नुकताच जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. पर्यावरणविषयक जागृती वाढवण्यासाठी जगभरात या निमित्तानं बरेच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात वाढत असलेल्या ओझोन प्रदूषणामुळे एक नवी समस्या निर्माण झाली आहे. भारतातही त्याचे घातक परिणाम दिसून येत आहेत.
1 एप्रिल ते 15 जून 2019 या कालावधीत म्हणजे
लॉकडाऊनच्या आधीच्या वर्षात भारतात वातावरणातील ओझोनचे प्रमाण बरेच जास्त नोंदवले
गेले होते. एका दिवसाच्या सरासरी 8 तासांमध्ये ओझोन प्रदूषणाचे प्रमाण 100 मायक्रो
ग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त असू नये असा निकष आहे. मात्र दिल्लीसह भारतातील
अनेक भागांमध्ये हे प्रमाण त्यापेक्षा जास्त आढळले होते. वातावरणातील ओझोनचे हे
वाढते प्रमाण सजीवांच्या दृष्टीने अधिक घातक ठरत आहे.
एप्रिल ते जून 2019 दरम्यान उत्तर भारतातील उष्णतेत
मोठी वाढ नोंदवली गेली. वाढलेले तापमान आणि कडक ऊन यामुळे वातावरणातील ओझोनचे
प्रमाण अनेक पटींनी वाढलेले आढळले होते. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची
शक्यता असते. Centre for Environment च्या
अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीतील हवा
आता अधिक विषारी बनली आहे. 2018 पेक्षा 2019 मध्ये वातावरणातील ओझोनच्या प्रदूषक
कणांचे प्रमाण दीडपटीने वाढलेले आढळले. दिल्लीत 1 एप्रिल ते 15 जून 2019 दरम्यान
16% दिवस ओझोनचा वातावरणातील
स्तर मर्यादेपेक्षा अधिक आढळला. 2018 मध्ये हे प्रमाण केवळ 5% होते. 2019 मध्ये फरिदाबादमध्ये
ओझोन प्रदुषित दिवसांचे प्रमाण 80%, तर
गाझियाबादमध्ये 65%
राहिले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रकाशित
झालेल्या 2019 च्या हवा गुणवत्ता सूचकांकानुसार दिल्लीत 1 एप्रिल ते 15 जून 2019
मध्ये 28 दिवस हवेतील Particulate Matter बरोबरच ओझोन हासुद्धा एक प्रमुख प्रदूषक होता. 2018 मध्ये हे दिवस 17
होते. सरासरी 8 तासांमध्ये ओझोनचे हवेतील प्रमाण 2019 मध्ये 122 मायक्रो ग्रॅम
प्रति घनमीटर, तर 2018 मध्ये 106 मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर नोंदवले गेले.
सूर्याच्या धोकादायक अतिनील (Ultra-Violate) किरणांपासून आपले संरक्षण करणारा ओझोन वायू आता एक प्रदूषक म्हणूनही
समोर येऊ लागला आहे.
भारतातील
मोठ्या शहरांमधील स्थिती
दिल्लीसह देशातील मोठ्या शहरांमध्ये नायट्रोजन
ऑक्साईड एक हानिकारक प्रदूषक म्हणून समोर येत आहे. हा वायू ओझोनच्या निर्मितीसाठी
कारणीभूत ठरत आहे. ग्रीनपीस इंडियाच्या मते, वाहतूक आणि औद्योगिकीकरण हे दोन घटक
दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांमध्ये नायट्रोजन
ऑक्साईडच्या निर्मितीला सर्वात जास्त जबाबदार ठरत आहेत. या शहरांमध्ये वाहनांची
संख्या जास्त असल्यामुळे डिझेलचे प्रज्वलन सर्वाधिक होत असते. The State on
Global Air -2019 मध्ये
ओझोन क्षरण आणि ओझोन प्रदूषण याबाबत निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे
भारतासंबंधीही काही निरीक्षणे समाविष्ट आहेत. ओझोन प्रदुषकांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये
भारतात गेल्या दोन दशकांमध्ये 150% नी
वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या
अहवालाच्या मते, या धोकादायक वायूच्या श्वसनामुळे भारतात होणाऱ्या मृत्यूंची
आकडेवारी चीनपेक्षाही अधिक नोंदवली गेली आहे. वातावरणातील पीएम-2.5 मुळे होणाऱ्या
मृत्यूंपैकी 52%
मृत्यू भारत आणि चीनमध्येच होत आहेत.
ओझोन प्रदूषणाचे
परिणाम
अलीकडील काही वर्षामध्ये वातावरणातील ओझोन
वायूच्या थराला छिद्र पडत असल्याचे लक्षात आले आहे.
- ओझोन प्रदूषण मनुष्य आणि प्राण्यांच्या जनुकीय गुणसूत्रांमध्ये (डीएनए) बदल घडवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे आढळले आहे.
- गर्भातील अर्भकांसाठीही हे प्रदूषण हानिकारक ठरते.
- मनुष्याच्या प्रतिरोधक क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
- मोतीबिंदू आणि डोळ्यांचे अन्य आजार होण्याचे प्रमाणही वाढते.
- संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराला ओझोन प्रदूषण कारणीभूत ठरू शकते.
- ओझोनचे प्रदूषण हृदयरोग, अस्थमा, ब्राँकायटिससारख्या रोगांमध्ये अतिशय धोकादायक ठरते.
- फुप्फुसे आणि क्रॉनिक ऑब्सट्रेक्टिव्ह पल्मोनरी डिसीज यावर ओझोन प्रदूषणाचा थेट आणि विपरीत परिणाम होतो.
ओझोन
प्रदूषणाची निर्मिती
ओझोन हा वायू कोणत्याही स्रोतापासून तयार होत
नाही. हा धोकादायक आणि विषारी वायू आहे. हायड्रोकार्बन, नायट्रोजन ऑक्साईड, व्होलेटाईल
ऑर्गेनिक कंपाऊंड हे वायू प्रामुख्याने स्वयंचलित वाहने, उद्योग यांच्याकडून तसेच
कचरा जाळण्यामुळेही उत्सर्जित होत असतात. हे वायू जेव्हा उत्सर्जित होतात, तेव्हा
त्यांपासून हवेत एक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत तापमान आणि सूर्यापासून येणारी
ऊर्जा महत्वाची भूमिका बजावतात. त्या प्रक्रियेतून ओझोन वायूची भूपृष्ठाजवळच
निर्मिती होते. त्यामुळे ओझोनपासून वाचण्यासाठी नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड
आणि ऑर्गनिक कंपाउंडवर नियंत्रण अतिशय आवश्यक असते.
ओझोन वायू वातावरणाच्या वरच्या थरात राहणे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. तो थर पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण कवच असते. मात्र तोच वायू जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होऊ लागला, तर जीवसृष्टीसाठी ओझोन अतिशय घातक ठरतो. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंसाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये वायू प्रदूषण हा घटक तिसऱ्या स्थानावर आहे. वायू प्रदूषणाच्या धोक्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच 2019 च्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पनाही वायू प्रदूषण ठेवण्यात आली होती.
या लेखा मुळे आता प्रर्यत माहीत नसलेल्या गोष्टी लोकांना माहित होतील.
उत्तर द्याहटवाMAST
उत्तर द्याहटवा