दक्षिण चीन सागरातील संघर्ष

दक्षिण चीन सागर (स्रोत-Wikipedia)

      हिंद-प्रशांत क्षेत्र सुरक्षित, मुक्त आणि खुले ठेवण्यासाठी अमेरिका तिच्या सहकार्यांसोबत कार्य करत राहील, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन.

             ब्लिंकन सध्या इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, आज उद्भवत असलेल्या धोक्यांच्या विरोधात इतर देशांबरोबर काम करणे ही सर्वात मोठी शक्ती ठरत आहे. आपले भविष्य आणि सहकारी निश्चित करण्याचे जगातील देशांना आणि व्यक्तींना असलेल्या स्वातंत्र्याबाबत अमेरिका आश्वस्त करू इच्छिते. त्यासाठी आपले सहयोगी आणि सहकारी यांच्याबरोबर देवाणघेवाण वाढवण्यासाठी अमेरिका आपल्या राष्ट्रीय शक्तीसाधनांचा (राजनयिक, लष्करी आणि गुप्तचर) संयुक्तपणे वापर करण्याचे धोरण अवलंबेल.

                गेल्या काही वर्षांपासून चीन दक्षिण चीन सागराच्या बहुतांश भागावर दावा सांगत आला आहे. त्याने या प्रदेशाबाबत अतिशय आक्रमक धोरण स्वीकारत तेथे आपली लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. नैसर्गिक साधनसामग्रीने परिपूर्ण अशा दक्षिण चीन सागराचे सामरिकदृष्ट्या महत्व आहे. चीनच्या या प्रदेशातील वाढत्या आक्रमकतेचा जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहितांना धोका निर्माण झालेला आहे. दक्षिण चीन सागरावरील सार्वभौम हक्काच्या मुद्द्यावरून चीनचे या सागराच्या किनाऱ्यावरील ब्रुनेई, मलेशिया, फिलिपीन्स, तैवान आणि व्हिएतनाम यांच्याशी तंटे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ब्लिंकन यांनी आपल्या आग्नेय आशियाच्या दौऱ्यात वरील मत व्यक्त केले आहे.

      दक्षिण चीन सागर आणि आग्नेय आशिया क्षेत्रातील आपल्या राष्ट्रहितांच्या संरक्षणासाठी अमेरिकेच्या युद्धनौका आणि विमाने त्या प्रदेशात सातत्याने गस्त घालत आहेत. या मुद्द्यावरून वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात सतत तणाव निर्माण होत आहे. जगातील अनेक देशांचे याबाबतीत एकमत आहे की, दक्षिण चीन सागराचे क्षेत्र आंतरराष्ट्रीय जलक्षेत्राचा भाग असून त्यामध्ये नाविक व हवाई दळणवळणाचे स्वातंत्र्य राखले गेले पाहिजे. हा सागरी प्रदेश कोणत्याही एका देशाच्या मालकीचा नाही. याचाच पुनरुच्चार ब्लिंकन यांनी केला आहे.

दक्षिण चीन सागरातील वादाची पार्श्वभूमी

      दक्षिण चीन सागरावरील हक्काचा वाद सुमारे 2000 वर्षे जुना असल्याचे मानले जाते. चीन या सागरावरील आपली मालकी 2000 वर्षांपासून असल्याचा दावा करत आहे. त्याच्या मते, हा सागरी प्रदेशात प्राचीन काळापासून केवळ चिनी नागरिकच व्यापार करत होते. चीनमधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी 1940 च्या दशकामध्ये दक्षिण चीन सागरातील अनेक भागांना आपल्या अधिकृत नकाशांमध्ये स्वत:च्या प्रदेशांप्रमाणे दाखवण्यास सुरुवात केली होती. पुढील काळात चीनने आपला दावा सतत लावून धरत स्प्राटलीसारख्या बेटांवर ताबा मिळवला आणि तेथे बेकायदा मासेमारी सुरू केली. त्याला ब्रुनेई, मलेशिया, फिलिपीन्स आणि व्हिएतनामकडून आक्षेप घेतला गेला. मात्र त्याकडे बीजिंगने कायमच दुर्लक्ष केले आहे. अलीकडील काळात चीनने स्प्राटली, पारासेलसारख्या बेटांवर ताबा मिळवत तेथील आपली लष्करी क्षमता वाढवली आहे. या बेटांजवळ काही कृत्रिम बेटं उभारून चीनने तेथे लढाऊ विमानांसाठी धावपट्टी बांधली आहे. तसेच त्या धावपट्टीच्या संरक्षणासाठी विमानभेदी क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत.

चीनचा दावा नामंजूर

      12 जुलै 2016 रोजी दक्षिण चीन सागरावरील चीनचा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर या क्षेत्रात सर्वच देशांच्या लष्करी हालचाली वाढल्या. त्या काळात अमेरिकेच्या ड्रोन पाणबुडी चीनने पकडली होती. त्यानंतर चीनने लिआओनिंग या आपल्या विमानवाहू जहाजाच्या चाचण्या या परिसरात घेतल्या. त्याआधी चीनने रशियाबरोबर येथे मोठे संयुक्त नाविक युद्धसराव केले होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण चीन सागरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर व्हिएतनामला अमेरिकेकडून संरक्षणाची हमी दिली होती.

दक्षिण चीन सागराचे सामरिक महत्व

      दक्षिण चीन सागर चीनच्या दक्षिणेला वसलेला आहे. हा प्रशांत महासागराचाच एक भाग असून त्याचा विस्तार सिंगापूर ते तैवानच्या आखातापर्यंत सुमारे 35 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात तो विस्तारलेला आहे. दक्षिण चीन सागरातून जगातील एकूण व्यापारी जलवाहतुकीपैकी 50% जलवाहतूक होते. जगातील महत्वाचे जलमार्ग दक्षिण चीन सागरातूनच जातात. दक्षिण चीन सागरातून दरवर्षी सुमारे 3 खर्व (ट्रिलियन) मूल्याची व्यापारी वाहतूक चालते, असे ब्लिंकन यांनी म्हटले आहे. मलाक्काच्या खाडीतून जाणाऱ्या जलमार्गांद्वारे दररोज सुमारे 1.6 दशलक्ष टन (जगातील एकूण वाहतुकीच्या एक-तृतीयांश) खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक चालते.

अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाच्या अहवालानुसार, दक्षिण चीन सागरात सुमारे 11 अब्ज पिंपे (बॅरल) इतके तेलसाठे असण्याचा अंदाज आहे. या सागरी प्रदेशात जगातील एक-तृतीयांश सागरी जैववैविध्य अतित्वात असल्याचे मानले जाते. त्यामुळे या क्षेत्रात माशांची मोठी संख्या असल्याचे सांगितले जाते.

      सध्या दक्षिण चीन सागर हा भाग जगातील सर्वात तणावग्रस्त भागांपैकी एक झाला आहे. हिंदी आणि प्रशांत महासागरांना जोडणाऱ्या या भागाचे जगाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. ही बाब तसेच या सागरतळाशी असलेली नैसर्गिक संपत्ती विचारात घेऊनच चीनकडून या सागरावर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत; पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय समुदाय चीनच्या त्या प्रयत्नांना विरोध करत आहे. भारताचीही या क्षेत्रात सामरिक हितं गुंतलेली आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील देशांबरोबर सामरिक सहकार्य वाढवण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच भारतीय युद्धनौका वरचेवर आग्नेय आशियाई देशांना भेटी देत आहेत. भारत दक्षिण चीन सागरातील दळणवळणविषयक स्वातंत्र्याचे समर्थन करत आला आहे. त्या प्रदेशातील वादावर तोडगा काढण्यासाठी धमकी आणि शक्तीचा वापर केल्यास तेथील शांतता आणि स्थैर्यावर विपरित परिणाम होईल, असे नवी दिल्लीचे मत आहे.

व्हिएतनामच्या दानांगच्या भेटीवर असलेली भारतीय युद्धनौका भा. नौ. पो. सह्याद्री (आयएनएस सह्याद्री) (फोटो-पीआयबी)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा