पीटरहोफ


               सेंट पीटर्सबर्ग ही रशियाची झारकालीन राजधानी असल्यामुळे अनेक सुंदर, आकर्षक राजवाडे, उद्याने, कारंजे, कॅथेड्रल्स, पुतळे, निवा (нева / न्येवा) नदीवरचे आकर्षक पूल अशा वास्तूवैविध्यांनी सजलेली आहे. या सर्वांमुळे जगातील सुंदर शहरांपैकी एक अशी या शहराची ओळख झाली आहे. सेंट पीटर्सबर्गच्या उपनगरात पीटरहोफ हे आकर्षक राजसंकुल स्थित आहे. याची उभारणी 1709 पासून पुढची अनेक वर्षे होत राहिली. पीटर द ग्रेटची एक छोटेखानी निवासस्थान म्हणून उभारणी झालेल्या मुख्य वास्तूचे Grand Palace मध्ये रुपांतर झाले 1717 ते 1728 दरम्यान. मात्र याचे बहुतांश काम पूर्ण झाल्यावर 14 ऑगस्ट 1723 ला या राजप्रासादाचे उद्घाटन झाले, म्हणजे आजपासून ठीक 299 वर्षांपूर्वी.

      1944 पासून 1990 पर्यंत हा पीटरहोफचा परिसर – Петродворец (रशियान उच्चार – पित्रद्वरेत्स) नावाने ओळखला जात होता. पित्रद्वरेत्सचा अर्थ पीटरचा राजवाडा असा होता. या परिसराला आता पीटरहोफ (रशियन नाव – Петергоф, पिचिरगोफ) म्हणून ओळखले जाते. होफ (Hof) म्हणजे या जर्मन शब्दावरून रशियनमध्ये गोफ हा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ आहे निवासस्थान. या पीटरहोफमध्ये अनेक लहान-मोठ्या वास्तू, उद्याने, कारंजे आहेत. त्यातील एक प्रमुख वास्तू म्हणजे द ग्रँड पॅलेस (रशियन नाव – Большой Дворец, बल्शोई द्वरेत्स). ग्रँड पॅलेस फिनलंडच्या खाडीच्या किनाऱ्यावर उभारला गेला आहे. क्रोनश्टाट येथील झारच्या नौदलाच्या तळाकडे जाणाऱ्या मार्गावर आपले विश्रांतीगृह म्हणून पीटर द ग्रेटने सुरुवातीला एक छोटेखानी राजवाडा उभारला होता. त्याला हा परिसर अतिशय आवडल्याने तेथे व्हर्सेलिसच्या उद्यानाच्या तोडीचे उद्यान, राजवाडा आणि एकूण परिसर इथे उभारण्याचे काम त्याने 1717 पासून हाती घेतले. म्हणूनच या परिसराला – रशियन व्हर्सेलिस – म्हटले जाते. येथील द ग्रँड पॅलेस तीन मजली असून तो या परिसरातील सर्वांत उंच ठिकाणी उभारला गेला आहे. यात विशाल सिंहासन कक्ष, छायाचित्र कक्ष असे विविध 30 कक्ष यामध्ये आहेत. राजवाड्याची रंगसंगती तसेच प्रत्येक कक्षातील अंतर्गत रचना अतिशय आकर्षक असून त्याच्या एकीकडे लोअर पार्क (нижний сад / निझ्निई साद), तर दुसरीकडे अप्पर पार्क (верхний сад / व्येर्खनिइ साद) आहेत. तेथे पीटरच्या सिंहासनासाठी अशी उंचावरची जागा निवडण्यात आली की, जिथे बसून त्याला सुंदर लोअर पार्कचे दर्शन होईल. त्याचबरोबर सागर किनाऱ्यावरील राजवाड्यामध्ये बसून समुद्रातून ये-जा करणारी जहाजे पाहता येतील अशा ठिकाणी खास पीटरसाठी मोन्पलासीर पॅलेस उभारला गेला होता. मोन्पलासीर या फ्रेंच शब्दाचा अर्थ आहे – माझा आनंद. पीटरला समुद्रातून ये-जा करणारी जहाजे पाहत बसण्याचा छंद होता.

सॅमसनचा कारंजा
      सेंट पीटर्सबर्गकडे जाणारा महामार्ग आणि ग्रँड पॅलेस यांदरम्यान अप्पर पार्क वसलेली आहे. या उद्यानातील फ्रेंच पद्धतीच्या पाच कारंज्यांपैकी एक नेपच्यून या समुद्रदेवाला समर्पित केलेली आहे. लोअर पार्क हे ग्रँड पॅलेस आणि समुद्र किनाऱ्यादरम्यान वसलेले आहे. या परिसरातील सर्वात उंच कारंजा असलेला सॅमसन कारंजा इथेच आहे. या कारंज्याची निर्मिती 18व्या शतकात तुव्होल्कव या अभियंत्याने केली होती. हा कारंजा कोणत्याही यंत्राशिवाय कार्य करतो. या उद्यानात 3 मोठे धबधबे आणि सुमारे 120 कारंजे आहेत. यातील सर्वात आकर्षक धबधबा – ग्रँड कॅस्केड (रशियन नाव – Большой каскад, बल्शोई कस्काद) ग्रँड पॅलेसच्या समोरच आहे. या धबधब्यात अनेक सोनेरी मुर्त्या आहेत. त्यातील सिंहाचा जबडा दोन्ही हातांनी पकडलेल्या सॅमसनची सर्वात मोठी सोनेरी मूर्ती विशेष आकर्षक आहे. या सिंहाच्या तोंडातून या धबधब्यातील सर्वात मोठा कारंजा उडत असतो. पीटर द ग्रेट याने स्वीडनवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून या कारंज्याची उभारणी केली गेली होती. अन्य धबधब्यांमध्ये बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे काळ्या-पांढऱ्या चौकटी, ड्रॅगन इत्यादी वैशिष्ट्ये आढळतात. लहान मुलांना आकर्षित करणारे जोक फाऊंटनही येथे आहेत.

पीटर द ग्रेटच्या आवडत्या मोन्प्लासीर या राजवाड्याप्रमाणेच अन्य मंडप आणि छोटे राजवाडेही लोअर गार्डनमध्ये आहेत. हर्मिटेज मंडप खास राजेशाही मेजवान्यांसाठी उभारला गेला. मार्ली पॅलेसची उभारणी 1723 मध्ये करण्यात आली. अशा या विलासी लोअर गार्डनपासून दूर लेक्साड्रिया पार्कमध्ये इंग्लिश पद्धतीचा कॉटेज पॅलेस 1829 मध्ये निकोलस (पहिला) याच्यासाठी बांधला गेला.

ग्रँड पॅलेसची सुरुवातीच इमारत ब्राऊनस्टाईन, झेंस्तव आणि लेब्लाँ या वास्तुतज्ज्ञांनी बांधली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये या राजवाड्याचे बरेच नुकसान झाले होते, पण नंतर त्याला त्याचे गतवैभव परत मिळवून दिले गेले.

      पीटरहोफ हे विविध आकर्षक इमारतींचे भव्य संकुल आहे. या राजसंकुलात हिरवेगार बगीचे, कारंजे, पुतळे, मंडप याबरोबरच छोटे राजवाडेही आहेत. यामुळे हा परिसर येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. झारशाहीच्या अस्तानंतर हा सगळा परिसर सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. 1917 च्या साम्यवादी क्रांतीनंतर रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्गहून मॉस्कोला स्थानांतरित झाली. तसेच सेंट पीटर्सबर्गचे नामकरण लेनिनग्राद असे झाले, जे 1990 पर्यंत कायम राहिले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा