समुद्रावरची हवाई शक्ती

  

भारताची समुद्रावरची हवाई शक्ती. हिंदी महासागरावरून उडणारी हवाईदलातील जग्वार आणि आयएल-78 एमकेआय आणि दूर दिसणारी नौदलातील मिग-29 के. (फोटो-पीआयबी)

भारतीय हवाईदलाने 2021 मध्ये अमेरिकन आणि ब्रिटिश नौदलांबरोबर हिंदी महासागरात पार पडलेल्या संयुक्त युद्धसरावांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. जगातील चौथे सर्वांत मोठे आणि हिंदी महासागरातील सर्वांत प्रबळ हवाईदल असलेल्या भारतीय हवाईदलाने या सरावांच्या माध्यमातून सागरी हवाई सुरक्षेतील आपला अनुभव आणि क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

देशाचा आर्थिक विकास आणि एकूणच राष्ट्रीय सुरक्षा या दृष्टीने सागरी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्व असते. भारत हा सागरावर अवलंबून असलेला देश आहे. त्यामुळे या दोन्ही बाबी साध्य करण्यासाठी आपल्या देशाच्या आणि त्याच्या आसपासच्या सागरी प्रदेशावर हवाई वर्चस्व प्रस्थापित करणे भारतासाठी आवश्यक ठरते. भारतीय हवाईदल स्वातंत्र्याच्या आधीपासूनच सागरी हवाई सुरक्षेमध्ये योगदान देत आलेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सागरी हवाई संरक्षणातील भारतीय हवाईदलाची भूमिका बदलत गेली आहे. तरीही 90 च्या दशकापूर्वी हवाईदलाची सागरी सुरक्षेतील भूमिका मर्यादित कार्यक्षेत्रापुरतीच होती. शीतयुद्धोत्तर काळात भारतीय हवाईदलावरील सागरी सुरक्षेतील जबाबदारी विस्तारत गेली आहे.

      हिंदी महासागर प्रदेशातील मित्र देशांच्या संरक्षण दलांबरोबर धोरणात्मक सहकार्य वाढवण्याच्या हेतूने भारतीय हवाईदलाने भारतीय नौदलाच्या साथीने या क्षेत्रात तैनातीवर असलेल्या अमेरिकन नौदलाच्या रोनाल्ड रीगन विमानवाहू जहाजाच्या हल्ला चढवणाऱ्या गटाबरोबर (कॅरियर स्ट्राईक गृप) या वर्षी जूनमध्ये युद्धसराव केले होते. थिरुवनंथपुरमच्या पश्चिमेला अरबी समुद्रात हे सराव पार पडले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कोकण किनारपट्टीजवळ रॉयल नेव्हीच्या क्वीन एलिझाबेथ विमानवाहू जहाजाच्या हल्ला चढवणाऱ्या ताफ्याबरोबर भारतीय हवाईदलाने कोकण शक्ती-2021 या युद्धसरावांमध्ये भाग घेतला होता.

भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय, जग्वार या सागरी हल्ला चढवणाऱ्या विमानांबरोबरच शत्रुच्या हवाई हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी आणि हवाई कारवायांचे नियोजन करणारी एवॅक्स विमाने, हवेत उडत असतानाच अन्य विमानांमध्ये इंधन भरू शकणारी आयएल-78 एमकेआय इंधनवाहू विमाने या दोन्ही सरावांमध्ये सहभागी झाली होती. या सर्व विमानांनी हवाईदलाच्या विविध परिचालन कमांडच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या हवाईतळांवरून उड्डाणे केली होती. त्याचबरोबर या सागरी हवाई युद्धसरावांमध्ये भारतीय नौदलाची मिग-29के लढाऊ विमाने, पी-8आय दीर्घ पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने, सीकिंग-42बी आणि शत्रुच्या हवाई हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी कामोव्ह ही हेलिकॉप्टर्सही सहभागी झाली होती.

      अमेरिकन नौदलातील रोनाल्ड रीगन विमानवाहू जहाजावर तैनात असलेली एफ-18 सुपर ऑर्नेट आणि ई-2 सी हॉक आय ही शत्रुच्या हालचालींवर आकाशातून लक्ष ठेवणारी विमाने, तर रॉयल नेव्हीच्या क्वीन एलिझाबेथ विमानवाहू जहाजावरील एफ-35 लायटनिंग-2 स्टेल्थ लढाऊ विमाने या सरावांमध्ये सहभागी झाली होती. या विमानांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांबरोबर सामुहिक उड्डाणे आणि सागरी हवाई सुरक्षाविषयक सराव केले.

भारतीय हवाईदलाकडे हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी कारवायांचा मोठा अनुभव आहे. विविध देशांबरोबर होणाऱ्या युद्धसरावांमधून हा अनुभव आणखी बळकट होत गेला आहे. सागरी सुरक्षेबरोबरच या क्षेत्रातील मानवीय मदत आणि आपत्ती निवारण, मित्र देशांना मदत साहित्याचा पुरवठा याबाबतीतही भारतीय हवाईदल सक्रीयपणे भूमिका बजावत आले आहे. सागरी सुरक्षेमध्ये भारतीय नौदलाबरोबरचा समन्वय वाढवण्याच्या हेतूने गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाने संयुक्त युद्धसराव सुरू केले आहेत. भारतीय नौदल दरवर्षी आयोजित करत असलेले ट्रोपेक्स युद्धसराव आणि 2018 मध्ये हवाईदलाने आयोजित केलेल्या गगनशक्ती युद्धसरावांमध्ये हवाईदलाच्या सागरी सुरक्षेतील क्षमतांचा अभ्यास केला होता. अशा युद्धसरावांमुळे सागरी हवाई विशेष परिस्थितीच्या (domain) बाबतीत मित्र देशांबरोबरही देवाणघेवाण वाढवण्याची महत्वपूर्ण संधी भारतीय हवाईदलाला उपलब्ध होत असते. समुद्रावरील हवाई क्षेत्रावर वर्चस्व स्थापित करणे, अत्याधुनिक हवाई सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी कारवाया, रणनीतिक योजना इत्यादीविषयक सराव यामध्ये केले जात असतात.

गगनशक्ती-2018 युद्धसरावांमध्ये सागरी हल्ल्याचा सराव करताना हवाईदलाची सुखोई-30 एमकेआय. (फोटो-पीआयबी)


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा