अग्नी-5

अग्नी-5

       अग्नी-5 या भारताच्या दीर्घपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची 27 ऑक्टोबर 2021 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पाच हजार किलोमीटर दूरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. सद्यपरिस्थितीत भारताच्या संरक्षण सिद्धतेत या क्षेपणास्त्राचे महत्त्व प्रकर्षाने सिदध् होत आहे. या क्षेपणास्त्रामुळेच आशियाचा जवळजवळ सर्व भाग आणि युरोप, आफ्रिकेपर्यंतचे काही क्षेत्र भारतीय क्षेपणास्त्रांच्या माऱ्याच्या टप्प्यात आले आहे.

      त्याआधी अग्नी-5 च्या सात चाचण्या पार पडलेल्या होत्या. या चाचणीच्यावेळी रडार, रेंज स्टेशन आणि निरीक्षण यंत्रणेच्या माध्यमातून क्षेपणास्त्राच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यात आले होते. या चाचणीत अग्नी-5 ने निश्चित करण्यात आलेली सर्व उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य केली. 27 ऑक्टोबरच्या चाचणीचे महत्व अशासाठीही आहे की, ही चाचणी अंधारात घेतली गेली होती आणि त्यावेळीही त्याने अचूकपणे लक्ष्यभेद केला. भारताच्या सामरिक सैन्यदल विभागाकडून (Strategic Forces Command) ही चाचणी घेतली गेली होती.

अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 19 एप्रिल 2012 रोजी यशस्वीपणे पार पडली होती. आशिया खंडाचा बहुतांश भाग अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येत असल्यामुळे पहिल्या चाचणीनंतर लगेचच चीनमधील सरकारी वृत्तपत्रांनी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत अतिशय नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तसेच भारताच्या एकूणच क्षेपणास्त्र क्षमतेवर शंका घेण्यास सुरुवात केली. यामुळे आशियातील शस्त्रस्पर्धा वाढेल आणि सैन्यसमतोल बिघडण्याची शक्यताही चीनने व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर अग्नी-5 क्षेपणास्त्र प्रथमच नवी दिल्लीतील राजपथावरील 2013 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आवर्जून प्रदर्शित करण्यात आले होते. त्या प्रदर्शनावरही बीजिंगने नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.

2013 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रदर्शित करण्यात आलेले अग्नी-5

अग्नी-5 हे जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करू शकणारे दीर्घपल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या व्याख्येच्या अगदी जवळ जाणारे हे क्षेपणास्त्र आहे. साधारणत: 5,500 किलोमीट किंवा त्यापेक्षा जास्त पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हटले जाते. पण अग्नी-5 चा पल्ला 5 ते 8 हजार किलोमीटरपर्यंत असू शकतो, असे सांगितले जात आहे. घन इंधनावर चालणारे हे क्षेपणास्त्र तीन-टप्प्याचे आहे. यावरून सुमारे दीड टन वजनाच्या पारंपारिक शस्त्रास्त्रांबरोबरच अण्वस्त्रेही वाहून नेता येतात. अग्नी-5 चे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वजन कमी करून याचा पल्ला वाढविला जाऊ शकतो.

अग्नी-5 चा प्रक्षेपक रस्त्यावरून कोठेही वाहून नेता येत असल्याने क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची नियोजित जागा शत्रूच्या नजरेपासून दूर ठेवता येऊ शकते. अग्नी-5 हे अग्नी वर्गातील सर्वांत दीर्घपल्ल्याचे क्षेपणास्त्र असल्याने त्याचे आरेखनही या मालिकेतील अन्य क्षेपणास्त्रांपेक्षा भिन्न आहे. मालिकेतील इतर क्षेपणास्त्रांच्या मानाने त्याचा व्यास मोठा म्हणजेच 2 मीटर आहे.

अग्नी-5 रस्त्यावरील किंवा लोहमार्गावरील प्रक्षेपण वाहनावरून वाहून नेले जाते. त्यामुळे त्याची एका ठिकाणाहून दुसरीकडे लवकरात लवकर तैनाती करून प्रक्षेपण करणे शक्य होते. तसेच नळकांड्यात (Canister) हे क्षेपणास्त्र ठेवले जात असल्यामुळे त्याच्या बाह्य आवरणाचे आयुर्मानही वाढलेले आहे. प्रक्षेपणाच्यावेळी गॅस जनरेटरच्या मदतीने अग्नी-5 त्या नळकांड्यातून बाहेर फेकले जाते. या नळकांड्यामुळे अग्नी-5 ला प्रक्षेपणासाठी लागणारा वेळही कमी झालेली आहे. यावर बसवण्यात आलेल्या Ring Laser Gyroscope based Inertial Navigation System मुळे क्षेपणास्त्राला वेगवेगळ्या उपग्रहांच्या मदतीने निश्चित लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करणे शक्य होते.

अग्नी-5 ची यशस्वी चाचणी भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात पाणबुडीतूनही डागता येणारी अग्नी-5 ची आवृत्ती विकसित केली जाणार आहे. त्यामुळे भारताची सामरिक क्षमता कित्येक पटींनी वाढणार आहे. भारताने 1974 आणि 1998 मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या घेतल्या होत्या. मात्र अण्वस्त्र सज्जतेत केवळ अणुचाचण्या घेऊन भागणार नव्हते. वेळ आल्यास शत्रुवर अण्वस्त्रे डागण्यासाठी सुयोग्य क्षेपणास्त्रे, विमाने, पाणबुड्याही जवळ असणे आवश्यक असते. ती गरज पूर्ण करण्याच्या हेतूनेच भारताने 1980 च्या दशकात अग्नी क्षेपणास्त्राच्या विकासाचा कार्यक्रम होती घेतला होता. त्यानंतर 1989 मध्ये दीड हजार किलोमीटर पल्ल्याच्या अग्नी-1 क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती.

आपली सामरिक हितं लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी सहा हजार किलोमीटर लांबच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे अग्नी-6 आणि दहा ते बारा हजार किलोमीटरपर्यंत पल्ला असलेले क्षेपणास्त्रही (सूर्य) विकसित करण्याची योजनेवर भारत गेली अनेक वर्षे काम करत आहे. भारत अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करणार नाही, त्याचवेळी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने किमान आण्विक प्रतिहल्ल्याची क्षमता बाळगेल या आपल्या आण्विक धोरणातील पायाभूत तत्वाशी बांधिलकी राखतच भारत आपल्या क्षेपणास्त्रांचा विकास करत आलेला आहे.

अग्नी-5 च्या चाचण्या

  • पहिली : 19 एप्रिल 2012
  • दुसरी : 15 सप्टेंबर 2013
  • तिसरी : 31 जानेवारी 2015
  • चौथी : 26 डिसेंबर 2016
  • पाचवी : 18 जानेवारी 2018
  • सहावी : 3 जून 2018
  • सातवी : 10 डिसेंबर 2018
  • वापरकर्ता चाचणी : 27 ऑक्टोबर 2021

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा