जमाना ‘बुलेट ट्रेन’चा आहे ना!


    भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या एका अहवालानुसार, भारतीय रेल्वे सुपरफास्ट ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांकडून प्रवासीभाड्यावर अधिभार वसूल करत आहे. मात्र तसे असूनही देशातील ९५ टक्के रेल्वेगाड्या वेळेवर मुक्कामी पोहचत नाही आहेत.
      माझ्या मते, त्यात आणखी मुद्दा जोडला जाणे आवश्यक होते की, असा सुपरफास्टचा अधिभार घेऊनही अलीकडे सुरू करण्यात आलेल्या काही रेल्वेगाड्यांना सुपरफास्ट का म्हणावे.
      माझी काही निरीक्षणे.
      १२४९४/९३ ह. निजामुद्दीन-पुणे-ह. निजामुद्दीन एसी सुपरफास्ट एक्सप्रेस. मे २०१६ मध्ये नियमित सुरू झालेली ही गाडी. हिला सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणावे का असा प्रश्न आहे. कारण या गाडीला ती धावत असताना सुपरफास्ट रेल्वेगाडीप्रमाणे मान मिळत नसल्याचे दिसते.
      ही गाडी एसी सुपरफास्ट एक्सप्रेस ही सुपरफास्ट श्रेणीतील असली तरी वसई रोड ते पुणे यादरम्यान बरीच रखडते. या सुपरफास्ट गाडीला वसई रोडहून पुण्यापर्यंत १८० कि.मी.साठी ४ तास ५५ मि. लागतात. म्हणजेच सुपरफास्ट असूनही या गाडीचा Overall Speed केवळ ३६.६१ कि.मी./तास, तर सरासरी वेग ३७.३७ कि.मी./तास राहत आहे. तसेच वसई रोड ते पुणे यादरम्यान या गाडीला बाजूला करून अन्य तीन गाड्यांना (ज्यातील एकच सुपरफास्ट श्रेणीतील आहे) पुढे सोडले जाते.
      १२४९४ निजामुद्दीन पुणे एसी सुपरफास्ट एक्सप्रेस वसई रोड-कोपर यांदरम्यान एका स्थानकावर (साधारणतः खारबाव येथे) ही गाडी थांबवून मागून आलेली वसई रोड-पनवेल जं. मेमू पुढे सोडली जाते. परिणामी वसई रोड-कल्याण जं. हे ४२ कि.मी.चे अंतर १२४९४ एसी सुपरफास्ट एक्सप्रेस ७७ मिनिटांत कापते. (म्हणजेच सरासरी वेग ३२.२२ कि.मी./तास). ही गाडी वेळेच्या आधी आल्यामुळे कल्याण जं. आणि डोंबिवलीच्यामध्ये तिला थांबवून ठेवले जाते. पुन्हा कल्याण जं.ला १२१२३ मुंबई-पुणे दख्खनची राणी पुढे सोडण्यासाठी पुन्हा ती नियोजित वेळेनंतर साधारण १८.०५ वाजता पुण्याकडे निघते. त्यानंतर लोणावळा-पुणे सेक्शनमध्ये १९४२० अहमदाबाद-चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस पुढे सोडण्यासाठी एसी सुपरफास्ट एक्सप्रेसला वाटेत थांबवून ठेवले जाते. अगदी अहमदाबाद-चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस अर्धातास उशीरा धावत असली तरी तिचा वेग जास्त ठेऊन, तिला मार्ग उपलब्ध करून देऊन पुण्यात आधी पोहचवले जाते. त्यामुळे पुण्यात वेळेच्या २०/२५ मिनिटे आधी पोहचू शकणारी गाडी उशिराने पोहचते. १२४९४ एसी एक्सप्रेसच्या तिकिटामध्ये प्रवाशांकडून सुपरफास्ट चार्जेस घेतले जात असले तरी मेमू आणि मेल/एक्सप्रेस यांना मार्ग उपलब्ध करून दिला जातो. परिणामी लोणावळा-पुणे दरम्यान सरासरी वेग पुन्हा ३६.५७ किं.मी./तास.
      इथे १२४९४ ह. निजामुद्दीन पुणे एसी सुपरफास्ट एक्सप्रेसच्या लोणावळा-पुणे सेक्शनवरील वेळांची इतर गाड्यांशी तुलना एक तुलना करून पाहू.
- १२४९४ निजामुद्दीन पुणे एसी सुपरफास्ट एक्सप्रेस - लोणावळा-पुणे प्रवासाला लागणारा नियोजित वेळ - १ तास ४५ मि., सेक्शनमधील सरासरी ताशी वेग (कि.मी.) - ३६.५७, (तिकीटदर ३-एसी - साधारणपणे ५१५ रु.)
- १९४२० अहमदाबाद पुणे एक्सप्रेस - या सेक्शनमध्ये प्रवासाला लागणारा नियोजित वेळ - १ तास २२ मि., सेक्शनमधील सरासरी ताशी वेग (कि.मी.) - ४६.८२, (तिकीटदर शयनयान - साधारणपणे ८५ रु.)
- लोणावळा पुणे ईएमयू - प्रवासाला लागणारा नियोजित वेळ - १ तास २० मि., सेक्शनमधील सरासरी ताशी वेग (कि.मी.) - ४८.००, (तिकीटदर अनारक्षित - १५ रु.)
      म्हणजेच लोकलचे १५ रुपयांचे तिकीट काढून वाटेत १५ थांबे घेऊनही मी लोणावळा-पुणे प्रवास १ तास. २० मिनिटांत होतो. माझ्याकडे १९४२० अहमदाबाद चेन्नई सेंट्रल एक्सप्रेसचे जनरलचे तिकीट (रु. ३६) असेल, तर हा प्रवास १ तास २२ मिनिटांत (प्रत्यक्षात ५० मिनिटांत) होतो, पण १२४९४ एसी सुपरफास्ट एक्सप्रेससाठी ४५ रुपये पुरवणी चार्ज भरूनही हे अंतर १ तास ४५ मिनिटे लागतात.
      परतीच्या प्रवासातही मथुरा-दिल्ली यादरम्यान अशीच स्थिती दिसते.
      तिच अवस्था २२१०९/१० लोकमान्य टिळक (ट)-ह. निजामुद्दीन एसी सुपरफास्ट एक्सप्रेसचीही आहे. ही गाडी प्रवास वेळेत सुरू करते, पण ४ वर्षे होत आली ही गाडी मध्ये अशीच बाजूला काढून बाकीच्या गाड्या पुढे सोडल्या जातात. परिणामी सातत्याने १ ते साडेतीन तासांपर्यंत ही गाडी उशीरा मुक्कामी पोहचत आहे. दिल्ली-हावडा मार्गावर रेल्वेगाड्यांच्या वर्दळीच्या प्रचंड ताणामुळे तिथेही राजधानी, दुरंतो एक्सप्रेस गाड्याही सतत लेट होत असतात.
      असो, आपण प्रवाशांनी देशासाठी एवढा अधिभार सहन करत बुलेट ट्रेनच्या स्वागतासाठी सज्ज राहिले पाहिजे. बुलेट ट्रेन आली की, सुपरफास्ट या संकल्पनेला रेल्वेमध्ये काहीच अर्थ राहणार नाही आहे ना.

टिप्पण्या