बर्लिनची भिंत, 1988 (स्रोत - File:Berliner Mauer, ostdeutscher Grenzer beobachtet Räumung des Kubat-Dreieck.jpg - Wikipedia |
नाझींना पराभूत करण्याचे लक्ष्य दृष्टिपथात
येऊ लागताच नोव्हेंबर 1943 मध्ये चर्चिल, रुझवेल्ट आणि स्टॅलिन यांनी
महायुद्धोत्तर जर्मनीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू केली होती. युद्ध संपल्यावर
मात्र अमेरिका, ब्रिटन, फ्रांस या भांडवलवादी सत्ता आणि साम्यवादी सोव्हिएट संघ
यांनी आपापल्या ताब्यातील जर्मन भूभाग आपापल्याकडेच ठेवला. परिणामी जर्मनभूमी आणि
राजधानी बर्लिनचेही चार विभाग पडले. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस यांनी पश्चिम
युरोपातील आपले हितसंबंध आणि आपली राष्ट्रीय सुरक्षा निश्चित करण्यासाठी 1948
मध्ये आपापल्या ताब्यातील जर्मन प्रदेशांचे एकीकरण करून ‘Federal Republic of Germany’ (पश्चिम जर्मनी) या नव्या देशाची निर्मिती केली. त्याचवेळी या तीनही
देशांच्या ताब्यातील बर्लिनच्या प्रदेशाचेही एकीकरण करण्यात आले. त्याला ‘पश्चिम बर्लिन’ अशी ओळख मिळाली. एकूणच जर्मनी आणि बर्लिन
जगातील दोन प्रमुख परस्परविरोधी विचारसरणींमध्ये विभागले गेल्याने त्यांच्यातील
शीतयुद्धाचेही केंद्र ठरू लागले.
पुढील काळात लोकशाही, भांडवलशाही व्यवस्थेमुळे ‘पश्चिम जर्मनी’ आणि ‘पश्चिम बर्लिन’मध्ये वेगाने आर्थिक विकास होत गेला. पश्चिमकडील लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही होते. या बाबी साम्यवादी ‘पूर्व जर्मनी’ आणि ‘पूर्व बर्लिन’मधील नागरिकांच्या नजरेत येऊ लागल्या. दुसऱ्या महायुद्धामुळे सामान्य जर्मन नागरिकांचे राहणीमान कमालीचे खालावलेले होते. महागाई प्रचंड वाढलेली होती. त्या परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची इच्छा सामान्य जर्मन नागरिकाला होती. पण पूर्वेकडील साम्यवादी व्यवस्थेमुळे विकास संथ गतीने होत होता. त्यामुळे ‘पश्चिम जर्मनी’ आणि ‘पश्चिम बर्लिन’मध्ये पलायन करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली. हे पलायन रोखण्यासाठी ‘पूर्व जर्मनी’तील (Deutsche Demokratische Republik (डॉईट्शं डेमोक्राटिशं रेपुब्लिक)/ German Democratic Republic) सुरक्षा दलांनी आधी पूर्व आणि पश्चिम बर्लिनच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली. त्यातूनही पश्चिमेकडे पलायन सुरूच होते. असे पलायन करणाऱ्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश होते. परिणामी ही सीमा ओलांडताना अनेकांना प्राण गमवावे लागले होते.
पूर्वेकडून
पश्चिमेकडे होणारे पलायन पूर्णपणे थांबवण्यासाठी आणि पश्चिमेकडील उंचावलेल्या
राहणीमानाचा पूर्वेकडील नागरिकांवर पडणारा प्रभाव रोखण्यासाठी ‘पूर्व जर्मनी’च्या साम्यवादी राजवटीने दोन्ही बर्लिनच्या सीमेवर तारेच्या कुंपणाच्या
जागी भिंतच बांधण्याचे ठरवले. त्या निर्णयानंतर ताबडतोब 13 ऑगस्ट 1961 ला बर्लिनला
विभागणारी ऐतिहासिक भिंत उभारण्यास सुरुवात झाली. त्यावेळी काही ठिकाणी काँक्रिटचे
अडथळे आणि बाकीच्या ठिकाणी तारेची भेंडोळी टाकली गेली आणि ‘पश्चिम
बर्लिन’कडे जाणारे लोहमार्ग आणि रस्ते बंद करण्यात आले. या
भिंतीमुळे अनेक बर्लिनवासीयांचा आपले नातेवाईक, मित्रपरिवार एकमेकांशी रातोरात
संपर्क तुटला.
‘बर्लिनच्या भिंती’ची उभारणी 4 टप्प्यांमध्ये करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेली भिंत काटेरी तारेच्या मदतीने उभारण्यात आली होती. त्यानंतर 15 ऑगस्टला त्या ठिकाणी काँक्रिटचे ब्लॉक्स बसवण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी त्या भिंतीच्या अलीकडे काटेरी कुंपण, अतिरिक्त भिंती आणि अन्य प्रकारचे अडथळेही उभारण्यात येऊ लागले. पण ते कमी उंचीचे असल्यामुळे दोन्ही बाजूंकडील नागरिक एकमेकांना दिसत असत. त्यांच्यात सांकेतिक भाषेतून संवाद होतच राहिला. त्यानंतर 1962 मध्ये काँक्रिटच्या भिंतीपासून 100 मीटरवर तारेचे अतिरिक्त समांतर कुंपण घालण्यात आले. भिंत आणि ते कुंपण यांच्या दरम्यान असलेली घरे जमीनदोस्त करून भिंतीचा हा संपूर्ण परिसर मानवरहीत करण्यात आला.
'बर्लिनची भिंत', 1965 (फोटो स्रोत - Netzwerk (Deutsch als Fremdsprache) |
‘बर्लिनची भिंत’ उभारण्याचा तिसरा टप्पा 1965 नंतर सुरू झाला. त्यावेळी भिंतीच्या उर्वरित
भागाचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले. भिंतीच्या उभारणीतील पहिले 3 टप्पे लागोपाठ
आणि त्वरेने हाती घेण्यात आले होते. कारण 60च्या दशकात वॉशिंग्टन आणि मॉस्को
यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शीतयुद्ध
शिगेला पोहचले होते. मात्र त्यानंतर सोव्हिएट संघ आणि अमेरिका यांनी तणाव कमी
करण्याच्या दिशेने काही पावले टाकली. परिणामी ‘बर्लिनच्या
भिंती’च्या उभारणीचा चौथा आणि अंतिम टप्पा सुरू होण्यास काही
काळ गेला. तो सुरू झाला 1975 मध्ये. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम सीमेवरच अधिक उंचीची
भिंत उभारली गेली. ही भिंत आतापर्यंतच्या टप्प्यांपैकी सर्वात आधुनिक भिंत होती.
हा टप्पा 1980 मध्ये पूर्ण झाला. हा भाग काँक्रिटच्या 45,000 मोठ्या ठोकळ्यांच्या (ब्लॉक्स)
मदतीने उभारण्यात आला होता. हा प्रत्येक ब्लॉक 3.6 मीटर उंचीचा आणि 1.2 मीटर
रुंदीचा होता. तसेच या भिंतीच्या उभारणीत अत्याधुनिक तांत्रिक वैशिष्ट्यांचा
समावेश करण्यात आला होता. संपूर्ण पश्चिम बर्लिनच्या भोवतीने उभारलेल्या 167.8
किलोमीटर लांबीच्या भिंतीजवळ 186 टेहळणी मनोरे उभारण्यात आले होते. मुख्य
भिंतीच्या आतील बाजूला बसवलेल्या तारेतून विद्युत प्रवाह खेळवण्यात आला होता.
भिंतीला ठराविक अंतरावर गुप्त दरवाजे करण्यात आले होते. त्या दरवाज्यांमधून पलीकडे
जाऊन ‘पूर्व बर्लिन’चे सुरक्षारक्षक
भिंतीच्या त्या बाजूची नियमित पाहणी करत असत. पूर्व-पश्चिम जाण्यासाठी ‘बर्लिनच्या भिंती’ला 8 ठिकाणी अधिकृत नाके करण्यात
आले होते. मात्र सामान्य नागरिकांनी ‘पूर्व बर्लिन’मधून पलायन करण्यासाठी भिंतीच्या खालून काही ठिकाणी भुयारे खणलेली होती.
शेवटच्या
टप्प्यात मूळच्या सीमेवरील भिंतीच्या अलीकडे 100 मीटर अंतरावर समांतर आणखी एक भिंत
उभारण्यात आली. त्या दोन्ही भिंतीच्या मधल्या जागेत लोखंडी खिळ्यांचे आच्छादन,
वाळूचा एक पट्टा असे पाच ते सहा वेगवेगळे पट्टे करण्यात आले होते. पूर्वेकडून
पश्चिमेकडे कोणीही पळून जाऊ शकू नये आणि तसा प्रयत्न करणाऱ्याला लगेच ठार करता
यावे यासाठीची ही व्यवस्था Death Trap म्हणून ओळखली जात होती.
9 नोव्हेंबर 1989 च्या घोषणेनंतर भिंतीवर चढून आनंदोत्सव करणारे बर्लिनवासीय. (स्रोत- Netzwerk (Deutsch als Fremdsprache) |
9 नोव्हेंबर 1989 रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटनाक्रमानंतर 'बर्लिनच्या भिंती'ला जागोजागी पडू लागलेली भगदाडे. (फोटो स्रोत-Moment Mal (Langenscheidt) |
पुढील पिढ्यांना इतिहासातील त्या अध्यायाची ओळख व्हावी या हेतूने ‘बर्लिनच्या भिंती’च्या काही भागांचे संवर्धन करण्यात आलेले आहे. आज ते अवशेष बर्लिनला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे आकर्षण ठरत आहे. तसेच या भिंतीच्या उभारणीबाबत अधिकाधिक जाणून घेण्यासाठी अनेक जण संशोधन करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा