स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!


      28 जानेवारी 2012. त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं. गेली 18 वर्ष वाटत पाहण्यात गेली होती, पण आता प्रजासत्ताक दिनाचा सोहळा (Republic Day Celebrations) प्रत्यक्ष पाहण्याचा योग आलेला होता. खास तेवढ्यासाठी मी माझा मित्र शशिकांतसोबत दिल्ली गाठली होती.

      आम्हाला 26 जानेवारीच्या संचलनाची (RDParade) तिकिटं मिळाली नव्हती, मात्र बीटिंग रिट्रीटची मिळाली होती. प्रत्यक्ष राष्ट्रपती आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत बीटिंग रिट्रीट 29 जानेवारीला संध्याकाळी पार पडत असला तरी तो समारंभ सामान्य जनतेला 28 तारखेला पाहता येतो. 28 तारखेला 29च्या समारंभाची संपूर्ण रंगीत तालिम होत असते.

      सकाळी दिल्ली फिरून झाल्यावर बीटिंग रिट्रीटसाठी (Beating Retreat) आम्ही संध्याकाळी चारपर्यंत विजय चौकात पोहचलो होतो. सगळ्या सुरक्षा चाचण्या पार करून आम्ही राष्ट्रपतींच्या आसनाच्या डाव्या बाजूच्या रांगेत बसलो. तिथून राष्ट्रपती भवनाचा घुमटही दिसत राहील अशीच जागा आम्ही निवडली होती. समारंभ सुरू होण्यासाठी अजूनही जवळजवळ तासभर होता. एकमेकांशी बोलताबोलता आजूबाजूच्या संसद भवन, केंद्रीय सचिवालय, रेल भवन, समोर असलेल्या साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्स, राष्ट्रपती भवन सगळ्या सगळ्या इमारती मी न्याहाळत होतो. इतक्या शांतपणे या परिसरात हे सगळं न्याहाळायला मिळण्याची ती पहिलीच वेळ होती आणि स्वप्नपूर्तीही होत होती. त्यावेळी अनेक भावनाही मनात दाटून येत होत्या. आज आपण प्रत्यक्षात या जागी आहोत आणि आपला सर्वात आवडता सोहळा प्रत्यक्षात पाहत आहोत या विचारांनी माझ्या अंगावर एकीकडे रोमांच उभे राहत होते, शिवाय आतमध्ये आणखीही काही तरी होत होते. तरी भावनांवर नियंत्रण ठेवत हे सगळं वातावरण मी अनुभवत होतो.

      समोर संपूर्ण रंगीत तालिमीची सगळी पूर्व तयारी झाली होती. संध्याकाळचं कोवळं उन अंगावर येत होतं आणि अंगात जर्कीन असूनही थंडी वाजत होती. विजय चौक वेगवेगळ्या रंगांच्या पताकांनी, फुलांनी सजलेला होताच. चौकाच्या दोन बाजूंना राष्ट्रध्वजही दिमाखात फडकत होते. दरम्यानच्या काळात 61 कॅव्हेलरीचे (61 Cavalry) घोडेस्वार आणि सीमा सुरक्षा दलाचे (BSF) सजलेले उंट खास समारंभासाठीच्या पोशाखात विजय चौकाच्या भोवतीनं येऊन उभे राहिले. या चौकाची शोभा आणखी वाजवत होते ते. पुढे एक एक करत अतिविशिष्ट व्यक्तींची वाहनं राष्ट्रपती भवनाच्या दिशेनं विजय चौकात येऊन थांबत होती आणि त्यातून एक लष्करी अधिकारी खाली उतरत होता. रंगीत तालीम असल्यामुळं ती खास त्या व्यक्तींची वाहनं नव्हती, तर दुसरी वाहनं होती. त्या वाहनांमधून अतिविशिष्ट व्यक्तीची डमी म्हणूनच ते अधिकारी येत होते. या सगळ्यातून प्रत्यक्ष समारंभाच्या प्रत्येक मिनिटाचं नियोजन व्यवस्थित झालं आहे की नाही याचीही खातरजमा करून घेतली जात होती.

