'ब्रह्मोस' - भारताकडील ब्रह्मास्त्र


भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्रह्मोसया जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) क्रूझ क्षेपणास्त्राच्या विविध आवृत्त्या विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. जमिनीवरून, पाण्यावरून आणि त्याखालून तसेच हवेतून असे कोठूनही डागता येऊ शकणारे ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र ठरणार आहे.
      भारत आणि रशिया यांच्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याच्या पार्श्वभूमीवर केवळ स्वनातीतच नव्हे, तर जगातील एक उत्कृष्ट दर्जाचे क्षेपणास्त्र संयुक्तपणे विकसित करण्याचा विचार नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात समोर आला होता. त्यानंतर वाजपेयी सरकारच्या काळात दोन्ही देशांदरम्यानचे संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी आंतरसरकारी आयोग स्थापन करण्यात आला. त्याचदरम्यान ब्रह्मोसच्याही विचाराने अधिक गती घेतली आणि ब्रह्मोस एअरोस्पेसकंपनीची स्थापना करण्यात आली. भारतातील ब्रह्मपुत्र आणि रशियातील मॉस्को (मूळ रशियन नाव – मस्क्वा) या नद्यांच्या नावातील सुरुवातीची अक्षरे घेऊन ब्रह्मोस हे नाव तयार करण्यात आलेले आहे.
      ब्रह्मोसच्या जमीन व युध्दनौकेवरून डागता येणाऱ्या आवृत्त्या विकसित करण्यात आल्या असून त्या तैनातही करण्यात आल्या आहेत. पाणबुडी आणि लढाऊ विमानातून डागता येणाऱ्या आवृत्त्या सध्या विकसित होत आहेत. ब्रह्मोसच्या लढाऊ विमानासाठीच्या आवृत्तीची लवकरच पहिली प्रत्यक्ष चाचणी होणार आहे. त्याच्या चाचण्या पूर्ण झाल्यावर वर्षभरात हे क्षेपणास्त्र भारतीय हवाईदलाकडे सोपविण्यात येणार आहे. भारतीय हवाईदलातील सुखोई-३० एमकेआय या बहुपयोगी लढाऊ विमानावर ब्रह्मोस बसविण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी सुखोईमध्ये काही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. त्यावेळी सुखोईच्या सांगाड्याला मजबूत करतानाच ब्रह्मोसडागण्यासाठी आवश्यक संगणक यंत्रणाही त्यावर बसविण्यात येत आहेत. आता ब्रह्मोसची ही आवृत्तीही चाचण्यांसाठी तयार आहे.
ब्रह्मोस पाणबुडीतून सोडण्यासाठी विशिष्ट तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. जेव्हा हे क्षेपणास्त्र डागले जाईल, तेव्हा ते पाणबुडीतून हवेच्या फुग्याबरोबर बाहेर ढकलले जाईल. पाण्यातून बाहेर येईपर्यंत याच्याभोवतीने तो हवेचा फुगा ब्रह्मोसचे पाण्यापासून संरक्षण करेल. पाण्याबाहेर काही अंतर वर आल्यानंतर ब्रह्मोसचे बुस्टर प्रज्वलित होतील आणि ते लक्ष्याच्या दिशेने स्वनातीत वेगाने मार्गस्थ होईल. ब्रह्मोसच्या तैनातीसाठी भारतीय नौदलातील पाणबुड्यांमध्ये काही सुधारणा कराव्या लागल्या आहेत.
स्वनातीत ब्रह्मोसचा वेग ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट असून ते 360 अंशातून कोठेही मारा करू शकते. क्षेपणास्त्रांच्या संयुक्त विकासासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय कायद्यांमधील बंधनामुळे ब्रह्मोसचा पल्ला 300 किलोमीटरपेक्षा कमी 290 किलोमीटर इतकाच ठेवण्यात आला आहे. दोन टप्प्यांचे ब्रह्मोस घन इंधनावर चालते. यात स्टिल्थ तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शत्रुच्या रडारला चकवा देत अचूक लक्ष्यभेद करते. भारत आणि रशिया संयुक्तपणे विकसित करत असलेल्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानावरही ब्रह्मोस बसविण्यात येणार आहे.
आज ब्रह्मोस क्षेपणास्त्राने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आजघडीला केवळ भारताकडेच असे क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोसच्या या यशामुळेच आता त्याच्या हायपरसॉनिक (आवाजाच्या वेगाच्या सहापट वेगाने जाणारी आवृत्ती विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भारत आता MTCR चा सदस्य झाल्यामुळे या क्षेपणास्त्राचा पल्ला दुपटीने वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टिप्पण्या