीला फिलिपीन्समध्ये आयोजित केले जात होते. पण १९९२ मध्ये तेथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात या सरावांसाठीच्या हवाईतळाचे इतके नुकसान झाले की, तो तळच बंद करावा लागला आणि हे सराव अलास्कामध्ये स्थानांतरित करण्यात आले. या सरावांमध्ये अमेरिकेन हवाई दलाच्या आईल्सन आणि एल्मन्डॉर्फ येथील हवाई तळांवरून सहभागी राष्ट्रांची विमाने दोन वेगवेगळ्या गटांमध्ये समाविष्ट होत असतात. या सरावांसाठी सुमारे पावणेदोन लाख चौरस किलोमीटर इतके विस्तृत क्षेत्रफळाचे हवाईक्षेत्र निश्चित केले जात असल्यामुळे विमानांनाही पूर्ण क्षमतेने सरावांमध्ये उतरता येते.
      सध्याच्या बहुआयामी, किचकट हवाईयुद्ध तंत्राच्या नवनवीन संकल्पनांबाबत विचारविनिमय करण्याची संधी या युद्धसरावांमुळे भारतीय हवाईदलाला मिळाली.
      भारतीय हवाईदल आता ‘व्यूहात्मक हवाईदल’ झाल्याची माहिती हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी गेल्या वर्षी हवाईदल दिनी दिली होती. त्याची प्रचिती भारतीय हवाईदलाने ‘रेड फ्लॅग अलास्का १६-१’ सरावांच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिली आहे. भारताने इतक्या दूरवर सरावांसाठी आपली विमाने पाठविण्याबाबत संसदेतही प्रश्न विचारले गेले होते. त्यावर अशा युद्धसरावांमुळे आपल्या हवाईदलामध्ये आवश्यक सुधारणा करणे शक्य होत असते आणि जगाच्या कोणत्याही प्रदेशात कार्यरत राहण्याची क्षमताही यामुळे हवाईदलाला प्राप्त होत असते, असे उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिले होते.
      आईल्सन हवाईतळावर पोहचल्यावर भारतीय वैमानिकांनी आपल्या विमानांसोबत सरावांसाठीच्या प्रदेशाची, नाटोच्या वैशिष्ट्यपूर्ण संकेतांची, रेडिओ संदेशवहन संकल्पनांची माहिती करून घेतली. या सुरुवातीच्या टप्प्यातच अमेरिकन एफ-१६ विमानांच्या नेतृत्वाखालील आक्रमक तुकडीच्या प्रमुखांनी भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांच्या कार्यक्षमतेची स्तुती केली. अमेरिकेच्या हवाईदलाने प्रथमच पाचव्या पिढीचे अत्याधुनिक एफ-२२ विमान अन्य देशांबरोबरच्या युद्धसरावांमध्ये उतरविले होते. त्याचबरोबर एफ-१५, एफ-१६, एफ-१८ या अमेरिकन लढाऊ विमानांसह सुखोई विमानांचा आक्रमक (निळ्या) गटात सहभाग होता. त्याचवेळी जगातील सर्वोत्कृष्ट बॉम्बिंग ग्राऊंड म्हणून ओळख असलेल्या जेपीएआरसी या मैदानात भारतीय जग्वार डॅरीन-२ विमानांनी अमेरिकन विमानांच्या साथीने बॉम्बवर्षावाचा सराव केला.
      या सरावांद्वारे भारतीय हवाईदलाला सतत शून्याच्या जवळ असलेल्या तापमानात आणि आपल्या भूमीपासून इतक्या दूरवरच्या प्रदेशातही मनुष्यबळ आणि विमानांची कार्यक्षमता कशी टिकवून ठेवायची याचाही महत्त्वाचा अनुभव मिळाला आहे. अशा किचकट युद्धसरावांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यामध्येही 'सुखोई' आणि 'जग्वार'च्या वैमानिकांनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण युद्धसरावांमध्ये तीन मोहिमांचे नेतृत्व पूर्णपणे भारतीय वैमानिकांनी केले होते. तसेच शत्रुच्या हल्ल्यात आपले लढाऊ विमान कोसळलेच, तर त्यातून वैमानिकाची तातडीने सुटका करून विमानांचे अवशेष तेथून कसे परत आणायचे याचाही सराव यावेळी करण्यात आला.
      या सरावांच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या अमेरिकेच्या ३५४व्या फायटर विंगचे व्हाईस कमांडर कर्नल विल्यम कल्व्हर म्हणाले की, आताचे सराव त्यांनी आजपर्यंत पाहिलेल्या सरावांमध्ये सर्वोत्कृष्ट होते. भारतीय हवाईदलाच्या अत्युच्च दर्जाचे कौतुक केलेच पाहिजे. इतक्या दूरवर आणि विरुद्ध वातावरणात भारतीय हवाईदलाने आणलेल्या विमानांची उपलब्धता १०० टक्के राहिल्याने त्यांनी भारतीय देखभाल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अलास्काहून परत भारतात येताना या पथकातील सुखोई विमानांचा ताफा संयुक्त अरब अमिरातीला थांबला होता. तेथे १० दिवस यू.ए.ई.च्या हवाई दलाबरोबर संयुक्त युद्धसराव करून ती विमानेही आता मायदेशी परतली.

टिप्पण्या