ठीक 4.50 ला रायसीना टेकडीवरून राष्ट्रपतींचे अंगरक्षक दलामधले घोडेस्वार विजय चौकाच्या दिशेनं येताना दिसू लागले. काही मिनिटांतच त्या घोड्यांच्या टापांच्या गजराच्या साथीनं राष्ट्रपतींची डमी मोटारगाडीही विजय चौकात आली. यानंतर ठीक पाच वाजता ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत होऊन प्रत्यक्ष बीटिंग रीट्रीट सुरू झालं.

      आता तिन्ही लष्कराच्या दलांमधून आलेले जवळपास एक हजार बँडवादक रायसीना टेकडीवरून विजय चौकात येऊ लागले. तेही सगळे समारंभासाठीच्या विशेष पोशाखात असल्यामुळं हा समारंभ अधिक रंगीबेरंगी होणार होता. आता प्रत्येक दलाचं बँड सादरीकरण सुरू झालं होतं आणि मीही ते सगळं दृश्य नजरेत टिपत राहिलो होतो.

Drummers' Call

       साधारण तासाभरानं बीटिंग रिट्रीटचा शेवट जवळ आला होता. भूदलाच्या ड्रमवादक पथकाकडून Drummers’ Call सादर केलं जात होतं. आता पुन्हा मला जास्तच भावूक व्हायला होत होतं. काही मिनिटांत Abide with Me या धूननं तर आणखीनच भावूक होऊ लागलो; पण मी आतापर्यंत तरी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होत होतो. पण Abidewith Me नंतर मात्र जेव्हा राष्ट्रध्वज Retreat च्या धूनवर सन्मानानं उतरवला जात होता, तेव्हा मात्र खूपच काही वाटायला लागलं. अखेर नियंत्रण सुटलंच आणि डोळ्यांतून जलधारा वाहू लागल्या.... आजवर दूरदर्शनवर हा सोहळा बघत असतानाही तसं होतं आलं आहेच, पण प्रत्यक्षात तिथं पहिल्यांदाच उपस्थिती लावल्यानं आणखीनच भावूक व्हायला झालं होतं.

त्यानंतर समोर सारे जहां से अच्छाच्या धूनवर सगळे बँडवादक रायसीना टेकडीवर परतले आणि काही क्षणांमध्येच त्या परिसरातल्या सगळ्या इमारती – राष्ट्रपती भवन, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्स, संसद भवन, रेल भवन, केंद्रीय सचिवालय – त्यांच्यावर केलेल्या रोषणाईत न्हाऊन निघाल्या. त्यानंतर राष्ट्रगीतानं समारंभाची सांगता झाली. 

राष्ट्रपतींचे अंगरक्षक पुन्हा विजय चौकात येऊन राष्ट्रपतींच्या डमी वाहनासोबत राष्ट्रपती भवनात परतले. बाकीच्याही अतिविशिष्ट व्यक्तींची डमी वाहनं तिथून परतू लागली. पण दरम्यानच्या काळात इकडे माझ्या डोळ्यातल्या जलधारा पाहून माझ्या मित्राला, शशिकांतला - हे काय? असा प्रश्न पडला होता. कारण तोपर्यंत मी त्याला आपण दिल्लीला संचलन बघायला जाऊ असं म्हणत होतो. मला का जायचं आहे हा सोहळा बघायला ते मी त्याला सांगितलं नव्हतं. मग आम्ही दरवर्षी तसं ठरवतही होतो, पण काही तरी कारणांनी आमचं जाण रद्द होत होतं. शेवटी बीटिंग रिट्रीट बघून आम्ही आमच्या रुमवर परतल्यावर – मला तिथं असं का होत होतं – त्याची कारणं मी मित्राला सांगितली. मग रात्रीचं जेवण झाल्यावर त्यानं म्हटलं की, आपण आपल्या दिल्लीवारीचा शेवट गोड खाऊन करुयात. कारण दुसऱ्या दिवशी पहाटे परतीच्या दिशेनं आम्ही निघणार होतो.

(सर्व फोटो - प. सू. का.)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा